Namo Maharojgar Melava : अहो आश्चर्य ! 'बेरोजगार' म्हणून बारामतीत 'महारोजगार' मेळावा !

Maharashtra Politics : बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कुणाला तरी राजकीय बेरोजगार करण्याची खेळी हा छुपा अजेंडा होता? की विकसित पश्चिम महाराष्ट्रात बेरोजगारांची फौज असून त्यास कुणाला तरी जबाबदार धरण्याचा, निष्क्रिय सिद्ध करण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून झाला...
Baramati Namo Rojgar Melava
Baramati Namo Rojgar MelavaSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 :

देशाच्या राजकारणात बारामती म्हणजे शरद पवार, बारामती म्हणजे अजित पवार, बारामती म्हणजे सुजलाम् सुफलाम् प्रदेश, बारामती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील विकसित प्रांत, बारामती म्हणजे राजकीय दिग्गजांचे शहर, बारामती म्हणजे गुळगुळीत रस्ते आणि हिरवीगार शेती, बारामती म्हणजे विकासाचे रोल माॅडेल. असे असताना बारामती म्हणजे थेट शरद पवार यांच्या बाल्लेकिल्ल्यात ते ही विद्या प्रतिष्ठान या संस्थेत नमो रोजगार महामेळावा आयोजित करण्यात आला.

नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून या भागात बेरोजगारी दाखविण्याचा आणि पश्चिम महाराष्ट्र विकसित झाला नसल्याचे चित्र यातून रेखाटण्यात तर आले नाही ना ? अशी शंका व्यक्त होत आहे. पाॅलिटिकल मॅनेजमेंट कन्सल्टंट (PMC) यांनी नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दोन प्रयत्न केले. एक म्हणजे बारामतीचा बेरोजगार आणि दुसरा म्हणजे बारामतीचे खांदेपालट.

या रोजगार मेळाव्यातून युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न होताना राजकीय खांदेपालट करण्यासाठी या मेळाव्याचा प्रमुख उद्देश दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बेरोजगार करत त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची तयारी या मेळाव्यात केल्या गेली. इतक्यावरच हा बेरोजगार महामेळावा थांबला नाही.

तर Sharad Pawar यांच्यानंतर अजित पवार यांनी बारामतीच्या विकासात महत्त्वाची, मोलाची भूमिका घेतल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मेळाव्यात ठासून सांगत अजित पवार यांची प्रशंसा केली. केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवार यांच्यामुळे हा नमो महारोजगार मेळावा यशस्वी झाल्याचे सांगितले.

बारामतीच्या इतर विकास कामांचे लोकार्पण करताना अजित पवार यांच्यामुळेच इमारतींची भव्यता, दर्जा समोर आल्याचे देवेंद्र फडणवीस सांगण्यास विसरले नाहीत. बारामती म्हणजे अजित पवार हे समीकरण युवकांच्या, स्थानिकांच्या मनात रुजविण्याचा यशस्वी प्रयत्न या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीने केला.

Baramati Namo Rojgar Melava
BJP Candidates List : भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रासह, ज्येष्ठांना डच्चू; तर ओबीसींवर फोकस अन्...

देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवार यांना पोलिस वसाहती, पोलिसांच्या इमारतींसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (PMC) करण्याची घोषणा केली. अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दाखविलेला विश्वास हा लोकसभा निवडणुकीची सुनेत्रा पवार यांच्यासाठी साखर पेरणी होती. अजित दादांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाब्या आहेत. त्यामुळे बारामतीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री दिली.

महायुती सरकार राजकारण विरहित काम करत असून मराठा आरक्षण, पोलिस भरती यावर मुख्यमंत्र्यांनी फोकस केला. हे सांगताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे रोजगार मेळावा, थेट नियुक्ती पत्रे देण्याचा संकल्पना पूर्णत्वास जात असल्याचे सांगितले. एक प्रकारे इंडीया' व महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शरद पवार यांना 'नमो महारोजगार मेळाव्याचे' महत्त्व मुख्यमंत्र्यांनी विषद करून सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख केंद्र असलेल्या बारामती ( पुणे जिल्ह्यातील एक तालुका) येथे कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यांचा नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बारामतीत आज आणि उद्या हा रोजगार मेळावा होणार आहे. हा रोजगार मेळावा बारामतीत का आयोजित केला हा महत्त्वाचा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या टाॅपचा जिल्हा असलेल्या पुण्यात आणि शरद पवार यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या बारामतीत, पश्चिम महाराष्ट्रात तरुण-तरुणी बेरोजगार आहेत हे दाखविण्याचा उद्योग नमो महारोजगार मेळाव्यातून करण्यात आला. येथील बेरोजगार तरुणांच्या मदतीला महायुतीचे सरकार आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामतीमधील एअरपोर्ट सारखे बसस्थानक, चकचकीत पोलिस कार्यालय, गंगनचुंबी पोलिस वसाहत झाली. हे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री द्वयींनी केला. या माध्यमातून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना राजकीय शह देत त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा राजकीय उदय करण्याचा संकल्पच एकप्रकारे या मेळाव्याच्या माध्यमातून केल्याचे चित्र होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात झालेल्या इतर नमो महारोजगार मेळाव्या इतकी प्रसिद्धी मिळाली नाही जितकी बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्याला मिळाली. 55 हजार जागा असताना 35 हजार बेरोजगार युवकांचे अर्ज पहिल्या दिवशी येथे आले. थेट शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात रोजगारासाठी महायुती धावून आली, हे दाखविण्याचा महायुतीचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यातून राज्य सरकारने नरेंद्र मोदी (नमो) यांच्या सहाय्याने रोजगार दिला गेला, हे चित्र थेट 'इंडिया' व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या समोर उभे केले गेले.

भविष्यात महायुतीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी कुठलीही काटकसर केली नाही. राजकीय शहकाटशह देताना बारामतीच्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत नव मतदार तरुणांसाठी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून संधी निर्माण केल्या गेली. त्यातून राजकीय स्वार्थ देखील साधला गेला.

खासदार सुप्रिया सुळे यांना या कार्यक्रमाला बोलवित त्यांच्या लोकसभा मतदारसंघात नमो महारोजगार मेळावा अजित पवार यांनी यशस्वीपणे आयोजित केला. या मेळाव्या मागे पाॅलिटिकल मॅनजेमेंट कन्सल्टंट यांनी घेतलेली मेहनत स्पष्टपणे अधोरेखित झाली. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला.

मेळाव्यात अजितदादांनी वाहन चालक महिला पोलिस कर्मचारी यांचे उदाहरण देत महिलांना संधी देण्याचे काम महायुती सरकार करत आहे, असे सांगितले. यातून त्यांनी थेट भविष्यातील खासदार पदासाठी महायुती कोणाला संधी देणार हे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले. भविष्यात बारामतीचे मतदार कोणाला बेरोजगार करतात आणि कोणाला महारोजगार देतात हे पाहण्यासारखे ठरेल.

Baramati Namo Rojgar Melava
BJP Candidates List : भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रासह, ज्येष्ठांना डच्चू; तर ओबीसींवर फोकस अन्...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com