पणजी : पुढील वर्षी गोवा विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election) होणार आहे. भाजपचा (BJP) मित्रपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीनेच (GFP) काँग्रेसचा (Congress) हात धरल्याने निवडणुकीचे चित्र पालटले आहे. काँग्रेसच्या नेत्यांना फोडून धक्का देणाऱ्या पक्षांनाच यामुळे धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसनेही (TMC) या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसने एकाच बाणात दोन पक्षी आता मारले आहेत.
गोव्यात 2017 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी गोवा फॉरवर्ड पार्टीने (GFP) भाजपला पाठिंबा दिला होता. या पक्षाचे तीन आमदार असले तरी ते थेट सत्तेत सहभागी झाले नव्हते. या वर्षी एप्रिल महिन्यात पक्षाच्या अध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे हा पक्ष कोणासोबत जाणार याची उत्सुकता होती.
हा पक्ष स्वतंत्रपणे लढणार की काँग्रेस, तृणमूल काँग्रेस अथवा आम आदमी पक्षाचा हात धरणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर या पक्षाने काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या तृणमूलचा यामुळे भ्रमनिरास झाला आहे. मागील काही दिवसांपासून गोवा फॉरवर्ड पार्टीला आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न तृणमूल आणि आप करीत होते. अखेर यात काँग्रेसची सरशी झाली आहे.
हा पक्ष तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करेल, असे संकेत सातत्याने मिळत होते. परंतु, पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आमदार विनोद पालेकर व अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांच्यासोबत दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतरच दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाल्याचे निश्चित करण्यात आले. राहुल गांधी यांनीच काल (30 नोव्हेंबर) ट्विट करून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, गोव्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी गोवा फॉरवर्ड पार्टीने काँग्रेसला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सहयोगाबद्दल आनंदी आहे. विजय सरदेसाई, विनोद पालेकर आणि प्रसाद गावकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.
गोव्यातील लोकशाही विरोधी भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, असे सरदेसाई यांनी या भेटीनंतर सांगितले. दोन्ही पक्षांची आघाडी झाल्याने गोव्यात खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला बळ मिळल्याची चर्चा आहे. एकीकडे भाजप आणि दुसरीकडे आप व तृणमूल काँग्रेसनेही राज्यात जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेसला सरदेसाई यांची साथ मिळाल्याने ताकद वाढली आहे. भाजपसमोरील अडचणी मात्र, आता आणखी वाढल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.