इम्तियाज जलील यांनीच घातला अखेर गुटख्याच्या अड्ड्यावर छापा... 

इम्तियाज जलील यांनीच घातला अखेर गुटख्याच्या अड्ड्यावर छापा... 

औरंगाबाद : औरगांबादेत सर्रास सुरु असलेला गुटख्याचा अवैध धंदा बंद करावा यासाठी वांरवार मागणी करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी स्वत:च शिवशंकर कॉलनीतील एका गुटखा अड्यावर जाऊन धाड टाकली. विशेष म्हणजे धाड टाकल्यानंतर इम्तियाज यांनीच याची माहिती पोलिसांना देत त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांनी कार्यवाही सुरू केली. 

शहरात गुटख्यांचे अवैध अड्डे असून बंदी असतांनाही त्याची सर्रासपणे विक्री होत असल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला होता. नशाबंदी अभियानाच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या विविध भागातील दारूच्या दुकानांवर जाऊन आंदोलन करत पोलीसांना सहा महिन्यांच्या आत अवैध दारू, गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

नशाबंदी आंदोलनाचा इशारा देत इम्तियाज जलील यांनी गेल्या महिन्यात पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला होता. पंरतु त्यावेळी संबंधितांवर महिनाभरात कारवाई करतो असे आश्‍वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला होता. परंतु यानंतरही कारवाया होत नसल्याचा आरोप करत मुदत संपताच आमदार इम्तियाज जलील यांनी स्वत:च शिवशंकर कॉलनीत दुपारी गुटख्याच्या अड्ड्यावर धाव घेत छापा टाकला. 

त्यानंतर पोलिसांना याची माहिती देऊनही पोलीस घटनास्थळी उशारा पोहचले. त्यामुळे पोलीस उपायुक्त राहूल खाडे यांना इम्तियाज यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर पोलिसांसमक्ष शिवशंकर कॉलनीतील घराच्या एका खोलीचे कुलुप तोडून तिथे दोन खोक्‍यांमध्ये दडवून ठेवलेला गुटख्याचा अवैध साठा जप्त करण्यात आला. यावेळी गुटखा दाखवतच इम्तियाज यांनी पोलिसांवर शाब्दीक हल्ला चढवत पोलिसांच्या आशिर्वाद व हप्तेखोरीमुळे गुटखा विक्री सुरु असल्याचा आरोप करत यात प्रत्येकाला वाटा मिळत असल्याचा दावा केला. 
विधानसभेत आवाज उठविणार 
पोलिस कारवाई करो अथवा न करो. आपण स्वत:च कारवाई सुरु केली, पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला तरी मी मागे हटणार नाही. हप्ता मिळत असल्याने पोलिसांच्या मदतीने अवैध धंदे सुरु आहेत. याबाबत मी विधानसभेत आवाज उठविणार असुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com