
गणेशोत्सवाचा इतिहास पाहता त्याचे प्रयोजन समाजाच्या संघटनेसाठी असल्याचे लक्षात येते. गणेशोत्सवासाठी संघटित झालेले लोक समाज आणि देशाच्या भल्यासाठी काम करतील, अशी अपेक्षा आहे. स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करतानाही या मूळ उद्देशाचे स्मरण करणे आवश्यक आहे.
आपल्याकडे कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी श्रीगणेशाची पूजा केली जाते. सर्व संकटांचं निवारण करणारा विघ्नहर्ता सर्व विद्या आणि कलांचाही अधिपती आहे. ओंकारस्वरूप गणेशाची कोणत्याही रूपात पूजा बांधता येते. त्याची मूर्तीही भक्ताला तो जसा दिसतो, त्या रूपात साकारली जाते. व्यक्तिगत आणि सार्वजनिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे रूपही तसेच आहे. जसा भक्त, तसा गणेश आणि तसाच त्याचा उत्सव.
वैदिक, बौद्ध, जैन आदी भारतीय परंपरांमध्ये श्रीगणेशाची पूजा हजारो वर्षांपासून आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यास सुरुवात केली, त्याच्याही आधी, आता आणि नंतरही घराघरांमध्ये त्याचे पूजन होत होते आणि होत राहणार आहे. घरात बाप्पा येतो, तो आनंद घेऊन येतो.
कुटुंबातले लहान-थोर सारे एकत्र येऊन त्याचे स्वागत करतात. तो कधी दीड दिवसांचा, गौराईसोबत सात दिवसांचा, दहा दिवसांचा पाहुणा असला, तरी त्याच्या षोडशोपचारात कुठेही कमतरता नसते. मी कसब्यातील वाड्यात राहत असताना रोज संध्याकाळी एकेका घरी सामूहिक आरती होत असे आणि प्रसाद वाटला जात असे. बाप्पाचं आगमन हे केवळ निमित्त. त्यानिमित्त एकत्र येणं आणि परस्परांशी मोकळा-ढाकळा संवाद होणं हेच त्यातलं मुख्य आकर्षण. घरगुती स्वरूपात साजरा होणाऱ्या गणेशाच्या या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं ते लोकमान्य टिळकांनी.
मुळात गणपती – गणांचा अधिपती ही संघटनेची देवता आहे. भगवान शंकरांच्या नाना प्रकारच्या गणांचे नेतृत्व करणारा तो गणाधीश. त्याचे हे स्वरूप लक्षात घेऊन लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लोकांनी एकत्र यावं म्हणून तो सार्वजनिकरीत्या साजरा करण्याची प्रेरणा दिली. मुंबईत १८९०च्या दशकात झालेल्या हिंदू-मुस्लीम दंग्यांची पार्श्वभूमीही त्याला होती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेले लोक संघटित होऊन समाज आणि देशाच्या भल्यासाठी काही काम करतील, अशी अपेक्षा त्याही वेळी होती व आजही आहे.
गणेशोत्सवाचा सव्वाशेहून अधिक वर्षांचा इतिहास आपण पाहतो, तेव्हा त्याचे प्रयोजन समाजाच्या संघटनेसाठी असल्याचे लक्षात येते. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करतानाही या मूळ उद्देशाचे स्मरण करणे आवश्यक आहे. गणेश मंडळाचा आणि सामाजिक संस्थेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी उत्सवाकडे त्याच दृष्टीने पाहतो.
गणपतीचे दहा दिवस आणि खूप आधीपासून चालणारी उत्सवाची तयारी हा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचा भाग आहे. बालमंडळापासून त्याची सुरुवात होते. गल्लीतल्या मोठ्या मंडळाकडे पाहून आपलाही छोटा मांडव व बाप्पा असावा, यासाठी लहान मुलंमुली एकत्र येतात. मोठे त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असतात आणि त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सर्व प्रकारची मदत करत असतात. आईबाबांकडून पूजेचं साहित्य, प्रसाद हट्टाने मागून आणला जातो. काही कमी पडलं, तर शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून घेतलं जातं. समाजात मिसळण्याचं हे शिक्षण आहे.
ही मुलं-मुली मोठी होत जातात, तसतशा त्यांच्यावर मोठ्या मंडळाच्या जबाबदाऱ्या येत जातात आणि सार्वजनिक कार्यकर्ता म्हणून त्यांची घडण होत राहते. गाव, वाडा, गल्ली, सोसायटी, मोठा परिसर अशा वस्तीच्या स्वरूपानुसार त्यांच्या अनुभवांची व्याप्तीही कमी-जास्त होते. ‘एक्स्पेरेन्शियल लर्निंग’ - अनुभवातून समाजशिक्षण देणारी अशा प्रकारची व्यवस्था आज तरी आपल्याकडे दुसरी नाही.
गणेशोत्सवावर सर्रास टीका करण्याची फॅशन सध्या रूढ झाली आहे. त्याकडे केवळ नकारात्मक दृष्टीनेच पाहिले जाते. यातले किती जण प्रत्यक्ष उत्सवात सहभागी होऊन त्यात काही चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करतात? किती जण सार्वजनिक जीवनात स्वतः सक्रिय असतात? परिसरातल्या छोट्या-मोठ्या समस्या सोडवण्यासाठी कोण पुढाकार घेतात? उत्सवात ‘डीजे’चा वापर किंवा इतर चुकीच्या गोष्टी शिरल्या असतील, तर त्यात दुरुस्ती बघ्यासारखे बाहेर राहून व टीका करण्याने होणार आहे की, प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्यकर्त्यांना समजावून सांगून होणार आहे? दुर्दैवाने यातला मोठा भाग केवळ शहाजोगपणे गणेशोत्सव कार्यकर्त्यांना शहाणपणा शिकवण्याचा असतो. त्याचं वाईट वाटतं.
वयाच्या आठव्या-नवव्या वर्षांपासून गणेशोत्सवात सक्रिय सहभाग असल्याने आणि सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता म्हणून उत्सवातील संवेदनशीलता, उपक्रमशीलता आणि विधायकता जवळून पाहिली असल्याने त्याची ही बाजू सर्वांसमोर आली पाहिजे, असं मला वाटतं. एका लेखाच्या मर्यादेत ते शक्य होणार नाही. पण काही ठळक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करणार आहे.
बाल-तरुण कार्यकर्ते गणपतीची वर्गणी मागायला जातात, तेथपासून त्यांच्या शिक्षणाची सुरवात होते. आपल्या परिसरात राहणारी मंडळी कोण आहेत, याची त्यांना ओळख होते. काहींशी चांगल्या गप्पा होतात. मात्र, अनेकांच्या कपाळावर आठ्या असतात. वैयक्तिक गरजांसाठी मोठा खर्च करणाऱ्यांचा वर्गणी देताना हात आखडता असतो. वर्गणी स्वतःहून वाढविणे तर बाजूला, लहान वयाच्या कार्यकर्त्यांवर तोंडसुख घेण्यातच काहींना मजा वाटते.
अनेक मंडळे जमाखर्चाचा वार्षिक अहवाल काटेकोरपणे देत असतात. तरी संशयाची सुई हटत नाही. त्यामुळे ‘वर्गणी नको, पण तोंड आवरा’, असं म्हणण्याची वेळ येते. सार्वजनिक जीवनातला हा पहिला धडा असतो. आपली बाजू लोकांना पटवून देण्याबरोबरच, कितीही मानापमान सहन करावे लागले, तरी हाती घेतलेले काम सोडायचे नाही, याचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना मिळते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांची अरेरावी किंवा खंडणीसारखे प्रकार होत असतील, तर ते अपवादानेच आहेत, असे मी ठामपणे सांगू शकतो.
पुरेशी वर्गणी जमली नाही, तर प्रायोजक मिळविण्याशिवाय, जाहिरात कमानी लावल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या अशा गोष्टी कमी करायच्या आणि गणेशोत्सव ‘आत्मनिर्भर’ करायचा, तर सुशिक्षित सुस्थापित नागरिकांनी त्यासाठी पुढे आलं पाहिजे. त्याचबरोबर वर्गणीच्या रूपाने मिळणारा पैसा निगुतीने व चांगल्या उपक्रमांसाठी कसा वापरायचा, याचे शिक्षणही गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांना मिळेल. यातीलच अनेक जण पुढे राजकीय, सामाजिक क्षेत्रांत नेतृत्व करत असल्याने सचोटी व प्रामाणिकपणाचे धडे या शाळेतून मिळणे आवश्यक आहे. ही सर्व समाजाची जबाबदारी आहे.
मांडव उभारण्यापासून ते प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूक, देखावा, दहा दिवसांतले उपक्रम आदींचे नियोजन आणि ठरल्याप्रमाणे ती पार पाडण्यात कार्यकर्त्यांची मोठी शक्ती पणाला लागत असते. त्यासाठी प्रत्यक्ष वेळ द्यावा लागतो. उभं राहून कामे करून घ्यायला लागतात. घरातल्यांचा ओरडा खाऊन, नोकरी-व्यवसायातील जबाबदाऱ्या सांभाळून झोकून देऊन काम करणाऱ्या अशा असंख्य कार्यकर्त्यांची फौज हे गणेशोत्सवाचे खरे वैभव आहे. त्याची दखल सर्व समाजाने घेणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवातील देखाव्यांमध्ये पौराणिक प्रसंगांबरोबरच तत्कालीन प्रश्नांचे, समाजवास्तवाचे प्रतिबिंब उमटत असते. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, अवकाश मोहिमांवर आधारित देखाव्यांचाही त्यात समावेश असतो. काही ठिकाणी नाट्यरूपाने प्रत्यक्ष इतिहास उभा केला जातो. पथनाट्यांमधून सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाते. संगीताधारित व सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे आदींचे आयोजनही गणेश मंडळे करतात.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या मंडपात अथर्वशीर्ष पठणासाठी मोठ्या संख्येने जमणाऱ्या महिला हेही समाजाच्या विधायक शक्तीचे प्रतीक आहे. दहा दिवस चालणारा हा उत्सव निर्विघ्नपणे आणि आनंदाने पार पडावा, यासाठी गणेश मंडळांचे हजारो कार्यकर्ते अखंडपणे राबत असतात. शासकीय यंत्रणा आणि पोलिसांचे त्यात साहाय्य होत असले, तरी या उत्सवाचा गोवर्धन कार्यकर्त्यांची सामूहिक शक्तीच तोलून धरत असते.
विसर्जन मिरवणुका, त्यांचे बदलते स्वरूप आणि त्यात करता येऊ शकणाऱ्या सुधारणा हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मात्र, या लेखाच्या संदर्भात मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांच्या वाढलेल्या सहभागाची नोंद घेणे आवश्यक होते. ऐंशी-नव्वदच्या दशकात प्रामुख्याने नूमवि, रमणबाग, कामायनी आदी शाळांमधील विद्यार्थ्यांची झांज-लेझीमीची पथके मिरवणुकीत सहभागी होत असत. मावळ आणि मुळशी भागातली ढोल-ताशा पथके हा सर्वांच्या आकर्षणाचा भाग होता. ज्ञान प्रबोधिनी, स्व-रूपवर्धिनी, रमणबाग, गरवारे सारख्या पथकांनी त्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला. ते ऐकता ऐकता आपल्यालाही असे वाजवता येईल का आणि मिरवणुकीत सहभागी होता येईल का, या इच्छेतून हळूहळू वादनपथकांची संख्या वाढत गेली.
सेलिब्रिटी व कलाकारांच्या सहभागातून त्याला नवी झळाळीही (ग्लॅमर) मिळाली. मला ही स्वागतार्ह बाब वाटते. मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धक आणि ‘डीजें’च्या भिंतींपेक्षा तरुणाईचा पारंपरिक वादनातून प्रत्यक्ष मिरवणुकीतील सहभाग हा केव्हाही श्रेयस्कर आहे. त्याचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करणे शक्य आहे आणि मिरवणुकीच्या वाढत चाललेल्या वेळावरही उपाय करणे शक्य आहे, असं मला वाटतं.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपाने प्रकट होणारी कार्यकर्त्यांची संघटित शक्ती वर्षभर विविध उपक्रमांमधून सक्रिय कशी राहील, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाईसारखी मोठी मंडळे ससूनमध्ये गरजू रुग्णांना भोजनसेवेसारखे उपक्रम राबवत आहेत. आरोग्य तपासणी, रक्तदान, अवयवदान यासारखे उपक्रमही प्रासंगिक स्वरूपात राबवले जातात. मात्र, त्याही पुढे जाऊन गणेश मंडळं परिसरातील नागरिकांसाठी शक्तिकेंद्रं म्हणून स्थायी स्वरूपात कशी उभी राहतील आणि स्वतःच्या संघटित शक्तीचं दर्शन समाजाला सतत कसं घडत राहील, यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. बुद्धिदात्या गणेशाच्या आशीर्वादातून ते निश्चितच शक्य होऊ शकेल.
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता आणि संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख आहेत.)
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.