जयललितांच्या दत्तकपुत्राची लवकरच सुटका..पण राजकारणातील एंट्रीबाबत अनिश्चितता

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांचे दत्तकपुत्र सुधाकरन हे कारागृहातून लवकरच सुटण्याची शक्यता आहे.
jayalalithaa foster son v n sudhakaran will soon be released from jail
jayalalithaa foster son v n sudhakaran will soon be released from jail
Published on
Updated on

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची कारागृहातून 27 जानेवारीला सुटका होणे अपेक्षित आहे. त्यांच्यासोबत जयललितांचे दत्तकपुत्र व्ही.एन.सुधाकरन यांचीही सुटका होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सुधाकरने हे शशिकला यांच्यासोबत शिक्षा भोगत आहेत. या दोघांच्या सुटकेनंतर तमिळनाडूतील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 

शशिकला आणि सुधाकरन यांना न्यायालयाने चार वर्षांच्या कारावासासोबत दहा कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. शशिकला यांनी दंडाची रक्कम भरली असून, त्यांची 27 जानेवारीपर्यंत सुटका होईल. सुधाकरन यांनी अद्याप दंडाची रक्कम भरली नसून, ते लवकरच ती भरण्याची शक्यता आहे. शशिकलांपाठोपाठ सुधाकरन हे सुद्धा कारागृहातून बाहेर पडतील, असा अंदाज आहे. 

सुधाकरन यांच्या चार वर्षांच्या शिक्षेत न्यायालयाने 89 दिवस कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांची मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच सुटका होणे शक्य होते. परंतु, त्यांनी दंड न भरल्याने त्यांची सुटका होऊ शकली नाही. ते 14 जानेवारीला अथवा त्याआधी कारागृहातून बाहेर पडू शकतात, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. ते राजकारणात सक्रिय होणार की नाही, याबद्दल अनिश्चितता आहे. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला, सुधाकरन आणि शशिकलांच्या भावाच्या पत्नी इलावरसी यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. शशिकला 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. या सर्वांना कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. या सर्वांना चार वर्षे कारावास आणि दहा कोटी रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दंड न भरल्यास शिक्षेचा कालावधी आणखी एक वर्ष वाढणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकलांच्या आधी सुधाकरन यांची सुटका होण्याची शक्यता कमी आहे. शशिकलांच्या सुटकेनंतर तमिळनाडूत मोठ्या राजकीय उलथापलथी होणार आहेत. त्या तमिळनाडूतील राजकारणात पुन्हा एकदा महत्वाची भूमिका बजावतील, असे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यानंतरच सुधाकरन हे कारागृहातून बाहेर पडावे, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भाजप पुन्हा तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. द्रमुकला नामोहरम करण्यासाठी भाजपकडून अण्णाद्रमुकला मदत केली जात आहे. शशिकला या तुरुंगातून सुटल्यास तमिळनाडूतील राजकारणात फार मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या राज्यातील राजकारणात सक्रिय होण्याने अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. राज्यात यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांची अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी पक्षातील सहकारी ओ. पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. त्यानंतर शशिकला यांनी तुरुंगात जाण्याआधी के.पलानीस्वामी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली होती. अखेर पलानीस्वामी मुख्यमंत्री बनले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर पलानीस्वामी यांनी शशिकला यांचे पुतणे टी.टी.व्ही. दिनकरन पक्षातून हाकलून पनीरसेल्वम यांना पुन्हा पक्षात घेतले होते. यानंतर दिनकरन यांनी अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाची स्थापना केली होती. यामुळे शशिकलांच्या सुटकेनंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com