मुंबई : " कोण कोणती ऑफर देतोय ते पाहूया. अगोदर सर्वांच्या ऑफर येवू द्या. मग निर्णय घेवू,'' अशी भूमिका शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज बोलताना घेतली .
रंगशारदा सभागृहात मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेनंतर माध्यमांना ठाकरे यांनी ही प्रतिक्रीया दिली. आपल्याला कोणताही राजकीय पक्ष किंवा आघाडी वर्ज्य नाही हे देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे . याचा दुसरा अर्थ भाजपने शिवसेनेला गृहीत धरू नये असाही आहे .
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी पालघरमधे भाजप जिंकेलेली असली तरी बहुजन विकास आघाडी, कॉंग्रेस व शिवसेनेच्या मतांची एकत्रित बेरिज केल्यास भाजपचा पराभव झाल्याचेच दिसते. असे वक्तव्य केले होते. त्यावरून शरद पवार यांनी शिवसेनेला विरोधी पक्षांच्या महाआघाडीत सहभागी होण्याची अप्रत्यक्ष ऑफर दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती.
याबाबत आज उध्दव ठाकरे यांना विचारले असता," कोण कोणती ऑफर देतोय ते पाहूया. अगोदर सर्वांच्या ऑफर येवू द्या. मग निर्णय घेवू ,"अशी भूमिका स्पष्ट करत आघाडी व युती बाबतचा संभ्रम कायम ठेवला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थीतीत शिवसेनेचे महत्व वाढल्याचे हे संकेत असून शिवसेना देखील 'अहिस्ते कदम'च्या मार्गाने सर्वच राजकीय पक्षाची कोंडी करत असल्याचे चित्र आहे.
भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणूकांत शिवसेने सोबत युती करण्यासाठी कंबर कसलेली असताना आघाडी व युती बाबत थांबा अन वाट पहा, असा संदेश देऊन उद्धव ठाकरे चित्र अधिक स्पष्ट होण्याची वाट पाहत आहेत असे दिसते . भाजपला शिवसेनेशी युती जेव्हढी निकडीची आहे तेवढी घाई आपल्याला नसल्याचे शिवसेना या निमित्ताने दाखवून जुने हिशेब चुकते करीत आहे, असेही निरीक्षकांचे मत आहे .
दरम्यान, मुंबई पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणूकीत शिवसेना विरूध्द भाजप असाच सामना रंगणार आहे. त्यामुळे, या दोन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठीची रणनिती कशी आखावी याबाबत ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकारी व मतदारांना सूचना केल्या. या दोन्ही जागेवरील निवडणूक शिवसेनेनं प्रतिष्ठेची केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.