भाजप रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारण्याची जोखीम घेणार?

भाजप रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारण्याची जोखीम घेणार?

लेवाबहुल रावेर मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे निर्विवाद वर्चस्व आहे. विविध आरोपांनंतर मंत्रिपदापासून दूर झालेल्या खडसेंना भाजपने अडीच वर्षांत न्याय दिला नसल्याने नाराजी आहे. दुसरीकडे त्यांच्या स्नुषा रक्षा यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपात या मतदारसंघाचा अद्याप निकाल लागलेला नाही. त्यामुळे अनिश्‍चिततेचे वातावरण असून, खडसेंच्या भूमिकेभोवती येथील राजकारण फिरत आहे.

जळगाव : रावेर मतदारसंघातील सहापैकी जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर आणि मलकापूर पाच विधानसभा मतदारसंघांत भाजप; तर चोपड्यात शिवसेनेचे आमदार आहेत. जातीय समीकरणात, या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 40 टक्के मतदार लेवा समाजाचे, त्याखालोखाल मराठा आणि नंतर माळी, कोळी, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी आहेत. मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचाच उमेदवार निवडून येतो, हा इतिहास आहे.

 
खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील गटबाजी लपून राहिलेली नाही. खडसेंना विविध आरोपांमधून निर्दोषत्व मिळूनही पक्षाकडून न्याय मिळालेला नाही. तशी खंत ते वेळोवेळी जाहीरपणे बोलूनही दाखवितात. अशा स्थितीत मतदारसंघातून रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारीची संधी मिळते की नाही, याबद्दलही चर्चा आहे. रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारली, तर भाजपपुढे माजी खासदार आणि रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांचे नाव समोर आहेच. खडसे मंत्रिपदी नसले तरी मतदारसंघात त्यांचे वर्चस्व असल्याचे विरोधकही मान्य करतात. त्यामुळे खडसेंच्या मदतीशिवाय या ठिकाणी कोणताही उमेदवार निवडून येणे अशक्‍य नसले तरी कठीण नक्कीच आहे. त्यामुळे भाजप रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारण्याची जोखीम घेणार का, हा प्रश्‍नच आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या समीकरणात हा मतदारसंघ पूर्वीपासून कॉंग्रेसचे वर्चस्व असूनही सध्या राष्ट्रवादीकडे आहे; परंतु राष्ट्रवादीकडे त्यासाठी सक्षम उमेदवार नाही. खडसे भाजपवर नाराज असल्याने त्यांच्या भूमिकेची राष्ट्रवादीला प्रतीक्षा आहे. खडसेंनी भाजप सोडणार नाही, असे वारंवार स्पष्ट केले आहेच. रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली, तर त्यात बदल होण्याची शक्‍यताही नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी अथवा दुसऱ्या नावाचा विचार करावा लागेल. दुसरीकडे कॉंग्रेसने त्यावर दावा केला असून, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील त्यासाठी सज्ज आहेत. 

------- 

2014 ची मतविभागणी 
रक्षा खडसे (भाजप) : 6,05,452 (विजयी) 
मनीष जैन (राष्ट्रवादी) : 2,87,384 

-------- 

मतदारसंघातील प्रश्‍न 
- केळी निर्यातीसाठी वाहतूकव्यवस्था सज्जतेची गरज 
- मतदारसंघातील विविध सिंचन प्रकल्प पूर्ण होणे आवश्‍यक 
- तापी नदीवरील महाकाय जलपुनर्भरण योजना कार्यान्वित होणे गरजेचे 
- जामनेरातील टेक्‍स्टाइल पार्कची मुख्यमंत्र्यांची घोषणा अद्याप हवेतच 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com