Maharashtra Congress: बलाढ्य भाजपला घायाळ काँग्रेसची भीती?

Harshvardhan Sapkal Local Body Polls congress Vs bjp:भविष्यात ठाकरे-ठाकरे आणि पवार-पवार एक झाल्यास महाराष्ट्रच्या राजकारणात काँग्रेस एकाकी पडण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना नेता घडविणारी निवडणूक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहण्याची आवश्‍यकता आहे.
Local Body Polls congress Vs bjp
Local Body Polls congress Vs bjpSarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसला सोडून गेलेले दिग्गज नेते. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेला काँग्रेस पक्ष. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर असंतोषाने आतून खदखदणारे दिग्गज नेते. अशा एक ना अनेक कारणांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष घायाळच झालेला दिसत आहे. पण अशा रक्तबंबाळ काँग्रेसची भीती बलाढ्य भाजपला का वाटू लागली आहे? उरली-सुरली काँग्रेसही संपविण्याची अन्‌ रिकामी करण्याची भाषा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वापरत आहे.

राज्याच्या विधानसभेत महायुतीकडे २३६ एवढे बहुमत आहे. एकट्या भाजपकडे १३२ चा आकडा आहे. भाजपने ठरवले तर भाजप स्वबळावरही सत्ता स्थापन करू शकला असता. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता अशा बलाढ्य स्थितीत भाजप आहे. राज्याला विरोधी पक्षनेता नाही. विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अन् काँग्रेसमध्ये ताळमेळ नाही.

दिग्गजांना डावलून काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची माळ हर्षवर्धन सपकाळांच्या गळ्यात टाकल्याने काँग्रेसमधील प्रस्थापित नेतृत्वाची फळी अस्वस्थ आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, माजी मंत्री बाबा सिद्धिकी, आशिष देशमुख, कृपाशंकर सिंह, प्रियांका चतुर्वेदी यांच्यापासून ते अगदी अलीकडे भाजपवासी झालेले माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षत्याग केला. अशा वाईट स्थितीतून जात असलेल्या काँग्रेसची भाजपला भीती वाटत असल्याचे जाणवत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिवाळीच्या आसपास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकांमध्ये राजकारणाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिल्यास लोक स्वीकारतात. चांगले यश मिळते, याचा अनुभव काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) लोकसभा निवडणुकीत घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’नेही हा अनुभव विधानसभा निवडणुकीत घेतला आहे. महायुती अन् भाजपमधील वाढलेली गर्दी पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दुसरी फळी काँग्रेसच्या हाताला लागण्याची शक्यता असल्याने घायाळ काँग्रेसची भाजपला भीती वाटत असावी असे दिसते.

Local Body Polls congress Vs bjp
Local Body Elections 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने पदाधिकाऱ्यांची 'या' पदासाठी जोरदार फिल्डिंग

‘मविआ’त काँग्रेस एकाकी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून दोन्ही पवारांच्या एकीकरणाचा विषय पुढे आला आहे. ‘राष्ट्रवादी’च्या आणि मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकीकरणाची मानसिक तयारीही केली आहे.

भविष्यात ठाकरे-ठाकरे आणि पवार-पवार एक झाल्यास महाराष्ट्रच्या राजकारणात काँग्रेस एकाकी पडण्याची शक्यता आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना नेता घडविणारी निवडणूक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांकडे पाहण्याची आवश्‍यकता आहे.

रिक्त पदांवर नियुक्त्या

संघटनात्मक बदलासाठी नेमलेल्या जिल्हानिहाय निरिक्षकांचे अहवाल आता प्रदेश काँग्रेसकडे येऊ लागले आहेत. या अहवालानुसार संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात रिक्त पदे आहेत, त्या पदांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. त्यानंतर संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. ही सर्व प्रक्रिया जून ते जुलैदरम्यान होण्याची शक्यता असल्याने हा काळ राज्यातील काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

या कालावधीत अनेक जिल्ह्यात व तालुक्यात काँग्रेसला नवीन चेहरे मिळण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी अडीच महिन्यांच्या कारकीर्दीत राज्यातील १७ जिल्ह्यांचा दौरा केला. नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी या निमित्ताने उर्वरित जिल्ह्यांचा ते दौरा करणार आहेत.

आघाडी स्थानिक स्तरावर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्याच दिवशी केली आहे. त्यामुळे राज्यातील महायुतीमधील लढतीचे चित्र सध्या तरी स्पष्ट आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)व शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महाविकास आघाडी होणार का? या बद्दल मोठी उत्सुकता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खासदार संजय राऊत यांची काही दिवसांपूर्वीची विधाने आठवली तर महाविकास आघाडी होण्याची शक्यता कमीच आहे. निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असल्याने राज्यात कसे लढायचे? आघाडी करून की स्वबळावर? या बाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरच होणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिले आहेत. काँग्रेसकडे भाजपसोबत कधीही जाणार नसल्याचा विश्‍वास ही जमेची बाजू आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते या जमेच्या बाजूचा कसा लाभ घेतात? यावर काँग्रेसचे राज्यातील अस्तित्व अवलंबून असणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com