Harshavardhan Sapkal : कार्यकर्ता प्रशिक्षणातूनच संघटनेला बळकटी; काँग्रेससाठी सत्ता परिवर्तन नव्हे तर व्यवस्था परिवर्तन महत्त्वाचे...

Harshavardhan Sapkal Vision for Congress in Maharashtra:भाजपकडे २३९ आमदार आणि एक कोटी सदस्य असल्याचा दावा करतात, तरी काँग्रेसचे लोक त्यांना फोडायचे असतात. म्हणजेच ते पोकळ आहेत.
Harshawardhan Sapkal
Harshawardhan Sapkal sarkarnama
Published on
Updated on

हर्षवर्धन सपकाळ

(प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस)

Sarkarnama Exclusive Interview Future Roadmap of the Maharashtra Congress: राज्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस हा महत्त्वपूर्ण पक्ष असून, राज्याच्या सर्व भागांमध्ये ताकद असणारा हा एकमेव पक्ष आहे. यापुढील काळामध्ये काँग्रेसचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविणे आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे, या गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

काही दिवसांपासून विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सातत्याने काँग्रेसच्या भवितव्याविषयी चर्चा करण्यात येत आहे. परंतु काँग्रेसची स्थापना आणि त्यानंतरचा इतिहास खूप मोठा आहे. देशाच्या उभारणीमध्ये काँग्रेसने दिलेले योगदान खूप मोठे आहे. स्वातंत्र्यानंतर देश स्वतःच्या पायावर उभा राहिला, त्याची पायाभरणी काँग्रेसनेच केली. दुर्दैवाने हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही कमी पडलो.

दोन पिढ्या आधीपर्यंत हे योगदान जनतेला माहीत होते; मात्र त्यानंतरच्या पिढ्यांना काँग्रेसचे योगदान माहीत नाही. आता या गोष्टी जनतेपर्यंत पुन्हा पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर पक्षाचे कार्यकर्ते नव्याने घडविणे आणि जनतेच्या प्रश्‍नांवर रस्त्यावर उतरणे या गोष्टींना आम्ही प्राधान्य देणार आहोत.

देशउभारणीचा इतिहास

काँग्रेससाठी सत्ता परिवर्तन नव्हे तर व्यवस्था परिवर्तन महत्त्वाचे आहे. काँग्रेसने देशात भूसुधार, सामाजिक न्याय, समतेची व्यवस्था निर्माण केली. अर्थशास्त्रीय भूमिका घेऊन सर्वांना ताकद देण्याचा कार्यक्रम केला. यामध्ये भूदान चळवळ खूप महत्त्वाची आहे. पोचमपल्ली येथे रामचंद्र रेड्डी यांनी दोन हजार एकर जमीन दान केली, त्यानंतर विनोबा भावे ६० हजार किलोमीटर पायी फिरले आणि त्या चळवळीतून ६० हजार एकर जमीन दलित, आदिवासी आणि भूमिहीनांना मिळवून दिली. त्यामुळे समतेचे वातावरण तयार होण्यास मदत झाली.

नेहरूंनी ‘कसेल त्याची जमीन’ या धोरणानुसार कूळ कायदा आणला. त्यामुळे लँड होल्डिंग वाढले. त्यानंतर नेहरू यांनी लॅंड सीलिंग आणले. त्यामुळे पाच-दहा हजार एकर जमीन असणाऱ्यांच्या जमिनी सरकार दरबारी जमा झाल्या आणि त्यांचे भूमिहीनांमध्ये वितरण करण्यात आले. त्यानंतर इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाव’च्या वेळेस १९८०मध्ये गायरान जमिनींचे वाटप भूमिहीनांना केले. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात काँग्रेसने केलेली ही महत्त्वपूर्ण कामे होती, या पायावरच नंतर भारताची उभारणी झाली.

Harshawardhan Sapkal
Maharashtra Politics: ‘सोड दादा ‘तुतारी-पंजा’ला, विझवी ते ‘मशाली’ला... येतो एकदा ‘मातोश्री’ला, बोलवू नकोस ‘भोंग्या’ला’

काँग्रेसने भूमिहीनांना थेट जमीन देण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील जमीनदारांनाही धक्का बसला. तर, भूसुधारणेमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ९९ टक्के भूमिहीन होते, ते जमिनींचे मालक झाले. दुसऱ्या बाजूला शेतीला पाणी देण्यापासून शाळा, वसतिगृहे, शैक्षणिक आरक्षण, शिष्यवृत्ती यांतून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न झाले. नंतर १९९२ला डॉ. मनमोहनसिंग यांनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खुली झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा तयार झाल्या, रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे मागील तीन दशकांत मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग वाढला. ही भारताच्या यशाची कथा आहे.

दुसऱ्या बाजूला या वाढलेला मध्यमवर्गाने काँग्रेसची साथ सोडली. एवढ्या चांगल्या मूलभूत सुधारणा काँग्रेसने केल्यानंतर ज्या वर्गाला याचा लाभ झाला होता, त्यानेच काँग्रेसची साथ सोडली. त्यात काँग्रेसच्याही काही उणिवा असतील पण एवढे चांगले काम केल्यानंतर पक्षाला सातत्याने अपयश येत असेल, तर त्याचा खोलवर विचार करण्याची आवश्यकता आहे.

जनता काँग्रेससोबत

अपयशांमागील कारणांचा विचार करताना, पक्षाचा लोकांसोबतचा संवाद कमी झाल्याचे आणि साचलेपणा, साचेबद्धपणा अशा चौकटीत आम्हाला पाहिले जाते. त्यामुळे यापुढील काळात ‘विविधता में एकता’ हे सूत्र आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. काँग्रेसने विविधतेचा सन्मान केला, उपेक्षित, शोषित, पीडित ‘नाही रे’ वर्गाला काही ना काही देण्याचे काम काँग्रेसने केले. जात, पंथ, धर्म अशी सर्वसमावेशक भूमिका काँग्रेसने स्वीकारली, त्यावरच भाजप आज प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे ते सर्वांत मोठे आव्हान आहे. काँग्रेस सोडून लोक जात आहेत, ही गोष्ट आव्हानात्मक नाही.

Harshawardhan Sapkal
Sunil Tatkare: ‘महाराष्ट्र धर्म’ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया! राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू!

सर्वसमावेशकता हा संविधानाचा, सर्वोदयाचा, वारकरी संपद्रायच आणि हिंदुत्वाचाही गाभा आहे. हा भारताचा डीएनए आहे आणि तोच काँग्रेसचाही आहे. भारताची समतावादी आध्यात्मिक परंपरा आहे, त्या परंपरेवरच भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपने सर्वसमावेशकतेची भूमिका बाजूला ठेवून जातीयवादाच्या आधारे सत्ता प्राप्त केली जाते आहे. काँग्रेस केडर असणारा पक्ष नसून, मास बेस असलेला पक्ष राहिला आहे.

नागरिक आमच्यासोबत होते, त्यांच्या विश्वासावरच काँग्रेसने इतका मोठा काळ प्रवास केला. काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आणि काही नेतृत्वावर टीका होते, पण काँग्रेस पक्ष चुकीचा आहे, असे कोणी बोलत नाही. उलट भाजपच्या नेतृत्वाच्या आणि काही कार्यकर्त्यांबाबत तारीफ होते, पण भाजप पक्ष म्हणून खूप चांगला आहे असे सार्वत्रिक बोलले जात नाही.

आमदार म्हणून आम्ही संख्येने जरूर कमी आहोत, तर भाजप भ्रम करण्यात नक्कीच पुढे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते बलशाली असल्याचा देखावा जरूर करतात. पण ते खरे कमजोर आहेत. भाजपकडे २३९ आमदार आणि एक कोटी सदस्य असल्याचा दावा करतात, तरी काँग्रेसचे लोक त्यांना फोडायचे असतात. म्हणजेच ते पोकळ आहेत. पाच वर्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मी सोडून काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, असेच या पुढच्या काळातले आमचे नियोजन असेल.

संविधानाचा सर्वोच्च आदर

महाराष्ट्राला महान साधू-संत व महापुरुषांचा जाज्ज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दूषित करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना किती प्रेम आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. याच विचारांच्या लोकांनी डॉ. बाबासाहेबांचा सातत्याने अपमान केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला रा. स्व. संघ पहिल्यापासूनच मानत नाही.

रामलीला मैदानावर बाबासाहेबांचे संविधान कोणी जाळले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहीत नाही का? परंतु खोटा इतिहास सांगून दिशाभूल करणे ही संघाची शिकवण आहे, तेच मोदी करत आहेत. त्यांच्या अशा विधानाने खरा इतिहास झाकला जाणार नाही व रा. स्व. संघ, भाजप व मोदींनी केलेली पापे धुवून निघणार नाहीत. प्रत्येक जाती-धर्माच्या व्यक्तीवर प्रेम असले पाहिजे हे संविधान सांगते, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही भारताची परंपरा आहे, ‘आता विश्वात्मके देवे’, हे ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे तत्त्वज्ञान आहे, तेच तत्त्वज्ञान काँग्रेसचे आहे.

मोदींनी काय केले? सध्याच्या राजकारणात महाविकास आघाडी आणि युती अपरिहार्यता आहे. काँग्रेसचा विचार करता, आघाडीकडे व्यवहाराने आणि आदराने पाहिले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप लावण्याची शक्यता आहे. अडचणीत असल्यावर संपूर्ण कुटुंब एकत्र येते, त्यामुळे सर्वजण माझ्यासोबत आणि माझ्या पाठीशी असतील.

देशात शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, देशातील बहुजन समाज अस्वस्थ आहे. या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे पण मोदी मात्र स्वतःची आरती करून घेत आहेत. कोरोना काळात टाळी, थाळी वाजवायला लावली आता अमेरिकेच्या टेरिफवर काय भूमिका आहे, ते स्पष्ट करावे.

देशातील गरिबांची संख्या मोदींच्या काळात वाढत आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, लाखोंच्या संख्येने लोक देश सोडून चालले आहेत हेच मोदींनी देशाचे भले केले आहे का? भाजप सरकारमध्ये दलित अत्याचार वाढले आहेत, मॉब लिंचिंगसारखे प्रकार दलितांबाबत झाले आहेत, ते थांबावे यासाठी मोदींनी काहीही प्रयत्न केले नाहीत. सातत्याने काँग्रेसवर टीका करणे हेच त्यांचे काम राहिले आहे.

कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणावर भर

अठरापगड जातीचे आणि सर्व जातिधर्माचे आपण एक आहोत तो म्हणजे ‘महाराष्ट्र धर्म’. हा आपला वारसा आहे. राज्यात ही हरवलेली सद्भावना आपण पुन्हा रुजवली नाही तर येणाऱ्या पिढीचे आपण खूप मोठे नुकसान करणार आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे शिबिरे घेतले जातील. दुसरे काम म्हणजे पक्षात जनाधार असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामासाठी पदांवर नियुक्त केले जाईल आणि पदावर काम करत असलेल्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे त्यांनी यानिमित्ताने जाहीर केले.

Harshawardhan Sapkal
Ashok Khemka : भल्या भल्या राजकारण्यांना भिडणाऱ्या अधिकाऱ्याचा 'जलवा' थांबणार; 57 बदल्यांनंतर अखेर अशोक खेमका निवृत्त

महाराष्ट्र ही साधू-संत व महापुरुषांची भूमी असून पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने देशाला कायमच दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु काही दिवसांत राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले आहे, काही शक्ती राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची संस्कृती व परंपरेला बदनाम करण्याचे काम करत आहेत. राज्यात सामाजिक सौहार्द वाढवणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती-धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मूळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे.

कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत. रस्त्यावर उतरून लढावे लागेल. पण फोटो काढून शोले टाइप आंदोलनांना थारा दिला जाणार नाही. पण सच्च्या कार्यकर्त्यांना पुरेशी ताकद पक्षाकडून दिली जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. तसेच, आता रडायचे नाही तर लढायचे दिवस. विरोधी पक्ष भाजप सक्षम नाही म्हणूनच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचवायचा आहे.

आगामी काळातील दिशा

  • जनतेमध्ये ताकद असणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देणार

  • येणाऱ्या काळात समतावादी चळवळ पुढे घेऊन जाणार.

  • कार्यकर्त्यांची शिबिर घेणार आणि त्यांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष देणार.

  • काँग्रेसचा इतिहास स्वातंत्र्याच्या आधीपासूनचा आहे आणि हा इतिहास वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार जाईल.

  • काँग्रेसचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी छोट्या पुस्तिका, चित्रफितींचा वापर करणार.

  • देशाच्या वाटचालीत काँग्रेसचे योगदान तरुण, विद्यार्थ्यांना समजावे यासाठीचा कार्यक्रम हाती घेणार.

  • पर्यावरण, शेतमजूर, बेरोजगारांच्या लढ्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com