येत्या 28 तारखेला मुख्यमंत्री महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करणार :अशोक चव्हाण

विरोधकांची कुत्र्या, मांजराशी तुलना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टिका करतांना उद्या हीच कुत्री, मांजरी तुम्हाला फाडून खालल्याशिवाय राहणार नाही . -अशोक चव्हाण
येत्या 28 तारखेला मुख्यमंत्री महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करणार :अशोक चव्हाण

औरंगाबादः  " येत्या 28 तारखेला विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेतल्या जातील. सरकारची पुर्ण तयारी झालेली आहे", असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी औरंगाबादेत बोलतांना केला .  

सिडको भागातील राजीव गांधी स्टेडियमवर अशोक चव्हाण यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य आणि केंद्र सरकारवर टिका करतांनाच लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभेच्या देखील निवडणुका घेण्यात येणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

केंद्र आणि राज्यातील भाजप-सेनेचे सरकार उखडून फेकायचे असेल तर मतांचे विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आमच्या सोबत यावे अशी साद देखील चव्हाण यांनी यावेळी घातली. आपण वेगळे लढलो तर भाजपचा फायदा होईल. गेल्यावेळी केवळ 30 टक्के मत मिळवून देखील शिवसेना-भाजप सत्तेवर आली, आणि सत्तर टक्के मते विरोधी पक्षांना मिळून देखील आपल्याला सत्तेबाहेर बसावे लागले होते याची आठवणही त्यांनी उपस्थितांना करून दिली.

मी प्रकाश आबंडेकरांना पाचवेळा भेटलो, काय तडजोड होऊ शकते हे मी त्यांना सांगितले आहे. प्रकाश आबंडेकरांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवण्याची कॉंग्रेसची प्रामाणिक इच्छा आहे. जागांची तडजोड होऊ शकते, ती मोठी गोष्ट नाही. पण एकोप्याने राहिलो तरच शिवसेना-भाजपला आपण खाली खेचू शकतो अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत येण्यासाठी साद घातली.

कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा संपली असली तरी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय संघर्ष संपणार नाही. दोन महिने थांबा, देशाला कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही. यावेळी पुन्हा तीच चूक केली आणि मोदी सरकार आणले तर आम्हाला मतदानाचा अधिकार देखील राहणार नाही असा इशारा देखील चव्हाण यांनी उपस्थिातंना दिला.

चौकीदार चोर नाही, तो ईमानदार आहे, पण देशाचा चौकीदार चोर आहे असे म्हणत देशभरातील चौकीदारांना का बदनाम करता? असा सवाल करतांनाच शहर आणि जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाला पंधरा-वीस वर्षापासून निवडून  येणारे शिवसेनेचे खासदार आणि महापालिकेतील सत्ताधारी जबाबदार असल्याची टिका त्यांनी केली. जायकवाडी धरण शेजारी असतांना शेती, उद्योग आणि शहरातील लोकांना, प्यायला पाणी मिळत नसेल तर इथले सत्ताधारी काय करतात असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी केला.

विरोधकांची कुत्र्या, मांजराशी तुलना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टिका करतांना उद्या हीच कुत्री, मांजरी तुम्हाला फाडून खालल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतांनाच आगामी काळात आश्‍वासनांचा अक्षरशा पाऊस पडणार आहे, पण त्यात वाहून जाऊ नका असे आवाहन देखील चव्हाण यांनी उपस्थितांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com