Maratha Reservation News : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आठ जणांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले होते. दि. १ सप्टेंबर रोजी या आंदोलनाला गालबोट लागले. (Jalna Maratha Protest) उपोषणकर्ते जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या बाचाबाचीतून पुढे महाभारत घडले.
लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार, दगडफेक यातून आंदोलक आणि पोलिस अशा दोन्ही बाजूंचे शेकडो जण गंभीर जखमी झाले. (Maratha Reservation) या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आणि इकडे राज्यातील नेत्यांकडून अंतरवालीत धाव घेण्याची स्पर्धा सुरू झाली.
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे अडीच वाजता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अंतरवाली सराटी गाठत जरांगे व पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली. त्यापाठोपाठ संभाजीराजे छत्रपती हेही अंतरवालीत दाखल झाले. (Marathwada) त्यांनी जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना धीर देत सरकारवर आसूड ओढले. (Jalna) छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सरकार चालवता, मग आरक्षण का देत नाही? असा संताप त्यांनी व्यक्त केला होता.
नेत्यांची अंतरवाली सराटीकडे धाव...
त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे योगायोगाने एकाचवेळी अंतरवालीत आले होते. त्यांच्यासोबत राजेश टोपेही होते. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, संजय राऊत हे दि. २ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आंदोलकांच्या भेटीला आले. एकीकडे नेत्यांची अंतरवाली सराटीत गर्दी, तर दुसरीकडे बाहेर रस्त्यांवर आंदोलने असे चित्र होते. अंतरवाली सराटीत आंदोलकांची भेट घ्यायला आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या नेत्यांची गर्दी अद्यापही सुरूच आहे.
विरोधकांप्रमाणेच सत्ताधारी पक्षाचे मंत्री, नेते हेदेखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील दुवा म्हणून भूमिका बजावत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, संभाजीनगरचे संदीपान भुमरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अध्यक्ष राज ठाकरे, नेते अमित ठाकरे.
तसेच मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, राजरत्न आंबेडकर, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, उदयसिंह राजपूत, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या नेत्यांनी अंतरवाली सराटीत येऊन मराठा आरक्षणसंदर्भात आपली भूमिका मांडली. या सगळ्याच्या केंद्रस्थानी होते ते मनोज जरांगे पाटील. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्कात होते.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.