AAP Delhi Cabinet Minister List : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी या शनिवारी (21) सप्टेंबरला शपथ घेणार आहेत. आपमधील काही नेतेही त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतील. यामुळे आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत. जेलमधून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पक्षाने आतिशी यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होऊ शकते. तोपर्यंत आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री असणार आहेत.
'आप' सरकारमधील सर्वात मोठा चेहरा असणारे अरविंद केजरीवाल सरकारमध्ये सहभागी नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय पक्षाचे इतर बडे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. दिल्लीत 2013 पासून आतापर्यंत 'आप'चे सरकार होते. 2013 ते 2024, अशा अकरा वर्षांत 'आप'ची राजकीय कारकीर्द कशी होती, याबद्दल जाणून घेऊया.
भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनाने आम आदमी पक्षाला जन्म दिला. जनलोकपालसाठी आंदोलन करणाऱ्या लोकांच्या गटाचा 2012 मध्ये आम आदमी पार्टी नावाचा राजकीय पक्ष उदयास आला. जेव्हा दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका झाल्या ज्यात आप भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर आला. डिसेंबर 2013 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीर झालेल्या निकालात भाजपला 31, 'आप'ला 28 आणि काँग्रेसला आठ जागा मिळाल्या. उर्वरित प्रत्येकी एक जागा शिरोमणी अकाली दल, बसपा आणि जेडीयूला मिळाल्या होत्या.
त्यामुळे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्रिशंकू विधानसभेत भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यावर, आपने काँग्रेसच्या बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केले. अरविंद केजरीवाल 28 डिसेंबर 2013 रोजी पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, गिरीश सोनी, राखी बिर्लान, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि सोमनाथ भारती या सहा जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. विभागांची विभागणी झाली तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी गृह, वित्त, ऊर्जा, दक्षता, नियोजन आणि सेवा ही खाती स्वत:कडे ठेवली.
पत्रकारितेतून राजकारणी झालेले मनीष सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, पीडब्ल्यूडी, नागरी विकास, स्थानिक स्वराज्य संस्था, जमीन आणि इमारत या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. आयआयटी पदवीधर सोमनाथ भारती यांच्याकडे प्रशासकीय सुधारणा, कायदा, पर्यटन आणि संस्कृतीची जबाबदारी आली.
त्यावेळी केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री असलेल्या राखी बिर्लान यांनी समाजकल्याण, महिला आणि बालविकास आणि भाषा ही खाती सांभाळली. गिरीश सोनी यांच्याकडे कामगार, विकास कौशल्य विकास आणि SC/ST विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. आरोग्य, उद्योग आणि गुरुद्वाराच्या निवडणुका सत्येंद्र जैन यांना देण्यात आल्या. कॉम्प्युटर सायन्समधील बी.टेक सौरभ भारद्वाज यांच्याकडे अन्न व पुरवठा, वाहतूक, पर्यावरण, निवडणूक आणि सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.
28 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीत सत्ता हाती घेतल्यानंतर अवघ्या 49 दिवसांनी केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयकाच्या मुद्द्यांवरून फेब्रुवारी 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अशाप्रकारे पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या आप सरकारचा पहिला टर्म 50 दिवसही टिकू शकला नव्हता.
फेब्रुवारी 2014 मध्ये केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील वर्षी 2015 मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकींमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष प्रचंड बहुमताने सत्तेत परतला. दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 67 जागा 'आप'ने जिंकल्या. उर्वरित तीन जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेल्या. केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी 2015 रोजी दुसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. केजरीवाल यांच्यासोबत इतर सहा मंत्र्यांनीही शपथ घेतली. पक्षाच्या 49 दिवसांच्या सरकारच्या काळात वादात सापडलेले दोन चेहरे सोमनाथ भारती आणि राखी बिर्लान यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. केजरीवाल यांच्या टीममधला दुसरा सर्वात मोठा चेहरा मनीष सिसोदिया यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.
असे पहिल्यांदाच घडले की विभागांची विभागणी झाली तेव्हा केजरीवाल यांनी एकही विभाग स्वत:कडे ठेवला नाही. सिसोदिया यांना वित्त आणि नियोजन, महसूल, सेवा, वीज, शिक्षण, उच्च शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, तंत्रशिक्षण, प्रशासकीय सुधारणा ही प्रमुख खाती देण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांकडे नगरविकास, भूमी व इमारत, दक्षता विभाग आणि इतर सर्व विभागांची जबाबदारीही देण्यात आली होती जी कोणत्याही मंत्र्याला देण्यात आली नव्हती.
तिसरा कार्यकाळ आम आदमी पक्षासाठी आव्हानांनी भरलेला होता. खुद्द मुख्यमंत्री केजरीवाल आणि इतर दोन मंत्री वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगात गेले. मे 2022 मध्ये, ईडीने दिल्लीचे तत्कालीन आरोग्य मंत्री सत्येंद्र कुमार जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. मार्च 2023 मध्ये, ईडीने दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू धोरण प्रकरणात अटक केली होती. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी फेब्रुवारी 2023 च्या अखेरीस मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या संकटाच्या काळात, मार्च 2023 मध्ये, आप सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, सौरभ भारद्वाज आणि आतिशी या दोन आमदारांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. सौरभ यांच्याकडे आरोग्य आणि आतिशी यांच्याकडे शिक्षणासह अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार आला. यानंतर शासनाच्या काही विभागांमध्ये फेरबदल करण्यात आले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला. मार्च 2024 मध्ये, ED ने केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. दुसरीकडे, दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांनी एप्रिल 2024 मध्ये मंत्रीपद आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पदांचा राजीनामा दिला. अबकारी धोरण घोटाळ्याच्या निषेधार्थ राजकुमारने पदाचा राजीनामा दिला.
13 सप्टेंबर रोजी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सशर्त जामीन मिळाला. त्याच दिवशी दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेले केजरीवाल बाहेर आले. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा दिला.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी 15 सप्टेंबर रोजी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा जाहीर करून सर्वांना चकित केले. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 18 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जोपर्यंत लोक त्यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाहीत तोपर्यंत आपण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नसल्याचे केजरीवाल म्हणाले. दुसरीकडे, विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये नवे मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे जेलमधून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पक्षाने आतिशी यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला.
पाच कॅबिनेट मंत्र्यांसह अतिशी 21 सप्टेंबरला दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात केजरीवाल सरकारच्या चारही मंत्र्यांचा समावेश असेल, तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सुलतानपुरी येथून विजयी झालेले मुकेश अहलावत नवीन चेहरा दिल्ली सरकारमध्ये असेल. दिल्लीतील राज निवास येथे मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेणार आहेत. त्यासोबतच गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन हे नव्या सरकारमध्ये मंत्री असतील, असे आप नेत्यांनी सांगितले. हे चारही मंत्री केजरीवाल मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. अबकारी धोरण घोटाळ्याच्या निषेधार्थ पदाचा राजीनामा देणाऱ्या राजकुमार आनंद यांच्या जागी मुकेश अहलावत मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.