Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 पैकी एकट्या विदर्भात एकूण 62 मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत विदर्भातील 42 मतदारसंघांत महाविकास आघाडीला, तर केवळ 17 मतदारसंघांत महायुतीला आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आघाडीला मोठ्या विजयाची आशा आहे.
तर लोकसभेतील चुका टाळून यावेळी महायुतीनेही कंबर कसली आहे. विजयाची खात्री असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी देण्यासोबतच आघाडीच्या मतांमध्ये फूट कशी पडेल, यावर भर देण्याचे नियोजन भाजपने सुरु केले आहे.
2014च्या निवडणुकीत विदर्भाने भाजपच्या (BJP) पारड्यात तब्बल 44 जागा टाकल्या होत्या. त्यामुळेच भाजपला 122 जागांचा आकडा गाठता आला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ शकले. 2019 मध्ये मात्र विदर्भाने भाजपला चांगलाच शॉक दिला होता. विदर्भातूनच 15 जागा कमी झाल्याने राज्यात भाजपला अवघ्या 105 जागांवर समाधान मानावे लागले होते. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपला कसरत करावी लागली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपची झोप पुन्हा उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विदर्भाचे आणि त्यातही नागपूरचे आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी नेतेही विदर्भातील आहेत. दोन्ही पक्षांनी विदर्भातील किमान 35 ते 40 जागा जिंकण्याचे ‘टार्गेट’ ठरविले आहे. सध्या लाडकी बहीण, वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प, विदर्भासाठीचा निधी आदींवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपानंतर बंडखोरीचा मोठा धोका असल्याचे चित्र दिसते आहे.
पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम व बुलढाणा या पाच जिल्ह्यांतील एकूण 30 जागांपैकी 15 जागा सध्या भाजपकडे आहेत. शिवसेना चार , काँग्रेस पाच, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन व दोन अपक्ष आमदार आहेत. अमरावतीत भाजपचे अल्प अस्तित्व आहे, तर बुलढाणा, अकोला जिल्ह्यात काँग्रेसला मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे बडनेरा, अमरावती, कारंजा, चिखली, खामगाव, अकोट, अकोला पश्चिम, वणी, राळेगाव, दिग्रसवर महाविकास आघाडी डोळा ठेवून आहे.
पूर्व विदर्भातून नागपूर शहर व जिल्हा, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली मिळून एकूण 32 जागा आहेत. पैकी 14 आमदार भाजपकडे आहेत. काँग्रेसकडे 10, राष्ट्रवादीकडे 3 व अपक्ष 4 आहेत. तर अपक्षांपैकी बहुतेक महायुतीकडे आहेत. नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत भाजपचा प्रभाव कमी झालेला दिसतो आहे. नागपूर शहर वगळता भाजपला चांगलीच कसरत करावी लागेल. काँग्रेसने नागपूर ग्रामीण, नागपूर शहरातील चार मतदारसंघ, चंद्रपूर जिल्ह्यातील सहापैकी पाच मतदारसंघ, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियावर ‘फोकस’ केले आहे. पूर्व विदर्भातून किमान 20 जागा जिंकण्याची आघाडीची योजना आहे. तर महायुतीला या भागात मोठी कसरत करावी लागणार आहे.
विदर्भात भाजपचे अनेक आमदार हे अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अॅन्टी इन्कम्बन्सी आहे. शेतीमालाला भाव नसणे, पीक कर्ज, बेरजेच्या राजकारणाचा अभाव हे भाजपसाठी आव्हानात्मक आहे. आघाडीतील नेत्यांना एकीचे बळ कळले आहे. मतविभाजनासाठी आघाडीतील बंडखोरांना रिंगणात उतरविण्याची भाजपची व्यूहरचना राहू शकते. वंचित बहुजन आघाडीकडे पूर्वीप्रमाणे बघण्याचा मतदारांचा कल दिसून येत नाही. त्यामुळे वंचितचा खूप उपद्रव होईल, अशी स्थिती सध्या तरी नाही.
लाडकी बहीण, वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प, या मुद्द्यांचा लाभ
काही विद्यमान अपक्षांचा कल बाजूने
- लोकसभेतील पराभवाचा धक्का,
- जुन्या चेहऱ्यांबाबत अॅन्टी इन्कम्बन्सी, घटक पक्षांच्या महत्त्वाकांक्षा
- विदर्भातील दहापैकी सात खासदार महाविकास आघाडीचे.
- दलित, मुस्लिम व आदिवासी समाज बऱ्यापैकी मागे
- लाडकी बहीण, वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प, विदर्भासाठी मोठा निधी हे मुद्द विरोधात
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.