

दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, आजही दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. आंबेडकरांनी नागपूर येथील दीक्षाभूमी मैदानावर विधिवत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांनी बौद्ध धर्मच का निवडणला हे जाणून घेऊया
दारिद्र्य, अज्ञान,सामाजिक अन्याय आणि दारिद्र्य यापासून दलितांना मुक्ती लाभावी व आत्मसन्मानाने जगता यावं यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
या ऐतिहासिक घटनेच्या सुमारे 4 महिने आधी म्हणजे 24 मे, 1956 रोजी मुंबईच्या नरे पार्कवरील बुद्धजयंतीच्या समारंभातच बाबासाहेबांनी 'ऑक्टोबर महिन्यात आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहोत', अशी घोषणा केलेली होती. त्यानंतर सर्व नियोजन करून 23 सप्टेंबर, 1956 रोजी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. नागपूर येथे १४ ऑक्टोबर म्हणजे विजयादशमीच्या दिवशी सकाळी ९ ते ११च्या दरम्यान आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याचं घोषित केलेलं होतं.
या धर्मांतरापूर्वी २० वर्ष आधी म्हणजे 13 ऑक्टोबर, 1935 रोजी महाराष्ट्रातील येवले इथे झालेल्या परिषदेत 'आपले माणुसकीचे साधे अधिकार मिळवण्यासाठी आणि हिंदू समाजामध्ये समान दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी ही चळवळ निष्फळ ठरली आहे...म्हणून 'जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल, समान हक्क देईल आणि योग्य तन्हेने वागवील अशा एखाद्या दुसऱ्या धर्मात जावं असं तुम्हाला वाटत नाही काय?' असा प्रश्न उभा करून त्यांनी धर्मांतराबाबतच्या विचारांचं सुतोवाच केलं होतं. याच प्रसंगी खंत व्यक्त करताना 'मी अस्पृश्य जातीत जन्मास आलो. हा काही माझा अपराध नाही; परंतु मरताना मात्र मी हिंद म्हणून मरणार नाहीं' असं ते म्हणाले होते.
धर्मातरापूर्वी म्हणजे, 1956च्या मे महिन्यात 'बीबीसी'वरून केलेल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धर्म का आवडतो, याबाबत सविस्तर भाष्य केले होते. "मला बौद्ध धर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्ववं सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वं शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला त्यांची आवश्यकता आहे. एकदा बौद्ध धर्म सामाजिक तत्त्व आहे, असं मान्य झालं म्हणजे त्याचं पुनरुज्जीवन ही एक चिरकालीन घटना होईल," असे ते म्हणाले होते.
या सोहळ्याच्या आधीच्या दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर, 1956 रोजीही माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून बौद्ध धर्म स्वीकारामागील आपली भूमिका आंबेडकरांनी स्पष्ट केली. "आम्ही आपलं मनुष्यपण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. मी एकदा अस्पृश्यांच्या प्रश्नासंबंधी गांधीजीशी चर्चा करत असताना त्यांना म्हणालो होतो की, अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी तुमच्याशी माझे मतभेद असले, तरी वेळ येईल तेव्हा मी या देशाला कमीत कमी धोका होईल, असा मार्ग स्वीकारेन. बौद्ध धर्म स्वीकारून मी या देशाचं जास्तीत जास्त हित साधत आहे, कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. या देशाची संस्कृती, इतिहास यांच्या परंपरेला धक्का लागणार नाही, अशी मी खबरदारी घेतली आहे... भगवान बुद्धाने जी धर्मतत्त्वे उपदेशिली आहेत तीच मी पाळणार आहे. हीनयान आणि महायान या बौद्ध धर्मातील पंथांमुळे जे मतभेद झाले आहेत त्यांपासून मी माझ्या लोकांना अलिप्त ठेवणार आहे. आपला बौद्ध धर्म म्हणजे एक प्रकारचा नवबौद्ध धर्म किंवा नवायान आहे," असे आंबेडकर म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.