Amit Shah political plan: आमित शाहांचा कानमंत्र; डाव पलटणार, भाजप आमदार करणार सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Maharashtra Political News : भाजप आमदारांना अमित शाहांनी कानमंत्र दिला आहे. त्यामुळे या कानमंत्रानंतर आता आमदार हा डाव कशा प्रकारे पलटवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर होते. नागपूर, नांदेड व मुंबईतील कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे एकीकडे भाजप या निवडणुका स्वबळावर लढणार की महायुतीमध्ये एकत्रित लढणार यावरून खल सुरु असतानाच भाजपच्या आमदारांनी भर बैठकीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपध्दतीबद्दल नाराजी व्यक्त करीत विरोधकाना बळ दिले जात असल्याबद्दल तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर भाजप आमदारांना अमित शाहांनी कानमंत्र दिला आहे. त्यामुळे या कानमंत्रानंतर आता आमदार हा डाव कशा प्रकारे पलटवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. या यशानंतर महायुतीमधील तीन पक्षात मोठी रस्सीखेच पाहवयास मिळाली. राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून एकनाथ शिंदे (Eknath shinde) व अजितदादांनी बराच काळ ताणून धरले होते. त्यानंतर बंगले व पालकमंत्री पदावरून ही तीन पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे महायुतीमधील तीन घटक पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे पुढे आले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निधी वाटप करताना कुरघोडी केली असल्याची तक्रार एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी व आमदारांनी केली होती. त्यामुळे काही काळ वातावरण तापले होते. त्यांच्यामुळेच आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो असल्याचे शिंदे गटाच्या आमदारानी स्पष्ट केले होते तर सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्याची तक्रार करण्यात आली होती.

त्यातच आता नव्याने अमित शाह यांच्या समोर भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात तक्रारीचा पाढाच वाचला आहे. अजित पवार हे 2024 सालीच्या विधानसभेत भाजप आमदारासमोर पराभूत झालेल्या उमेदवाराना ताकद देण्याचे काम मुद्दाम करीत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अजित पवार मुद्दाम भाजपची ताकद कमी करू पाहत आहेत, याकडे लक्ष द्यावे, अशी तक्रार या भाजप आमदारांनी केली आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.

गेल्या काही दिवसापासून सातत्याने अजित पवार यांच्याकडून कुरघोड्या घालण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काम करताना अडचणी येत आहेत, त्यामुळे अशास्वरूपाच्या गोष्टींना आळा घाला, असे म्हणत भाजप आमदारांनी अमित शाह यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला आहे.

त्यानंतर अमित शाह यांनी तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना काही सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे सत्तास्थितीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भविष्यात तुमच्याऐवजी अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत, असा कानमंत्र दिल्याची माहिती सूत्राने दिली.

येत्या काळात तुम्ही अजित पवारांची तक्रार करु नका, उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा, अशी सूचना अमित शाह यांनी दिल्या. आपल्या आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मागे हटू नका, प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असा कानमंत्र अमित शाह यांनी आमदारांना दिला. आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचे आहे, त्यामुळे त्यांची कोंडी करा, असा सल्ला अमित शाह यांनी दिला. नांदेडमध्ये सभेवेळीच भाजपच्या काही आमदारांनी तक्रार केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.

त्यामुळे येत्या काळात भाजप आमदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येत्या काळात प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा भाजप आमदार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com