बच्चू कडूंना लवकर मंत्री केले नाही तर शिंदे सरकारमध्ये स्फोट होणार?

Bacchu Kadu सध्या आक्रमक मोडमध्ये आहेत...
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

पुणे : प्रहार संघटनेचे संस्थापक-नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) हे सध्या नाराज आहेत, हे वेगळे सांगायचे गरज नाही. त्यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रीमंडळात न घेतल्याने ते सध्या आपल्या मनातील खदखद वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रीमंडळात शिक्षण राज्यमंत्री असलेल्या कडू यांना कॅबिनेट मंत्री होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात उलटे घडले आणि त्यांना 20 जूनच्या बंडानंतर आमदार म्हणूनच राहावे लागले.

या साऱ्या परिस्थितीनंतर कडू हे सरकारवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल करत आहेत. त्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विधानसभेत जोरदार भाषण केले. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी पोटतिडकिने मांडल्या. या निमित्ताने त्यांनी पक्षांतरबंदी कायद्यावर हल्लाबोल केला. हा कायदा नेत्यांना हुकूमशहा बनवत असल्याचा दावा केला. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी बोलायचे नाही का, असा सवाल करत या अधिवेशनात शेतकऱ्यांबद्दल कोणी बोलत नाही, असा सूर लावला. पावसाचे नाव कशाला बदनाम करता, खरे नुकसान तर नेतेच करत असतात, असे खडे बोलही सुनावले.

कडू हे नेहमीच स्पष्ट बोलतात. पण त्यांचे हे सारे बोलणे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात होते, हे लपून राहिले नाही. कडू हे ठाकरेंच्या विरोधात बंड करतील, असा कोणाला अंदाज नव्हता. मात्र कडूंनी अगदी ठरवून ठाकरे सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकत एकनाथ शिंदेंना साथ दिली. मात्र शिंदे हे आपला शब्द पाळत नसल्याचे ते बोलून दाखवतात. त्यांना व भरत गोगावले यांना सप्टेंबरच्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

आणखी काही दिवसांची प्रतिक्षा कडूंना करावी लागणार आहे. मात्र त्यांना त्या विस्तारातही स्थान मिळाले नाहीतर कडू हे शिंदे यांच्याविरोधात जाहीरपणे बोलण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. कडू यांच्यमागे एकच आमदार आहे. त्यामुळे ते थेट शिंदेंच्या पदाला धोका देऊ शकत नाहीत. पण वादग्रस्त बोलून सरकारला नक्कीच अडचणीत आणू शकतात. गुवाहटीत बंडखोऱ्यांच्या दौऱ्यात अनेक गुपिते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्याचा स्फोट करण्यापर्यंतही ते कचरणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटते. शिंदे यांनी आतापर्यंत तरी बंडखोर आणि अपक्ष आमदारांतील खदखद लवपून ठेवली आहे. आता सप्टेंबरच्या विस्तारात काय घडणार, यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com