वाघ यांचे कधीकाळी स्नेही असलेल्या पाटील यांना व्यासपीठावरच लाथांचा प्रसाद!

वाघ यांचे कधीकाळी स्नेही असलेल्या पाटील यांना व्यासपीठावरच लाथांचा प्रसाद!

Published on

अमळनेर : भाजप- शिवसेना, रिपाई, रासप. रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीचा आज प्रताप मिल कंपाऊंडमध्ये मेळावा झाला. मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचे रूपांतर मारहाणीत झाले. डॉ. पाटील यांना श्री. वाघ यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे मेळाव्यास गालबोट लागले असून, राज्यभरात खळबळ उडाली आहे. 

मेळावा सुरू होण्यापूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, लोकसभेचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह विविध पदाधिकारी आल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर व्यासपीठावर आल्यानंतर स्मिता वाघ यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

काही कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेत माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरविण्याची मागणी केली. या मागणीनंतर डॉ. पाटील यांच्या शेजारी बसलेले उदय वाघ यांनी उठून डॉ. पाटील यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उदय वाघ यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. पाटील यांना सुरक्षा कवच देत मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना व्यासपीठाखाली उतरवले. या राड्यानंतर डॉ. पाटील व्यासपीठावर मागच्या बाजूला जावून बसले. या दरम्यान, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गिरीश महाजन यांनी माईकचा ताबा घेत हा मारहाणीचा अड्डा नाही असे म्हणत मारहाण व घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकीद दिली. त्यानंतर स्मिता वाघ यांनीही माइकवरून कार्यकर्त्यांना शांत राहाण्याचे आवाहन केले. काही वेळेनंतर मेळाव्यास सुरवात झाली. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून, एकच चर्चा रंगली आहे.

अमळनेरचे तीन वेळा आमदार असलेले पाटील यांनीच वाघ दाम्पत्याला राजकारणात सुरवातीला सहकार्य केले होते. वाघ आणि पाटील यांचा एकमेकांशी स्नेह होता. पाटील हे भाजपचे जळगावचे जिल्हाध्यक्षही होते. ते प्रसिद्ध हृदयरोगतज्ञही आहेत.

जिल्हा भाजपची सूत्रे वाघ यांच्याकडे आल्यानंतर पाटील यांना अपमानास्पद वागणूक मिळाली होती. त्या आधीपासून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. वाघ आणि पाटील असे दोन गट पडले होते. स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविरोधात काम सुरू केले होते. वाघ यांच्या विरोधकांनी स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करण्यात यश मिळवले. त्याचा वचपा वाघ समर्थकांनी आजच्या मेळाव्यात काढला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com