Dalit Panther History: ‘दलित पँथर’ अभी भी जिंदा है!

Arjun Dangle ON Dalit Panther Formation:महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकात ही प्रेरणा अन् ऊर्जा घेऊन आलेल्या ‘दलित पँथर’ या लढाऊ संघटनेचा प्रभाव अन् पाऊलखुणाही महाराष्ट्राच्या मातीवर कायम आहेत. या संघटनेचा सक्रिय साक्षीदार म्हणून मी वावरलो, याचा मला अभिमान आहे.
Dalit Panther History
Dalit Panther HistorySarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात

  1. दलित पँथरची स्थापना – 1972 मध्ये नामदेव ढसाळ आणि ज.वि. पवार यांच्या नेतृत्वाखाली दलित साहित्य चळवळीमधून ‘दलित पँथर’ संघटनेची निर्मिती झाली. तिच्या प्रेरणेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ चळवळ होती.

  2. सामाजिक संघर्षाची गरज – त्या काळात दलितांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात केवळ लेखन पुरेसे नाही, ठोस लढा उभारावा लागेल या भूमिकेतून ही संघटना उभी राहिली.

  3. स्थापना दिनावरील मतभेद – 9 जुलै 1972 ही तारीख बहुतांश मान्य असली तरी ज.वि. पवार 29 मे 1972 चा दावा करतात. तरीही ‘दलित पँथर’ हे एक सामूहिक वैचारिक आंदोलन होते, एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी नव्हती.

अर्जुन डांगळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ ही संघटना प्रारंभीच्या काळात स्थापन केली होती. सर चिमणलाल सेटलवाड तिचे अध्यक्ष होते. विविध समाजांतील बुद्धिवादी समाजसुधारक या संघटनेत होते. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असे या संघटनेचे बोधवाक्य होते.

महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकात ही प्रेरणा अन् ऊर्जा घेऊन आलेल्या ‘दलित पँथर’ या लढाऊ संघटनेचा प्रभाव अन् पाऊलखुणाही महाराष्ट्राच्या मातीवर कायम आहेत. या संघटनेचा सक्रिय साक्षीदार म्हणून मी वावरलो, याचा मला अभिमान आहे.

‘दलित पँथर’चे सगळ्याच कारभाऱ्यांना ‘नेते’ ही संज्ञा आहे. ते कवी-लेखक होते. दलित साहित्याची चळवळ ही जोरकसपणे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात फोफावत होती. प्रस्थापित साहित्याची, मूल्यांची आणि साहित्यक्षेत्रातील जीवनमूल्यांची समीक्षा केली जात होती.

दलित जीवनातील अनुभव, आशय आणि अन्वयार्थ मराठी साहित्यात उमटत नव्हता. बाबासाहेबांनी सामाजिक पुनर्रचनेचा मांडलेला आग्रह या दलित साहित्याचा प्रेरणास्रोत होता. या दशकात दलितांवर सामाजिक अत्याचार वाढत चालले होती. केंद्र सरकारने नेमलेल्या पेरूमल समितीच्या अहवालात देशभरात एक हजार ११७ दलितांच्या कत्तली झाल्याचे नमूद केले होते.

रिपब्लिकन पक्षात गटबाजीमुळे निष्क्रियता होती. अशा पार्श्वभूमीवर दलित साहित्याद्वारे या अत्याचारांविरुद्ध केवळ कथा-कविता लिहून चालणार नाही, तर ठोस कृती केली पाहिजे, असे तरुण लेखकांना वाटत होते. अमेरिकेतील कृष्णवर्णीय साहित्यिकांनी तेथील वंशवादी गोऱ्यांविरुद्ध ‘ब्लॅक पँथर’ ही संघटना स्थापन करून वाङ्‍मयीन अन् सशस्त्र लढा दिल्याचा तपशील या दलित लेखकांना ज्ञात होत होता.

Dalit Panther History
Mahadevi Elephant Case: 'महादेवी'निमित्त पेटले राजकारणाचे रण! नेत्यांचे छुपे धोरण

विशेषत: डॉ. म. ना. वानखडे यांनी अमेरिकेत जाऊन आल्यानंतर ‘ब्लॅक लिटरेचर’ आणि ‘ब्लॅक पँथर’चा पट मांडला अन् दलित लेखकांनी कृष्णवर्णीयांसारखे बंडखोर होण्याचे आवाहन केले. त्याला निमित्त झाले ते इंदापूर तालुक्यातील बावडा या गावी सवर्णांनी टाकलेल्या सामाजिक बहिष्काराचे. वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन् आम्ही काही लेखकांनी म्हणजे मी, राजा ढाले, नामदेव ढसाळ यांनी ‘युवक आघाडी’ स्थापन केली. ‘बावडा प्रकरण’ या युवक आघाडीतर्फे लढविले गेले. ही आघाडी फार काळ टिकली नाही आणि नंतर ‘ब्लॅक पँथर’च्या धर्तीवर ‘दलित पँथर’ची स्थापना झाली.

‘दलित पँथर’ची स्थापना ही दलित साहित्य चळवळीतून झाली. त्यामुळे दलित साहित्य अन् ‘दलित पँथर’ यांचे नाते हे माय-लेकराचे आहे हे भान ठेवले तर ‘दलित पँथर’च्या निमित्ताने जे अनेक वादांचे निराकरण होऊ शकते.

‘दलित पँथर’च्या निमित्ताने लेखक-कवींनी अन्याय-अत्याचाराविरुद्ध संघर्ष करणारी संघटना स्थापणे, ही देशातील पहिलीच घटना असावी.अशा या ‘दलित पँथर’चा पन्नासावा वाढदिवस म्हणजेच सुवर्णमहोत्सव महाराष्ट्रात दोन-तीन वर्षांपूर्वी मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला. त्या निमित्ताने ‘दलित पँथर’चे संस्थापक कोण, ‘दलित पँथर’च्या जन्माची तारीख यासंबंधी अकारण धुरळा उडविला गेला.

‘दलित पँथर’चे कार्यक्षेत्र म्हणजे कामाठीपुरा अन् आसपासचा परिसर. प्रल्हाद चेंदवणकर जवळच माझगावला राहायचा. मी मात्र चेंबूरला राहत होतो पण नामदेवची अन् माझी घट्ट मैत्री. शिवाय माझे ‘बीपीटी’चे ऑफिस जवळच म्हणजे माझगावला होते, म्हणून मी नामदेवच्या सातत्याने संपर्कात असायचो. नामदेव ढोर चाळीत, तर ज. वि. पवार बाप्टी रोडवर राहायचा. राजा ढाले ‘दलित पँथर’च्या स्थापनेच्या प्रक्रियेत नव्हता हे समस्त जनास जाहीर करतो. ‘दलित पँथर’ची स्थापना केल्याचे नामदेव आणि ‘ज.वि.’ या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिले आहे, मात्र त्यांच्या नोंदीत मेळ नाही.

नामदेव लिहितो, ‘९ जुलै १९७२ रोजी चर्नी रोडला समाजवादी पक्षाच्या ऑफिसमधून उतरल्यावर मी आणि ज. वि. पवार यांनी ‘पँथर’ची स्थापना केली.’ तर ज.वि. लिहितो, ‘गिरगावात मी आणि नामदेव रस्त्यावर चालताना २९ मे १९७२ रोजी ‘दलित पँथर’ची स्थापना केली. मला ‘दलित’ हा शब्द सुचला, तर नामदेवला ‘पँथर’ हा शब्द सुचला.’ पण ज. वि. या तारखेविषयी ठाम नाही. त्यावेळी ‘साप्ताहिक मनोहर’च्या मुलाखतीत १२ मे रोजी ‘दलित पँथर’ची स्थापना झाल्याचे त्याने नमूद केले आहे.

नामदेव ढसाळ आणि ज. वि. पवार यांचा ‘पँथर’ची स्थापना अन् जडणघडणीत मोठा वाटा असल्याचे सत्य नाकारण्यात काही अर्थ नाही पण स्थापनेच्या संदर्भात हे अर्धसत्य आहे. कुठलीही संघटना ही कोणाची व्यक्तिगत मक्तेदारी नसून, सामूहिक वैचारिक घुसळणीचा कृतिशील आविष्कार असतो.

Dalit Panther History
Maharashtra Congress : घराणेशाही पुन्हा वरचढ; नवख्यांचीही ‘घुसखोरी’

या संदर्भात ‘नवाकाळ’मध्ये १९ जून १९७२ रोजीच्या बातमीत म्हटले होते, की महाराष्ट्रात जातिद्वेषाने पिसाट थैमान मांडले आहे. दलित विद्वेषाची चूड पाजळून महाराष्ट्रातील सधन शेतकरी, सत्ताधारी अन् त्यांचे आश्रित स्पृश्य गुंड यांनी सध्या माणुसकीचे शिरकाण करणारे अनन्वित अत्याचारांचे सत्र सुरू केले आहे.

जातिद्वेषाच्या किळसवाण्या अस्तित्वाचा समूळ नायनाट करण्यासाठी मुंबईतील विद्रोही तरुणांनी ‘दलित पँथर’ संघटनेची नुकतीच स्थापना केली आहे. या संघटनेच्या प्रचारसभा महिनाभर मुंबईत होत आहेत. प्रचारकार्य प्रामुख्याने ज. वि. पवार, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, विजय गिरकर, प्रल्हाद चेंदवणकर, रामदास सोरटे, कांडीराम थोरात, उत्तम खरात अन् अर्जुन कसबे वगैरे मंडळी करीत आहेत.

९ जुलै १९७२ ला बाप्टी रोड येथे ‘दलित पँथर’चा पहिला मेळावा झाला अन् त्यात ‘दलित पँथर’च्या स्थापनेवर शिक्कामोर्तब झाले. गर्भधारणा कधी झाली यावरून जन्मतारीख ठरत नसते; जन्म झाल्यावरच ती ठरते. बहुतेक सगळेच ९ जुलै १९७२ हीच तारीख मान्य करतात; पण ज. वि. पवार २९ मे १९७२ वरच अडून बसले आहेत.

राजा ढाले सप्टेंबर १९७२ मध्ये सात रस्ता येथे कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आले अन् ‘पँथर’मध्ये सामील झाले. ‘साधना’ साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाची पार्श्वभूमी त्यात होती. ‘दलित पँथर’ला शक्ती, प्रसिद्धी आणि ऊर्जा मिळाली हे सत्य असले, तरी ‘पँथर’ बरखास्त करण्याचा नैतिक अधिकार ढालेंना नव्हता. ते संस्थापक, सदस्यही नव्हते पण ‘पँथर’चे एक संस्थापक अन् ज्यांनी रस्त्यात ‘दलित पँथर’ला जन्म दिला, त्या ‘ज. विं.’नी ‘दलित पँथर’च्या बरखास्तीच्या निर्णयाला पाठिंबा देणे कितपत नैतिक आहे?

त्यानंतरही २९ मे १९७२ हा ‘दलित पँथर’चा जन्मदिवस कवटाळत बसून ‘दलित पँथर’चे सोहळे साजरे करणे कितपत नैतिक? त्यांच्या या २९ मे च्या दाव्याचा पुरावा म्हणून एक कागदही त्यांच्याकडे उपलब्ध नाही. ‘दलित पँथर’ ही आंबेडकरी चळवळीतील लढाऊ ऊर्जा झालेली प्रवृत्ती आहे. ती कोणी बरखास्त केली म्हणून मरणारी नाही. म्हणून म्हणावेसे वाटते ‘पँथर अभी भी जिंदा है!’

FAQ

Q1: दलित पँथरची स्थापना कधी झाली?
👉 अधिकृतपणे 9 जुलै 1972 रोजी मुंबईत ‘दलित पँथर’ची स्थापना झाली.

Q2: ‘दलित पँथर’ची प्रेरणा कुठून मिळाली?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांबरोबरच अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ चळवळीने प्रेरणा दिली.

Q3: दलित पँथरचे प्रमुख संस्थापक कोण मानले जातात?
👉 नामदेव ढसाळ आणि ज.वि. पवार यांना संस्थापक मानले जाते.

Q4: दलित साहित्य आणि दलित पँथर यांचे नाते काय आहे?
👉 दलित साहित्य हेच दलित पँथरच्या आंदोलनाचे प्रेरणास्रोत आणि पायाभूत आधार होते.

(Edited by: Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com