
आपल्या देशांत कम्युनिस्ट पक्षांच्या कार्याचा तेजोभंग करण्यासाठी तसेच, समाजातील खरे शोषित कम्युनिस्ट चळवळीकडे न जाता, जातजाणीवांच्या चिखलातच रूतून बसावेत, यासाठी जाणीवपूर्वक आरोप केले जातात. प्रसंगी रचण्यात येतात. त्यापैकी एक म्हणजे कम्युनिस्ट नेते ‘उच्चवर्णीय’ असतात.
याला पूर्ण छेद देणारा अनुभव म्हणजे, १९४२ पासून पुण्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पहिले नेते कमलताई भागवत, वसंतराव तुळपुळे, दि. के. बेडेकर यांच्यासोबत भाई टिळेकर, हनुमंत जक्का, भाई थॉमस तर नंतर फत्तेसिंग पवार, शंकरराव गायकवाड, एकनाथ बाराथे, भाई चितळे, शांताताई रानडे, मधुकर रानडे होती. त्यांच्यामध्ये कोणत्या जाती दिसत होत्या? अगदी उच्चवर्णीय कोकणस्थांपासून तथाकथित दलित, ख्रिश्चन, मराठा सर्वच होते आणि नेतृत्वस्थानी होते.
१९६४ मधील पक्षफुटीमध्ये पुणे जिल्ह्याच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शाखेतील कोणीच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले नाहीत. १९७३ मध्ये समाजवादी चळवळीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात आलेले प्रभाकर मानकर हे पक्षाच्या पुणे शाखेचे पहिले चिटणीस झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली २० वर्षे पक्ष चालला. मी स्वत: त्यांच्यासोबत १३ वर्षे काम केले. या पैकी ११ वर्षे त्यांची जात माहीत होण्याचा किंवा विचारण्याचा प्रश्न खरे तर कधीच आला नाही.
पण १९८९ नंतर संपूर्ण राजकारणाचे ‘मंडलीकरण’ आणि ‘धर्मांध कमंडलीकरण’ सुरू झाल्यानंतर कम्युनिस्ट पक्षावरच हितसंबंधियांकडून उच्चवर्णीयत्वाचे आरोप होऊ लागले. अशाच एक मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना मानकरांनी सहजपणाने एकदा सांगितले की, “अरे, जातीच्या नावाखाली खऱ्या मुक्तिलढ्यापासून पळून जाऊ नका. माझ्यासमोर या. मी स्वतः एका धनगर कुटुंबातून आलो आहे. लाल बावट्याचा एकनिष्ठ पाईक आहे. लक्षात घ्या की, खरा मुक्तिदायी क्रांतिकारी लढा जातीच्या संघटना-पक्ष करू शकत नाहीत, तर कम्युनिस्ट पक्षच करू शकतो.”
मानकरांबद्दलची एक आठवण त्यांच्या पत्नी सिंधुताई मानकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रामध्ये आहे. त्या लिहितात, “१९६२ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी डॉ. राममनोहर लोहियांची पुण्यामध्ये सभा घेण्यात आली होती. कबुतरखान्यात ही सभा होती. त्या सभेत मानकरांचंही भाषण झालं. ते लोहियांना खूप आवडलं. स्टेजवर भाई वैद्य होते. लोहिया त्यांना म्हणाले, ‘‘ये पूना के बम्मन लोग बहुत होशियार है। बहुत अच्छा भाषण किया इसने।’’ यावर भाई वैद्य त्यांना म्हणाले, ‘‘डाक्टरसाब, ये बम्मन नही है। ये तो पिछडा है।’’ हे ऐकताक्षणीच डॉ. लोहिया खुर्चीवरुन उठले आणि त्यांनी मानकरांना स्टेजवर मिठी मारली आणि म्हणाले, ‘‘अगले बार मैं पूना में आऊंगा, तब तेरे घर में ठहरुंगा - तेरे बिबी ने बनाया हुआ खाना खाऊंगा !’’
मी आज कित्येक वर्षे कामगार चळवळीत आहे. मी लिहिलेले अनेक लेख, पुस्तिका, मुलाखती, भाषणे प्रसिद्ध होतात. अर्थात् माझ्या विचारानुसार कामगार शेतकरी वर्गाची सामाजिक-राजकीय-आर्थिक वकिली त्यात माझ्याकडून केली जाते. पण वाचकांना आश्चर्य वाटेल की, माझा आयुष्यात पहिला प्रसिद्ध झालेला लेख हा चक्क प्राध्यापकांच्या संपाविरुद्ध होता. वर्ष होते १९७३. महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला मी होतो. महाराष्ट्रातील प्राध्यापकांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यावेळी मला डाव्या विचाराचा गंधही नव्हता. पण सामाजिक विचार करण्यास सुरुवात मात्र झाली होती. वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीप्रमाणे लिहिण्याची खुमखुमी म्हणूनदेखील असेल कदाचित्, पण मी प्राध्यापकांच्या मागण्या आणि कारणे थोडीही समजून न घेताच, काँग्रेसचे नेते आणि पत्रकार अनंतराव पाटील यांच्या ‘विशाल सह्याद्री’ या वृत्तपत्रात लेख लिहिला की, समाजातील प्राध्यापक, डॉक्टर आणि पत्रकार हे पवित्र व्यवसाय आहेत. त्यांना संपाचा अधिकार असता कामा नये.
संपावर त्याचा काहीही परिणाम होण्याची शक्यता नव्हतीच. पण त्यामुळे मला भलताच आत्मविश्वास आला. मी संपादकांना भेटलो. मला वार्ताहर म्हणून विनामूल्य का होईना, काम करण्याची संधी द्या असा चक्क अर्ज केला आणि त्यांनी तशी संधी दिली. वसंत व्याख्यानमालेचे वार्तांकन करू लागलो.
१९७५-७६ मध्ये मार्क्सवादी विचाराने डोळे उघडले. १९७७-७८ मध्ये पुण्यातील लालनिशाण पक्षाच्या नेतृत्वात चालणाऱ्या कामगार कर्मचारी परिषदेने महाराष्ट्रात कामगारांचे स्वतःचे म्हणून एक दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. कामगार संघटनांनी कामगारांकडून जमा केलेल्या निधीमधून त्या पक्षाचे नेते कॉम्रेड अप्पासाहेब भोसले, कॉम्रेड यशवंत चव्हाण, कॉम्रेड भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ‘श्रमिकविचार’ हे वृत्तपत्र निघू लागले. कंपन्यांच्या जाहिराती मिळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दररोज सर्व वृत्तपत्राच्या चार पानांचा आदल्या दिवसाचा मजकूर हाताने ‘डी कंपोज्’ करायचा. नंतर तेवढाच मजकूर नव्याने रात्री ९ पर्यंत ‘हँडकंपोज’ करायचा.
‘श्रमिकविचार’ हे ‘महाराष्ट्र हेराल्ड’च्या मालकीच्या छापखान्यात छापले जात असे. त्यावेळी अन्य प्रस्थापित वृत्तपत्रांत ऑफसेट मशीन आलेली होती. मात्र ते परवडणे शक्यच नसल्याने आम्ही मात्र ‘हॅडकंपोज’वरच होतो. यात पूर्ण वेळ पत्रकार-सहसंपादक म्हणून काम करण्यासाठी होते आमच्या महाविद्यालयातील मार्क्सवादी विचाराने प्रेरित झालेले पाच नव्या दमाचे २०-२२ वर्षांचे तरूण. त्यामध्ये मी न्यू इंडिया ऍश्युरन्स या सरकारी कंपनीतील कायम नोकरीचा राजीनामा देऊन आलेलो होतो. त्यापैकी एक होते ‘मराठवाडा’ या वृत्तपत्रातून राजीनामा देऊन आलेले आजचे पत्रकारितेमधील एक अग्रगण्य नाव असणारे जयदेव डोळे. असो.
मुद्रणातील एका चुकीच्या शब्दामुळे एक ‘राजकीय मुद्राराक्षस’ कसा जन्म घेऊ शकतो, याचा अनुभव आम्ही त्यावेळी घेतला. एका डाव्या राजकीय नेत्याच्या भाषणाचा वृत्तान्त छापताना असे शीर्षक छापले गेले की, “कामगारवर्गाने चळवळीचे सशस्त्र निशाण उभे केले पाहिजे.
” प्रत्यक्षात तो नेता म्हणाला होता की, ‘कामगारवर्गाने चळवळीचे सशक्त निशाण उभे केले पाहिजे..’ सशस्त्र निशाण ही तर नक्षलवादी चळवळीची भूमिका होती. ‘श्रमिक विचार’ची तसेच पक्षाची भूमिका नक्षलवादी भूमिका नाकारणारीच होती. शिवाय त्याचे कायदेशीर परिणामदेखील गंभीर आणि फौजदारी स्वरूपाचे होते.
रात्री पाने लावून संपादनाचे काम संपवून अप्पासाहेब भोसले, भास्करराव जाधव गेले. पहाटे त्यांनी पहिला अंक पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात ही चूक आली. पण अंकाचे गठ्ठे तर एसटी, रेल्वे पार्सलसाठी गेलेले होते. ताबडतोब कार्यकर्त्यांना पळपळ करून तिथे पाठविण्यात आले. गठ्ठे परत घेण्यात आले. जे आधीच परगावी गेले होते, तेथे ट्रंककॉल करून अंक वितरित न करता नष्ट करण्यास सांगण्यात आले. आणि मग सकाळी झालेल्या आमच्या उपसंपादकांच्या बैठकीत अप्पासाहेबांनी आमची जी खरडपट्टी काढली, ती आयुष्यात विसरणे शक्य नाही. त्यामुळे कोणताही लेख लिहताना त्यातील असे मुद्रणदोष पाहण्याची जी सवय लागली ती कायमचीच!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.