आईला शेवटचा सॅल्यूट करून आरआर आबांचे भाऊ पोलिस दलातून निवृत्त

गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून न मिरवता तात्यांनी नेहमीच अंतर ठेऊन काम केले.
Rajaram Ramrao Patil
Rajaram Ramrao PatilSarkarnama
Published on
Updated on

पुणे : भाऊ गृहमंत्री असूनही तब्बल वीस साईड पोस्टिंगवर काम करणारे आर. आर पाटील यांचे बंधू उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. म्हणजे राजाराम रामराव पाटील ऊर्फ तात्या हे आज पोलिस दलातून निवृत्त झाले. पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पाटील आज निवृत्त झाले. दरम्यान, नोकरीतील शेवटच्या दिवशी आईला सॅल्यूट करून ते कार्यालयात गेले. (Sub-Divisional Police Officer Rajaram Patil retires from police force after 35 years of service)

आर. आर. पाटील यांची पिंपरी चिंचवडमधून कोल्हापूरला उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली झाली होती, आज ते कोल्हापुरात सेवेत निवृत्त झाले. तत्पूर्वी शेवटचे कार्यालयात कामावर जाताना खूप कष्ट करून शिकवलेल्या आईला सॅल्यूट करून ते रवाना झाले. आरआर ऊर्फ आबा गेल्यापासून पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टिंग मिळेपर्यंत ते दर रविवारी आईला भेटण्यासाठी मूळगावी जात असत. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये नियुक्ती मिळाली आणि कोरोना महामारी सुरू झाली. त्यामुळे पोलिसांच्या सुट्या बंद झाल्या. रविवारीही शहर पोलिस दलातील सर्वच वरिष्ठ अधिकारी रस्तावर उतरून काम करताना पाहायला मिळत होते. त्यामुळे रविवार आला की आईच्या ओढीने तात्यांची सुरू असलेली घालमेल पाहून समोरील व्यक्तीपण व्याकूळ होत असे. आरआर आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी याबाबत पोस्ट करून त्यांच्या कारकिर्दीला उजाळा दिला आहे.

Rajaram Ramrao Patil
पवारांच्या कोर्टात होणार ‘विठ्ठल’चा निर्णय; भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून झाडाझडतीची शक्यता

त्यात त्यांनी म्हटले आहे की, पोलिस खात्यात भरती होणारे आणि वयपरत्त्वे निवृत्त होणारे अधिकारी मी खूप पाहिले. मात्र, १२ वर्ष गृहमंत्री तसेच काहीकाळ उपमुख्यमंत्री असणाऱ्या आबांचा सख्खा भाऊ असूनही तात्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात एक दोन नव्हे तर वीस वर्ष साईड पोस्टिंग केले. एकीकडे ग्रामपंचायत सदस्याचा किंवा आमदाराचा कार्यकर्ता नातेवाईक असल्यास आत्ताचे रिक्रूट (नवं भरती) पोलिस क्रीम पोस्टिंग पदरात पाडण्यासाठी उंबरे झिजवताना पाहायला मिळतात. परंतु, तात्यांनी क्रीम काय साधे एक्झिक्यूटिव्ह पोस्टिंगसाठीदेखील कधीही आबांकडे नियुक्तीची मागणी केली नाही. गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून न मिरवता तात्यांनी नेहमीच अंतर ठेऊन काम केले.

बीएस्सी फिजिक्समधून शिक्षण घेऊन तात्या १९८६ मध्ये पोलिस दलात फौजदार म्हणून भरती झाले. आज पस्तीस वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त होत आहेत. या कालावधीत त्यांना ६५० हून अधिक बक्षीसे मिळाली. तसेच महासंचालक सन्मानचिन्ह आणि १५ ऑगस्ट २००६, १५ ऑगस्ट २०१९ असे दोन वेळा राष्ट्रपती पदकाने तात्यांनी गौरविण्यात आले आहे. तात्या पोलिस भरती पूर्व परीक्षेत पास झाले आणि ही बाब त्यांनी आबांना सांगितल्यावरचा भावनिक किस्सा आठवला तरी तात्यांचे डोळे पाणावतात... घरचा पहिलाच सरकारी पगार असलेली व्यक्ती म्हणून त्यांचा अभिमान सर्व कुटुंबाला वाटायचा. नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन ते मुंबई येथे रुजू झाले. मुंबईचा फौजदार होणारा अंजनी गावातील पहिला तरुण म्हणजे तात्या होते. मुंबईत काही पोलिस ठाण्यात काम केल्यावर तात्यांची कोडोली, जयसिंगपूर, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर (करवीर विभाग) अशी नोकरी झाली.

Rajaram Ramrao Patil
एकनाथ खडसे लावणाऱ्या सीडीची गुलाबराव पाटलांनाही उत्सुकता!

तात्या २१ जून २०१९ ते ५ फेब्रुवारी २०२१ या काळात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात एसीपी क्राईम १ म्हणून नियुक्तीस होते. बऱ्याचदा तात्यांनी क्राईम २, प्रशासन, वाहतूक, विशेष शाखा असे सगळे अतिरिक्त पदभार ही सांभाळले. या काळात तात्यांनी भेटायला दररोज असंख्य लोक येत. येणाऱ्या प्रत्येकाला काही मिनिटे का होईना पण तात्या भेट देत. त्यांचे काम ऐकून संबंधिताला फोन लावत, ते काम कसे मार्गी लागेल असा त्यांचा प्रयत्न असायचा. अनेकांना तर तात्या केबिनच्या दारापर्यंत सोडायला जायचे. एका गृहमंत्र्यांच्या भाऊ आणि शहराचा एसीपी (क्राईम) असूनदेखील एवढा सामान्य कसा काय राहू शकतो, हे अनेकांना न उलगडणारे कोडेच असायचे.

एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकदा तात्यांना पिंपरी चिंचवडमधीलच एका परिसरात सपत्नीक जायचे होते. पण कामाच्या धबडग्यात बराच उशीर झाला होता. पत्नीला कार्यक्रमाला पुढे पाठवायचे, तर सरकारी गाडी दोनवेळा एकाच कामासाठी का वापरायची म्हणून त्यांनी पत्नीला काही काळ पोलिस आयुक्तालयाच्या समोरील मंदिरात थांबायला सांगितले. हा थोडावेळ म्हणजे तब्बल अडीच तास एवढा होता. पण त्याही तात्यांप्रमाणेच, कोणताही बडेजावपणा न ठेवता वाट बघत थांबून होत्या. तात्या काम संपवून साडेसात वाजता खाली आले आणि त्यानंतर सपत्नीक कार्यक्रमस्थळी गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com