

Marathwada Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठ्या नेत्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावेसे वाटते, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे दोन नेते म्हणजे मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू परळीचे आमदार धनंजय मुंडे. पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास नुकताच संपला. तर दुसरे धनंजय मुंडे यांचा सुरू झाला अशी काहीसी परिस्थिती आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा आणि राज्यातील राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले. यातून धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मराठा आरक्षणाचा लढा आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात विशेषतः मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी आणि आता बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष सुरू आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही मुंडे बहीण भावांविरुद्ध टोकाची भूमिका घेतली होती. दोन्ही मुंडेंनी बीड जिल्ह्यातील एका जाहीर कार्यक्रमातून द्वेष, जातीपातीच्या राजकारणामुळे निवृत्त व्हावेसे वाटते असे विधान केले. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांच्यावर कठोर शब्दात हल्ला चढवला.
मात्र मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्त होऊ नये, त्या गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवत आहेत, असे म्हणत त्यांच्याबद्दल मावळ भूमिका घेतली. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणावरून संघर्ष भडकला तेव्हा पंकजा मुंडे यांनी अत्यंत संयमित भूमिका घेतली होती.
मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध न करता त्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही भूमिका ठामपणे मांडली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही त्यांनी आरोपींबद्दल कुठेही सहानुभूती दाखवली नाही, उलट त्यांना शिक्षाच झाली पाहिजे, अशी मागणी केली. याचाच परिणाम म्हणून मनोज जरांगे पाटील यांची मंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबतची भूमिका मवाळ झाल्याचे बोलले जाते.
सुरुवातीला जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली होती, परंतु ती एका मर्यादे पुरती होती. धनंजय मुंडे यांच्याविरोधात मात्र मनोज जरांगे पाटील संपूर्ण तयारीने मैदानात उतरले होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडूनच पराभव झाला होता. तेव्हा पासून पंकजा मुंडे या राजकारणातील पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होत्या.
2024 मध्ये भाजपाने त्यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी दिली ती देखील विद्यमान खासदार आणि बहीण प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष टोकाला गेलेला असताना मिळालेली ही उमेदवारी नेमकी पुनर्वसनासाठी होती की राजकीय प्रयोग म्हणून? यावरही तेव्हा खल झाला. अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने त्या पराभूत झाल्या. पुढे विधान परिषदेवर घेत भाजपाने त्यांचे पुनर्वसन केले. आता त्या राज्याच्या पर्यावरण मंत्री आहेत.
दोन्ही मुंडेंना विरोध करून ओबीसी, वंजारी समाजाची नाराजी मनोज जरांगे पाटील यांना ओढावून घ्यायची नाही. म्हणूनच कदाचित धनंजय मुंडे यांना विरोध कायम ठेवून पंकजा मुंडे यांच्याबद्दल मवाळ धोरण जरांगे पाटील यांनी ठेवल्याचे बोलले जाते. दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड व इतर हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने जरांगे पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी जंगजंग पछाडले होते. त्यांचा राजीनामा घेऊनच जरांगे शांत झाले.
माझ्या खूनाची सुपारी धनंजय मुंडे यांनीच दिली, माझ्या घातपाताचा कट त्यांनीच रचला असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या जातीपातीच्या राजकारणामुळे आपल्याला निवृत्त व्हावेसे वाटते, या त्यांच्या विधानाची जरांगे पाटील यांनी खिल्ली उडवली. उशारी सुचलेले शहाणपण म्हणत त्यांनी मुंडे यांना सुनावले.
धनंजय मुंडे यांच्यामुळेच मराठवाड्यात आणि राज्यात जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातले गेले. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी ज्या गरीब वंजारी जातीला वर आणले त्या गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पंकजा मुंडे चालवतात. पंकजा मुंडे राजकारणातून बाहेर पडल्या तर धनंजय मुंडे हे गोरगरिबांना त्रास देतील आणि त्यांना जेलमध्ये टाकतील त्यामुळे पंकजा मुंडेंनी राजकारणातून अजिबात बाजूला जाऊ नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
एवढेच नाही तर माझ्या खूनाच्या आणि घातपाताच्या कटात शंभर टक्के धनंजय मुंडे यांचा हात आहे. ती सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरक्षित आहे आणि ती माहिती कधीही बाहेर येऊ शकते, हे मी पूर्ण जबाबदारीने बोलत आहे असा, इशारा देत जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयीचे आपले इरादे स्पष्ट केले. एकूणच पंकजा मुंडे यांच्याबाबत मवाळ भूमिका घेणारे जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडे यांना असलेला विरोध यापुढेही कायम असेल हेच स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.