

6 डिसेंबर 1956 हा दिवस भारतीयांनासाठी अतिशय वेदनादायी ठरला. या दिवशी वंचित, शोषितांचा घटकांचे आधारस्तंभ, न्यायासाठी अखंड लढा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि राज्यघटना निर्मितीचा त्यांचा संघर्षमय प्रवास आयुष्यभर सुरू होता. या कालावधीत त्यांची प्रकृती अनेक आजारांमुळे ढासळत गेली. मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात आणि इतर त्रासांमुळे त्यांची शारीरिक क्षमता कमी होत होती. तरीही लोकांसाठी काम करण्याची त्यांची इच्छाशक्ती कधीच कमी झाली नाही. पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री ते झोपेतच अखेरचा श्वास घेतला.
12 नोव्हेंबर 1956 रोजी बाबासाहेब काठमांडूच्या दौऱ्यावर गेले होते. तेथील कार्यक्रम पूर्ण करून 30 नोव्हेंबरला ते परत भारतात आले. दीर्घ भ्रमंती आणि आधीच असलेल्या आजारांमुळे त्यांची तब्येत अधिकच बिघडली होती. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राज्यसभेच्या अधिवेशनाला ते प्रकृतीमुळे उपस्थित राहू शकत नव्हते. मात्र त्यांनी 4 डिसेंबर रोजी आग्रहाने राज्यसभेला भेट दिली. हीच त्यांची संसदेतली शेवटची भेट ठरली.
राज्यसभेतून परतल्यानंतर थोडा आराम करून ते 14 डिसेंबरला नागपुरात होणाऱ्या धर्मांतर कार्यक्रमाच्या तयारीत गुंतले. तब्येतीचा विचार करून त्यांनी ही यात्रा विमानाने करण्याचा निर्णय घेतला. 5 डिसेंबरला सकाळची दिनचर्या पूर्ण करून त्यांनी माईसाहेब आणि डॉ. मालवणकर यांच्यासोबत न्याहारी केली. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत व्हरांड्यात बसले.
या दिवशी दुपारी ते ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेचे लेखन करत होते. जेवणानंतर त्यांनी थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळी माईसाहेब आणि डॉ. मालवणकर घरासाठी काही खरेदी करून परत आले. 5 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता जैन समाजाच्या प्रतिनिधींशी त्यांची नियोजित भेट झाली. या भेटीनंतर बाबासाहेब शांतपणे बुद्धवंदना म्हणत बसले. त्यांचं मन समाधानी आणि शांत होतं. आनंदाच्या क्षणी ते अनेकदा बुद्धवंदना किंवा कबीरांचे दोहे म्हणत असत.
रात्र सरत गेली आणि नवीन दिवस उगवला. 6 डिसेंबर 1956 ची ती सकाळ इतर कोणत्याही दिवसासारखीच सुरू झाली. माईसाहेब रोजप्रमाणे लवकर उठल्या. सकाळच्या वातावरणात एक शांत स्थिरता होती. त्यांनी बाबासाहेबांसाठी गरम चहाचा ट्रे तयार केला. दररोजप्रमाणेच त्यांनी त्यांच्या खोलीकडे पावलं टाकली. घड्याळात साधारण सात-साडेसात वाजत होते.
माईसाहेबांना वाटलं की बाबासाहेब अजून गाढ झोपेत असावेत. त्यांनी दरवाजा हळूच उघडला. खोलीत नेहमीसारखी शांतता पसरलेली होती. माईसाहेबांनी हलकेच पुढे जाऊन त्यांना उठवण्यासाठी हात ठेवला. पण काहीच हालचाल झाली नाही. त्यांनी पुन्हा एकदा त्यांना हलकासा स्पर्श केला. तरीही काहीच प्रतिसाद नव्हता. क्षणभर त्यांना वाटलं की झोप गाढ असेल. परंतु पुढच्या क्षणी जाणवलेली शांतता वेगळीच होती. बाबासाहेब झोपेतच परिनिर्वाण झाले…
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.