Ahilyanagar Vidhan Sabha Election Result 2024 : विखे ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, तिथं पक्ष आणि इतर नेत्यांना मोठं होऊन देत नाहीत, असा आरोप होतो. परंतु कालच्या निकालाने विखेंनी सर्वाथाने चर्चांना पूर्णविराम दिला. याचबरोबर जिल्ह्यातील त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब देखील झाला. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव आणि राधाकृष्ण विखे यांचे तिहेरी यश!
भाजप महायुतीला (Mahayuti) राज्यातील मतदारांनी भरभरून मतदान केले. महायुतीच्या राज्यात 236 जागांवर विजय झाला. अनपेक्षित असा या निकालातून मतदार देखील सावरलेला नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी 10 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकले आहेत. या विजयामागे भाजप महायुतीमधील नेते देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली मेहनत म्हणावी लागेल.
अहिल्यानगर जिल्ह्यावर पहिल्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. शरद पवार (Sharad Pawar) यांचा या जिल्ह्यावर चांगलाच प्रभाव आहे. शरद पवार यांना मानणारा वर्ग इथं मोठा आहे. असे असले तरी, या जिल्ह्यावर विखे परिवाराची देखील पकड मोठी आहे. सहकार, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विखेंचे अहिल्यानगर जिल्ह्यात वर्चस्व आहे. यातून विखे आणि पवार यांचा राजकीय संघर्ष तीव्र असतो. लोकसभेला देखील तो अधोरेखित झाला. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला. या लोकसभेच्या लढाईत पवार यांना महाविकास आघाडीच्या निमित्ताने काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचे बळ मिळाले. जसा विखेंचा राजकीय संघर्ष पवार यांच्याबरोबर राहिला आहे, तसाच तो थोरात यांच्याबरोबर देखील आहे.
लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी लंकेच्या पाठिमागे मोठी ताकद उभी केली. यातून सुजय विखेंचा झालेला पराभव विखेंच्या जिव्हारी लागला. लोकसभेनंतर लगेच विधानसभा निवडणुका येऊ घातल्या होत्या. विखे पराभवाचा वचपा घेणार हे सर्वश्रुत होते. परंतु थोरात गाफील राहिले. यासाठी विखेंनी आखलेले रणनीती, थोरातांच्या लक्षात आली नाही, किंवा त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी देखील लक्षात आणून दिली नाही.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेल्या आठ निवडणुकांत सलगपणे विजय मिळवणारे बाळासाहेब थोरात यांच्यासह खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना पराभवाचा धक्का बसला. अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार निवडून आले आहे. महायुतीचे हे यश पाहता, राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व सिद्ध झाले. विखे यांचे हे यश तिहेरी विजय समजला जात आहे. ते स्वतः विजयी झाले, पण कट्टर परंपरागत विरोधक बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा पराभव करून विजय मिळवणारे नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पारनेरमधून पराभव झाला. असा हा तिहेरी विजय राधाकृष्ण विखे यांना मिळाल्याचे मानले जात आहे. लंकेंच्या विजयात किंगमेकर ठरलेले थोरात यांचा पराभव करून विखेंनी वचपा काढल्याचे मानले जात आहे.
'लाडकी बहीण', 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है', या मुद्यांमुळे निवडणूक वेगळ्याच पातळीवर पोचली होती. गट-तट निर्माण झाले होते. या निवडणुकीत तब्बल सहा माजी आमदारांनी बंडखोरी केली होती. यात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार विजय औटी, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी बंडखोरी केली होती. याशिवाय शिर्डी मतदारसंघात भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांना धरून किमान सात मतदारसंघात बंडखोरी झाली होती. विखेंविरोधात शिर्डीत बंडखोरी करणाऱ्या राजेंद्र पिपाडा यांना मतदारांनी साफ नाकारले. त्यातील एकाही बंडखोराला विजय मिळाला नाही. त्यातील कोणालाही विजय मिळाला नाही.
श्रीरामपूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघावर महायुतीचा दबदबा राहिला आहे. देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे यांचे प्लॅनिंग महायुतीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. विखेंची 'यंत्रणा' काय असते, हे या निवडणुकीत अहिल्यानगर शहर, संगमनेर, नेवासा, राहुरी, पारनेर, तालुक्यात महायुतीच्या विजयाने पुन्हा एकदा दाखवून दिले. संगमनेर आणि नेवासा इथं तर विखेंनी त्यांच्या 'यंत्रणे'ची मोठी ताकद उघडपणे उभी केली होती. परंतु कर्जत-जामखेडपासून विखे काहीसे लांब राहिल्याचे दिसले. राम शिंदे यांनी लोकसभा निडवणुकीपूर्वी विखेंविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यात राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक, लोकसभा निवडणुकीला जे काही त्याकडे ते विसरून विधानसभेला कर्जत-जामखेडमध्ये अधिकल दुर्लक्ष करणे विखे 'यंत्रणे'ने ठरवले. राम शिंदे यांच्या मदतीला इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघच मैदानात उतरला होता. परंतु इथं शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी विजय खेचून आणला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अहिल्यानगर जिल्ह्यात दमदार कामगिरी केली. दोन्ही जागांवर विजय मिळवला. 'मविआ'ने प्रचाराचा सेट केलेला मुद्दा मतदारांना भावला. त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत तो जाणवला नाही. महायुतीला पेस मिळाला. फडणवीस आणि विखेंनी तेच हेरलं. मविआला हिंदू-मुस्लिम करण्यात गुंतवून ठेवले. हिंदूविरोधी मविआचा चेहरा उभा केला. मराठा आरक्षणाचा फटका बसणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. ओबीसी मतदारांना भाजप महायुतीच रक्षक असल्याचे भासवले. सरकारी योजना, खास करून लाडकी बहीण योजना कशी बंद पाडतील, यावर भर दिला. इतर योजना पुढे चालू ठेवायच्या असतील, तर महिलांनी महायुतीला पसंती द्यावी, यावर भर दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना दिलेल्या घोषणा स्थानिक पातळीवर आणली. या सर्व पातळीवर महायुतीच सूक्ष्म नियोजन करत प्रचार करत असतानाच, विखे 'यंत्रणा' अॅटिव्ह होती. तिचा परिणामी महायुती अहिल्यानगर जिल्ह्यात विजयाच्या दिशेने पुढे सरकली.
या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते. "माझा विजय शिर्डी मतदारसंघातील जनतेला समर्पित करत आहे. सुजय विखे यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. विजयासाठी पायाला भिंगरी लावली. बाळासाहेब थोरात यांनी माझी आणि सुजय यांची सतत बदनामी केली. शेवटी त्यांच्या दडपशाहीचे झाकण संगमनेरच्या जनतेने उडवले. खरे तर महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. आता आमचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत", असे विखे यांनी म्हटले.
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा 12 विधानसभा मतदारसंघापैकी दहा मतदारसंघात महायुतीमधील भाजपला शिर्डी, शेवगाव-पाथर्डी, राहुरी आणि श्रीगोंदा मतदारसंघात चार जागा मिळाल्यात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अकोले, कोपरगाव,पारनेर आणि अहिल्यानगर शहात चार जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला संगमनेर आणि नेवासा मतदारसंघात दोन जागांवर यश मिळाले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसला श्रीरामपूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला कर्जत-जामखेड मध्ये यश मिळाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.