मला यापुढे राजकारणच करायचय - अभिमन्यू खोतकर

मला यापुढे राजकारणच करायचय - अभिमन्यू खोतकर
Published on
Updated on

औरंगाबाद : शिवसेनेचे जालना विधानसभा मतदारसंघातील आमदार व राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनी राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. अर्जुन खोतकर यांनी निवडणुकीच्या वेळी उशीरा उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून औरंगाबाद खंडपीठाने त्यांची आमदारकी नुकतीच रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या पार्श्‍वभूमीवर त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी पुढे मला राजकारणच करायचयं म्हणत आपली पुढची दिशा स्पष्ट केल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

आमदारकी रद्द झाल्यापासून अर्जुन खोतकर राजकीय कार्यक्रमांना जाणे टाळत आहेत. जालना जिल्ह्यातील पारध येथे कौमी एकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अर्जुन खोतकर व अब्दुल सत्तार यांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु अर्जुन खोतकर यांनी स्वतः ऐवजी अभिमन्यू यांना पाठवले. 

एरवी जालन्यातील अभिमन्यू खोतकर मित्रमंडळाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त फारशी कुठे हजेरी न लावणाऱ्या अभिमन्यू यांच्या उपस्थितीने सर्वानाच आश्‍चर्याचा धक्का बसला. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात " काही कारणामुळे वडील अर्जुन खोतकर कार्यक्रमाला येऊ शकले नाही, त्यांनी मला पाठवले. पुढे मलाही हेच करायचे आहे' असे म्हणत अभिमन्यू यांनी आपला ओढा राजकारणाकडेच असल्याचे संकेत दिले. 

अभिमन्यूची राजकारणात एन्ट्री का? 

विधानसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकर अवघ्या 296 मतांनी विजयी झाले होते. कॉंग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार कैलास गोरट्यांल यांनी खोतकर यांच्यावर उशिरा उमेदवारी दाखल केल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

आमदारकी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अर्जुन खोतकर सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. अशा वेळी आगामी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुक लढवण्यास त्यांना काही कायदेशीर अडचणी येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ऐनवेळी अर्जुन खोतकर यांच्या ऐवजी कोण ? असा प्रश्‍न उपस्थित झाल्यास अभिमन्यूचे नाव पुढे करता यावे यासाठीची ही तयारी असल्याचे बोलले जाते. 

जालन्याचे विद्यमान खासदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार नेटाने कामाला लागले आहेत. दानवे यांना मताधिक्‍य मिळवून देणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रीत करत तिथे मेळावे, कार्यक्रम घेण्याचा सपाटा सत्तार यांनी लावला आहे. दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याची घोषणा सत्तार यांनी सिल्लोडमधून खोतकर यांच्या उपस्थितीतच केली होती. 

न्यायालयाच्या निकालाने खोतकरांची आमदारकी रद्द झाल्यामुळे ते स्वःत राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत नसले तरी त्यांचे प्रतिनिधी किंवा भविष्यातील उमेदवार म्हणून त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर हे अचानकपणे सक्रीय झाल्याचे यावरून दिसून आले आहे. सत्तार यांनी देखील अभिमन्यू यांना सोबत घेऊन दानवे विरोधातील मोहिम आणखी वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com