माढ्यातील 25 हजार वाढीव मतदान राष्ट्रवादीच्या पारड्यात?

तरुण मतदारांवर प्रभाव टाकू शकणाऱ्या उमेदवाराला मताधिक्‍य मिळू शकते. वंचित बहुजन आघाडीसह इतर उमेदवारांना मिळणारी मतेही महत्त्वपूर्ण आहेत.
माढ्यातील 25 हजार वाढीव मतदान राष्ट्रवादीच्या पारड्यात?

माढा : माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या माढा विधानसभा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा यंदाच्या निवडणुकीत 25 हजार 230 मतदान जास्त झाले आहे.

माढा तालुक्‍यातील तीन लाख 24 हजार 682 मतदारांपैकी दोन लाख 25 हजार 743 अर्थात 69.53 टक्के मतदारांनी मतदान केले. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे एक टक्का मतदान वाढले. 2014च्या निवडणुकीत दोन लाख 90 हजार 707 मतदारांपैकी दोन लाख 513 अर्थात 68.97 टक्के मतदान झाले होते. 2009च्या लोकसभा निवडणुकीत 59.11 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत 2014च्या तुलनेत 25 हजार 230 मतदान अधिक झाले असून हेच मतदान निर्णायक मताधिक्‍य देणारे आहे. 

माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय शिंदे व भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले संजय शिंदे हे स्थानिक उमेदवार असून त्यांचे बंधू आमदार बबनराव शिंदे हे सलग पाचवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. तालुक्‍यातील सर्वच सत्तास्थाने त्यांच्याकडे असल्याने त्यांच्याविरोधात निर्णायक मतदान पाठीशी असणारा विरोधक नाही. सत्तेचा व निवडणूक प्रक्रियेचा प्रचंड अनुभव असलेल्या शिंदे बंधूंची माढा विधानसभा मतदारसंघात यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना आढळून आली. शिंदे बंधूंच्या नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघात होम टू होम प्रचार केल्याचा व आपल्या भागातील उमेदवार असल्याचा फायदा संजय शिंदे यांना या निवडणुकीत होण्याची शक्‍यता आहे. 

भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची सारी भिस्त माढा विधानसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील कुटुंब, कल्याणराव काळे, माजी आमदार धनाजीराव साठे, माजी सभापती शिवाजी कांबळे, शिवसेनेचे प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व सहकारी पक्षांवर राहिली. श्री. नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी या नेतेमंडळींनीही झटून प्रचार केल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण मतदारसंघात होम टू होम प्रचार यंत्रणा राबवताना भाजपला मर्यादा पडल्याचे दिसून आले. वंचित बहुजन आघाडीचे विजयराव मोरे व इतर उमेदवारांनीही प्रचारात सक्रियता दाखविली आहे. वंचित बहुजन आघाडीची मते या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. 

 इनकमिंग, आउटगोइंगचा हिशोब बरोबरीत
माढा तालुक्‍यातील माजी सभापती शिवाजी कांबळे, दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे, सरपंच संघटनेचे जयंत पाटील, मोडनिंबचे बाबूराव सुर्वे, सापटणेचे सागर ढवळे यांनी या निवडणुकीत भाजपसोबत राहणे पसंत केले, तर बळिराजा संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर, शेकापचे बाळासाहेब पाटील, बावीचे मुन्ना मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी संजय शिंदेंना साथ दिल्याने इनकमिंग, आउटगोइंगचा हिशोब माढा तालुक्‍यात तरी बरोबरीत सुटल्याची चर्चा आहे. 

 
माढा प्रथम, फलटण द्वितीय
माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी माढा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक दोन लाख 25 हजार 708 इतके मतदान झाले असून त्याखालोखाल फलटणमध्ये दोन लाख नऊ हजार 803, माळशिरसमध्ये दोन लाख सात हजार 561, माणमध्ये एक लाख 93 हजार 159, करमाळ्यामध्ये एक लाख 88 हजार 999, सांगोल्यामध्ये एक लाख 85 हजार 818 असे एकूण 12 लाख 11 हजार 48 जणांनी माढा लोकसभेसाठी मतदान केले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com