त्या 22 सेकंदात मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार यांच्यासह सारे सभागृह स्तब्ध!

Bhagat singh Koshyari Vs Mahavikas Aghadi संघर्षाचा परमबिंदू
Bhagat singh Koshiyari
Bhagat singh KoshiyariSarkarnama

मुंबई : राजभवन आणि सरकारमध्ये एकमेकांवर सुरु असलेल्या वादाचा आणि कुरघोडीचा उच्चांक आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या अभिभाषणाच्या वेळी गाठला. राज्यपालांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांनी मध्यवर्ती सभागृह घोषणांनी असे काही दणाणून सोडले की संतप्त झालेल्या राज्यपालांनी जेमतेम २२ सेकंदात अभिभाषण आटोपते घेत सभागृहातून नाराजी व्यक्त करुन निघुन गेल्याने संपुर्ण सभागृह स्तब्ध झाले.

राज्यपालांनी अर्धवट सोडलेले भाषण आणि राश्ट्रगीतासाठी राज्यपाल न थांबता निघून गेल्याने सर्वच सदस्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच पण अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार असल्याचा इशारा देखील मिळाला.

Bhagat singh Koshiyari
भाजपला अडचणीत आणणारं भाषण पाहताच राज्यपाल थेट सभागृहातून बाहेर?

अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून दोन्हीकडून जबरदस्त तयारी झालेली असली तरी आजचा पहिला दिवस मात्र अनपेक्षितपणे राज्यपालांनी गाजवला. राज्यपालांचे आज सकाळी अकरा विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आगमन झाले. राज्यपाल येण्यापुर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांकडून घोषणाबाजी सुरु होती. सत्ताधारी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देत होते, तर विरोधकांनी ‘नवाब मलिकांच्या राजिनाम्याची मागणी करणारे फलक झळकावत घोषणांनी सभागृह दणाणून सोडले होते.

Bhagat singh Koshiyari
video : 'भाजपची टिप्पणी आवडली नसल्याने राज्यपाल निघून गेले'

सभागृहातले वातावरण पाहून राज्यपालांनी ‘राष्ट्रगीत अगोदर होऊ द्या ’ अशी सूचना केली. राष्ट्रगीत संपल्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूंनी घोषणा सुरुच राहिल्या. घोषणांच्या गदारोळातच राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात केली मात्र काही सेकंदातच राज्यपालांनी वैतागून भाषण थांबवले. अभिभाषणातील जेमतेम एकाच मुद्दयाचा उल्लेख करत राज्यपालांनी भाषणच थांबवल्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. दुसऱ्या क्षणाला कोणाला काही कळण्याच्या आतच राज्यपालांनी सेकंदाची ही उसंत न घेता ते सभागृहातून बाहेर पडले. राज्यपाल सभागृहातून बाहेर पडण्यापुर्वी प्रथेप्रमाणे राष्ट्रगीत होते आणि त्यानंतर सभागृहाची सांगता होते. पण त्यासाठी देखील राज्यपाल थांबले नाहीत यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. यापूर्वी राज्याच्या इतिहासात कधीच राज्यपालांनी अभिभाषण संपुर्ण न वाचता ते निघून गेल्याची घटना घडली नसल्याने कोणालाच यावर काय करावे हे सुचले नाही.

Bhagat singh Koshiyari
राज्यपाल निघून जाताच विधानभवनाच्या पायऱ्यांवरच आमदाराचं 'खाली डोकं वर पाय'!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर आज प्रथमच सभागृहात ते उपस्थित होते, ते आणि त्यांच्याच शेजारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपालांच्या या कृतीमुळे अक्षरशः अवाक झाले होते. काही वेळेपुर्वी घोषणांनी दणाणलेले सभागृह राज्यपाल निघून गेल्याने काही मिनिटांसाठी स्तब्ध झाले होते. राज्यपाल निघून गेल्याने त्यांच्यामागोमाग सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ त्यांच्या मागोमाग निघून गेले. राज्यापालांनी १२ पानी ७२ मुद्दे असलेले भाषण २२ सेकंदात आटोपत घेतले. राज्यपालांनी भाषणाची सुरुवात केल्याने संपुर्ण भाषणाची प्रत पटलावर ठेवण्यात आल्याने आजचा दिवस राज्यपालांनी मात्र गाजवला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल दोन्ही सभागहाला संबोधित करतात. राज्यपाल या अभिभाषणामध्ये चालू आर्थिक वर्षात राज्यसरकारने काय काम केले याचा आढावा घेतला जातो. नवीन अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी मागील अर्थसंकल्पाचा आढावा या अभिभाषणात घेतल्याने सरकारसाठी मागचे वर्ष कसे होते आणि सरकारची विविध योजनांमागची भूमिका देखील स्पष्ट होत असते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com