Chhatrapati Sambhajinagar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून रविवारी पुण्यात झालेल्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या 'चिंतन' अधिवेशनात अनेक घडामोडी घडल्या.
देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शाह यांनी राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा निर्धार आपल्या भाषणात बोलून दाखवला.
लोकसभा निवडणुकीत 'संविधान बदलणार' असा काँग्रेसकडून झालेला प्रचार, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधात गेलेला समाज आणि त्यांची मते, ओबीसींमध्ये आपल्या हक्काच्या आरक्षणावर गदा येते की काय?
ही भीती अशा सगळ्याच मुद्यांना शाह यांनी आपल्या भाषणातून हात घातला. राज्यात महायुतीची सत्ता आणि भाजपचा मुख्यमंत्री करण्याची 'गॅरंटी'च शाह यांनी या निमित्ताने राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे मागितली.
अमित शाह (Amit Shah) यांच्या भाषणातून मराठा-ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून राज्यात अस्थिर झालेले वातावरण, हक्काची 'व्होट बँक' तुटण्याचा धोका लक्षात घेता विधानसभा निवडणुकीपूर्वीच ते राज्यात भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करतानाच 'चारशे पार'चे उदिष्ट घेऊन भाजप मैदानात उतरला होता. महाराष्ट्राकडून मोदी-शाह यांना चाळीस पेक्षा जास्त खासदारांची 'रसद' मिळेल, अशी अपेक्षा होती.
पण, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या दोन मोठ्या राज्यात भाजपला सपाटून मार खावा लागला. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात निघालेले मोर्चे, झालेले आंदोलन, तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण सरकार देते की काय? ही भीती असल्याने भाजपचा हक्काचा ओबीसी मतदार गोंधळलेल्या अवस्थेत होता. याचा फटका लोकसभा निवडणुकीत वैयक्तिक भाजप आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे निरीक्षकांमार्फत जेव्हा शोधली गेली. त्याचा अहवाल दिल्लीतील भाजप नेत्यांना दिला गेला, तेव्हा मराठा आरक्षणाबाबत महायुतीच्या सरकारने घेतलेली भूमिका, आंदोलकांवर केलेला लाठीमार, गोळीबार या सगळ्या घटनांमुळे समाजाचा विशेषतः भाजपवर रोष होता. राज्याचे संघटना आणि सरकारमध्ये नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या निशाण्यावर आहेत.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) आपल्या प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला, त्यांच्याच आदेशाने आंदोलकांवर गोळीबार, लाठीहल्ला झाला. मराठा-ओबीसी वाद, दोन समाजात तेढ निर्माण करण्यामागे फडणवीस यांचे डोके आहे.
ते मराठा नेते, आमदार आमच्या अंगावर घालून शत्रूत्व घेत आहेत, येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपचे 65 ते 70 आमदार पाडणारच, अशी आक्रमक विधाने करत आहेत. लोकसभा निवडणुकीत हात पोळल्यानंतर भाजपने आता 'ताक फुंकून' पिण्याचे धोरण आखल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.
फडणवीसांना पर्याय शोधणार...
राज्यात भाजपला 'अच्छे दिन' आले ते देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्व आणि 'चाणक्य'नितीमुळेच. हे भाजपमधील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता मानतो. केंद्रीय नेतृत्वालाही महाराष्ट्रात फडणवीस यांच्या इतका विश्वास इतर दुसऱ्या नेत्यावर नाही.
परंतु, महाविकास आघाडीचे सरकार पाडून, शिवसेना, राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडून सत्तेवर आल्यानंतर राज्यात भाजपची प्रतिमा डागळली गेली आहे. या सगळ्या प्रकरणात 'व्हिलन' ठरत आहेत ते फडणवीस.
सत्ता गमावून किंवा पक्षाची शक्ती क्षीण करून देवेंद्र फडणवीस यांना जपण्यास आता केंद्रीय नेतृत्व तयार नसल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही महायुती व भाजपवर असलेला रोष कमी झालेला नाही, उलट तो वाढतच असल्याने आता राज्यात भाकरी फिरवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांचे मन बनल्याची चर्चा आहे. यातूनच देवेंद्र फडणवीस यांना राज्यात पर्याय शोधण्यात येत असल्याचे बोलले जाते.
यात सध्या केंद्रात पक्षासाठी काम करणारे आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते. विनोद तावडे राज्यात असताना फडणवीस यांनीच त्यांचे पंख छाटण्याचे काम केले होते, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो.
यातूनच तावडे-फडणवीस संघर्ष टाळण्यासाठी तावडे यांच्यावर केंद्रात संघटनेचे जबाबदारी सोपवण्यात आली होती. केंद्रात काम करताना तावडे यांनी आपल्या कामाची झलक नेतृत्वाला दाखवून दिली आहे.
मोदी-शाह यांच्याशी तावडे यांचा थेट संपर्क असल्याने विधानसभा निवडणुकीपुर्वी महाराष्ट्रातील नेतृत्व मराठा नेता म्हणून तावडे यांच्यावर सोपवण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे समजते.
संघाच्या मुशीत तयार झालेले तावडे हे मुत्सद्दी राजकारणी म्हणून नावारुपाला आले आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून भाजप विरोधात असलेला रोष मराठा नेत्याकडे नेतृत्व सोपवून करण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो? हे विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशानंतरच स्पष्ट होईल.
दानवे, निलंगेकर यांची चर्चा..
विनोद तावडे हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय पातळीर काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्राशी फारसा संपर्क सध्या नाही. अशावेळी अन्य काही मराठा नेत्यांच्या नावाचा विचार पक्षाकडून सुरू असल्याचे समजते.
यात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील-निलंगकेर या मराठवाड्यातील नेत्यांची नावे समोर येत आहेत. रावसाहेब दानवे यांचा राजकीय आलेख, त्यांचा जनसंपर्क, ग्रामीण शैलीत लोकांना आपलेसे करून घेण्याची कला आणि महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या कारकीर्दीत पक्षाने सगळ्या निवडणुकांमध्ये मिळवलेले यश पाहता रावसाहेब दानवे हा सक्षम पर्याय ठरू शकतो, असे बोलले जाते.
सरपंच, सभापती, दोन वेळा आमदार, सलग पाच वेळा खासदार, दोनदा प्रदेशाध्यक्ष, केंद्रात दोन वेळा राज्यमंत्री पद भोगलेले रावसाहेब दानवे हे अनुभवी आणि विशेष म्हणजे अमित शाह यांच्या 'गुडबूक'मधील नेते आहेत.
मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे दानवे यांनी प्रदीर्घकाळ नेतृत्व केले आहे. या निवडणुकीत त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुती सरकारच्या विरोधात असलेल्या रोषाचाच फटका बसला.
प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात आणि केंद्रात दोन वेळा राज्यमंत्री, पाच वेळा खासदार असल्यामुळे वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा समन्वय चांगला आहे. मराठा नेता म्हणून त्यांच्या नावाला पसंती मिळू शकते.
पक्षाशी एकनिष्ठ आणि पक्ष सांगेल ते काम करण्याची तयारी दाखवणारे रावसाहेब दानवे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपचा मराठा चेहरा म्हणून प्रभावी ठरू शकतील, असे बोलले जाते.
याशिवाय देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि त्यांच्या नेतृत्वाखालील 2014 च्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याही नावाची चर्चा नेतृत्व बदलासाठी पर्याय म्हणून पुढे येत आहे. लातूरसारख्या काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात संभाजी पाटील-निलंगेकर यांनी भाजपला 'झिरो टू हिरो' करून दाखवण्याची किमया साधली होती.
लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद अशा सगळ्याच निवडणुकीत भाजपने गरुड झेप घेत काँग्रेसच्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात धक्का दिला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा राजकीय वारसा चालवणारे संभाजी पाटील-निलंगेकर यांची लातूर जिल्ह्यावर मजबूत पकड आहे.
राज्यातील नेत्यांप्रमाणेच केंद्रातही त्यांचा संपर्क चांगला आहे. मराठा आणि तरुण चेहरा म्हणून निलंगेकर यांना पसंती मिळू शकते. तावडे, दानवे यांच्या तुलनेत निलंगेकर यांचा राजकीय अनुभव कमी असला तरी नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेता ते स्पर्धेत असल्याचे चित्र आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.