Nana Patole News: नानाभाऊ, व्हेंटिलेटर तर काढलेच नाही....

Sanjay Dhotre News: राजकीय नेते मंडळी जनतेला कायम व्हेंटिलेटरवर ठेवतात. अकोल्यातील निवडणुकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष आहे. मतदार आता कोणाला व्हेंटिलेटरवर ठेवतो हे पाहण्यासारखे असेल.
Nana Patole,  Sanjay Dhotre
Nana Patole, Sanjay DhotreSarkarnama

Akola Lok Sabha Election 2024 : 2019 ची लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांना मंत्रीपद मिळाले. पण, दुर्धर आजाराने संजय धोत्रे हे अंथरुणावर खिळले आणि चार वर्षापासून अकोल्याच्या खासदाराचे दर्शन झाले नाही, अशी ओरड राजकीय नेत्यांनी केली. इतकेच काय तर थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस उमेदवार डाँ.अभय पाटील (Abhay Patil) यांचा अर्ज दाखल करताना दिलेल्या भाषणात संजय धोत्रे यांचे व्हेंटिलेटर निवडणुकीत काढले जाईल, असा अंदाज व्यक्त करत राजकारणाची पातळी किती घसरली याचा परिचय करुन दिला. पण, नानाभाऊ गेल्या काळात संजय धोत्रे यांचे व्हेंटिलेटर काढले नाही. त्यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलेली भुमिका आणि अपेक्षा येथे फोल ठरली.

कुणाचे मरण चिंतु नये असे म्हणतात पण, राजकारणात तेही करण्याची तयारी काही राजकीय नेत्यांची दिसून आली. या व्हेंटिलेटर शब्दाने खरोखर अकोल्यात शेवटच्या घटका मोजणाऱ्या काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले. काँग्रेस उमेदवार मात्र निवडणुकीच्या रिंगणात आणत वंचितला चितपट करण्याची तयारी काँग्रेसने अकोल्यात आखली आहे. त्यासाठी काँग्रेसचे संघटन नसताना अभय पाटील यांनी स्वतःच्या सामर्थ्यावर ही निवडणूक अतितटीची केल्याचे चित्र आहे. निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात याकडे संपुर्ण राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागले आहे.

भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांना ते केवळ खा.संजय धोत्रे यांचे सुपुत्र असल्याने तिकीट मिळाले. त्यांचे राजकीय करिअर शुन्य आहे. घराणेशाहीतुन मिळालेल्या या तिकिटाने अकोल्यातील काही मतदार नाराज आहे. इतकेच नाही तर बदल पाहिजे, असा नकारात्मक स्वर भाजप उमेदवाराबद्दल आहे. देशात मोदी पाहिजे पण, अकोल्यात धोत्रे नको, असा काय तो स्वर मराठा बहुल भागातुन गुंजत आहे. याला कारण देखील तितकेच महत्वाचे आहे. मराठा आरक्षण, मराठा मोर्चाचे नेतृत्व करणारे डॉ. अभय पाटील हे मराठा उमेदवार म्हणून काँग्रेसने उभे केले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील रिसोड मध्ये केवळ वंचित विरोधात काँग्रेस अशीच फाईट होणार असून त्याने भाजपसाठी संपूर्ण वातावरण टाईट केले आहे.

अकोट आणि तेल्हारा यांना जोडणारा जीवघेणा रस्ता हा अकोट विधानसभा मतदार संघात निर्णायक ठरणार आहे. या विधानसभा मतदार संघात भाजपाबद्दल तीव्र नाराजी आहे. ही नाराजी केवळ या भागातील रस्त्याचे रखडलेले काम आणि त्यामुळे निर्माण झालेली दुरावस्था यामुळे समोर आली आहे. मतदानातून हा विरोध मांडण्याची तयारी मतदारांची आहे. पण, मतदार नेमके वंचितला मतदान करतात की, काँग्रेसला हे पाहण्यासारखे असेल. रिसोड, अकोट, तेल्हारा या ठिकाणी भाजपाला स्थानिक विषयावरुन नाकारण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यात नवखे उमेदवार असलेले अनुप धोत्रे हे केवळ मोदी मॅजिक आणि भाजपच्या पुण्यकर्मावर मते मिळवतील.

Nana Patole,  Sanjay Dhotre
P.N. Patil ON Bajirao Khade: पक्षाकडे न मागताच उमेदवारी कशी मिळेल, पी. एन. पाटलांनी खाडेंना सूनावले

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गटाची ताकद अकोल्यात नाही. त्यामुळे ते मतदारांना प्रभावित करतील आणि त्यांनी प्रभावित केलेली मते ही भाजपला वळती होतील, असा अंदाज बांधणे राजकीय दृष्ट्या विहिरीत ढकलण्यासारखे आहे. राष्ट्रवादीचे वाचळवीर नेते जे ग्रामपंचायत जिंकु शकत नाही ज्यांनी भाजपाला नेहमी पाण्यात पाहिले त्यांनी भाजपचा प्रचार केला तरी भाजपची परंपरागत मते देखील दूरावतील अशी भिती आहे. त्यामुळे अशा नेत्यांना दूर न ठेवण्यात भाजप किती यशस्वी झाले हे पाहण्यासारखे ठरेल.

अभय पाटील यांच्यासोबत शिवसेना (उबाठा) काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते या निवडणुकीत डॉ. पाटील यांच्यासोबत होते. पण, सहकार गट आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कोणासोबत आहे असा प्रश्न अनुत्तरीत आहे. नेत्यांचा पक्ष असलेला काँग्रेस मुस्लिमांची किती मते घेणार यावर अकोल्याचे गणित सुनिश्चित होणार आहे. मराठा, मुस्लिम आणि ओबीसी मतदार काँग्रेसला न्याय देईल काय हे पाहण्यासारखे ठरेल.

वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास सोबत आघाडी केली नाही. त्यांनी स्वतंत्र लढत देत विचारांचा लढा कायम ठेवला. वंचितच्या मोठमोठाल्या सभा, सोशल मिडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असलेला पक्ष म्हणुन वंचितकडे पाहिले जाते.रिसोड, मालेगाव, तेल्हारा, अकोट, बाळापूर आणि पातुर या ठिकाणी वंचित च्या सभांना मिळालेले पाठबळ शहरात तितके अधोरेखित करणारे नव्हते. काही भागात मुस्लिमांनी स्वतःहुन वंचितला दिलेला पाठिंबा, गेल्या दोन निवडणुकीत मुस्लिमांमुळे आंबेडकर पडल्याचे शल्य मुस्लिम समाजात समोर येत असल्याचे चित्र आहे.

मुस्लिमांमुळे आंबेडकर पडले हा शिक्का अकोलेकर मुस्लिम बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदा मुस्लिम समाज वंचित सोबत येतो का हे पाहण्यासारखे असेल. इतकेच नाही तर गरिब मराठ्यांना आरक्षणाच्या मुद्यावर समर्थन देणारे आणि मनोज जरांगे पाटील यांचे आदर्श असलेले आंबेडकर यांना मराठा विशेषतः गरिब मराठा मतदान करेल काय असा प्रश्न कायम आहे.

अकोल्यातील ही निवडणुक वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भवती केंद्रीत आहे. सुप्रिया सुळे यांना बारामतीत पाठिंबा देणाऱ्या आंबेडकरांना अकोल्यातील सहकार गटाचा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता असून त्याने राजकीय चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा सर्व राजकीय परिस्थितीत लग्नसराई ही मोठी अडचण राहणार असून घटणारे मतदान हे कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहण्यासारखे असेल.

Nana Patole,  Sanjay Dhotre
मोदी, मोदीचा गजर ; सीतारामन ते राजनाथसिंह सेकंदात उभे | PM Narendra Modi Lok Sabha Entry | #shorts

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी संजय धोत्रे यांचे व्हेंटिलेटर काढण्याचे भाकित निवडणुकीत पुर्ण झाले नाही. पण,जनता भविष्यात व्हेंटिलेटरवर राहणार नाही याची दक्षता अकोलेकर मतदार घेणार आहे. जवळपास 19 लाख मतदार अकोल्याचा खासदार निवडणार असून किती टक्के मतदान अकोल्यात होते यावर विजयाचे आणि पराभवाचे गणित निश्चित होईल.

अकोल्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादकांमध्ये असलेली चीड, अकोट, तेल्हारा रस्त्याची दुर्दशा, पालखी मार्गाचे रखडलेले काम आणि जिल्ह्यातील सिंचनाचा अभाव, रखडलेले इतर विकास प्रकल्प, विकास कामांची घसरलेली गुणवत्ता आणि उड्डाणपुलाचे वाजलेले तीनतेरा, न झालेले रेल्वेचे आरओबी पाहता मतदार कोणाला कौल देतो हे पाहण्यासारखे असेल. कारण या सर्व गोष्टींनी मतदार मात्र व्हेंटिलेटवर आहे. राजकीय गदारोळात मतदाराचे व्हेंटिलेटर तर कोणी काढणार नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com