ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पक्षाला गळती लागली आहे. या निवडणुकीत प्रभावी ठरतील, असे काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवक हे राज्य आणि केंद्रातही पक्षाची सत्ता असूनही तो सोडू लागले आहेत, हे विशेष. तर, आणखी काही सोडण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाच्या बालेकिल्यातच भाजपवर ही वेळ का आली? त्याचा घेतलेला हा आढावा.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा 2017 ला सत्तेत आली. त्यात शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा म्हणजे तेथील भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप ( Laxman Jagtap ) यांचा सिंहाचा वाटा होता. कारण, निवडून आलेल्या भाजपच्या 77 नगरसेवकांत सर्वाधिक लक्ष्मणभाऊ जगताप निवडून आणले होते. त्यामुळे चिंचवड भाजपचा बालेकिल्ला, तर भाऊ हे शहराचे कारभारी झाले. आता बालेकिल्यातच भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच गळती लागली आहे. त्याचा फटका तेथे भाजपला बसण्याची शक्यता आहे. कारण, आमदारकीच्या निवडणुकीवर मोठा परिणाम करणाऱ्यांनी पक्ष सोडण्यास सुरवात केली असून आणखी काही तो सोडण्याच्या मार्गावर आहेत.
भाऊंची मतदारसंघावर नाही, तर शहरावरही मजबूत पकड होती. त्यामुळे अजितदादानंतर त्यांचीही शहराचे कारभारी म्हणून ओळख झाली. चिंचवडचे पहिले आणि त्यानंतर सलग दोनदा, असे तीनदा लक्ष्मणभाऊ जगताप हे आमदार राहिले. मात्र, गेल्या वर्षी 3 जानेवारीला त्यांचे अकाली निधन झाले. पक्षात हेडमास्तर असलेले भाऊ गेले अन त्यानंतर चिंचवडवरील भाजपची पकडही हळूहळू सैल झाली.
भाऊंचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी गेल्यावर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी यांना निवडून आणले. त्यानंतर त्यांचे लहान बंधू शंकर जगताप पक्षाचे शहराध्यक्ष झाले आणि चिंचवडच नाही, तर शहर भाजपमध्ये तीन गट पडले. एक भाऊ आणि अश्विनीताई समर्थक, दुसरा शंकर जगताप यांचा, तर तिसरे जुने एकनिष्ठ भाजपाई.
दरम्यान, शंकर जगताप शहराध्यक्ष होताच भाऊ समर्थक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कुचंबणा आणि अडवणूक सुरु झाली. त्यात मदार अश्विनी जगताप यांना नाही, तर शंकर जगताप यांना चिंचवडमधून भाजपची उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरु झाल्याने त्यांची आणखी चलबिचल, घालमेल सुरु झाली. त्याची परिणती एकेकाने पक्ष सोडण्यात होत आहे.
भाऊ म्हणजे हेडमास्तर होते. त्यामुळे ते असेपर्यंत कुणी पक्ष सोडायचे धाडस करीत नव्हते. मात्र, ते जाताच चिंचवडच नाही, तर उद्योगनगरीतील त्यांचा दरारा संपला, धाक गेला. परिणामी भाजपमधून आऊटगोईंग सुरु झाले. एवढेच नाही, तर चिंचवडचा आमदारकीचा सातबारा असलेल्या जगताप कुटुंबाला चिंचवडमधूनच आव्हान मिळू लागले.
ज्येष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी आगामी विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली.दुसरीकडे भाऊंचे व नंतर अश्विनीताईंचे खंदे पाठीराखे आणि माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी भाजपला नुकताच रामराम ठोकला. त्यांचे वाकड भागात प्रस्थ आहे. किमान दहा हजार मते ते फिरवू शकतात. आपल्या दोन पानी राजीनामा पत्रात त्यांनी शंकर जगतापांचे नाव घेत त्यांच्यावर घणाघाती आरोप केले. त्यांच्या कार्यपद्धतीला वैतागून पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. हांजीहांजी करणाऱ्यांना पदे आणि निस्सीम कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चिंचवडमध्ये लोकशाही नसून फक्त घराणेशाही आहे, असा घरचा आहेर दिला. एवढेच नाही, तर आणखी 15 माजी नगरसेवक पक्ष सोडणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
कस्पटेनंतर दुसऱ्याच दिवशी वाकडमधील आणखी एक बड प्रस्थ आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते सुद्धा भाऊ आणि ताईंचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी सुद्धा शंकर जगतापांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राजीनामा दिल्याचा लेटरबॉम्ब टाकला. त्यामुळे शहर भाजपत मोठी खळबळ उडाली. त्यातून या पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले. त्याचा फटका पक्षाला आगामी निवडणुकीत बसू शकतो. भाजपला उद्योगनगरीत त्यातही चिंचवडमध्ये का मोठे हादरे बसू लागले आहेत, याचा कानोसा घेतला असता भाऊंचे अकाली निधन,त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची होत असलेली कुचंबणा, हेडमास्टर तथा कारभारीच गेल्याने पक्षाची विस्कटलेली घडी आणि बिघडलेली शिस्त ही कारणे त्यामागे असल्याचे दिसले.
तसेच भाऊ आणि भोसरीचे भाजप आमदार पैलवान महेशदादा लांडगे हे शहराध्यक्ष असताना त्यांची संघटनेवर पूर्ण पकड होती. पण, सध्या ती निसटलेली असून त्यातून पक्षात गटबाजी वाढली आहे. शंकर जगताप यांच्या अध्यक्ष नियुक्तीलाच मावळत्या शहर कार्यकारिणीतील संघटन सरचिटणीस अमोल थोरात आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी जाहीर आक्षेप घेतला होता.
राष्ट्रवादीतून आलेल्यांनी पक्ष हायजॅक केला असल्याचीही भावना जुन्या, एकनिष्ठ भाजपाईंत आहे. त्यातून प्रथम पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पक्षाला रामराम करीत ठाकरे शिवसेनेला प्रवेश केला. नंतर भोसरीतील रवी लांडगे आदी आणि ह चिंचवडमधील माया बारणे आदी नगरसेवकांनी कमळ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता आणखी 15 माजी नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. तर, विधानसभा निवडणूक जाहीर होताच तसेच त्यानंतर राज्यात आघाडी सत्तेत आली, तर भाजपमधून हे आऊटगोईंग आणखी वाढण्याची शक्यता आहे.
( Edited By : Akshay Sabale )
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.