Maratha Reservation News : महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण आणि घराघरांत सध्या जे नाव प्रत्येकाच्या कानी पडत आहे, ते म्हणजे मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे. आंदोलक, राजकीय कार्यकर्त्यांसाठी जरी हे नाव नवे नसले तरी सामान्यांसाठी ते नवे आहे. (Jalna Maratha Protest) सडपातळ शरीरयष्टीच्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तेरा दिवसांच्या आंदोलनातून राज्यातील सत्ताधाऱ्यांना गदागदा हलवण्याचे काम केले आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाच्या प्रश्नावर एका `अग्निपथा`वर चालावे असा जरांगे यांचा प्रवास राहिलेला आहे.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेला, आई-वडील, बहीण-भावंडं आणि बायको, दोन मुलं अशा मोठ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली असलेल्या जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. (Maratha Reservation) विद्यार्थिदशेपासून समाजकारणात रस असलेल्या जरांगे यांनी कधी काळी युवक काँग्रेसमध्ये पदाधिकारी म्हणून काम केले होते. (Marathwada) पण तत्त्वाशी तडजोड न करण्याचा पिंड असल्यामुळे काही मुद्द्यांरून जरांगे यांनी राजकीय पक्षाचे पद सोडले आणि यापुढे कुठल्याच पक्षाच्या दावणीला बांधले न जाता स्वतःच्या हिमतीवर आणि मनगटाच्या जोरावरच लढायचे असा निर्धार जरांगे यांनी केला आणि त्यांची आतापर्यंतची वाटचाल पाहता, त्यांनी ते सत्यात उतरवल्याचेही दिसून आले.
एका तपापासून जरांगे सामाजिक प्रश्नावर आंदोलन करत आहेत. मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावच्या जरांगे यांना त्यांच्या या समाजकारणाच्या वेडानेच गाव सोडायला भाग पाडले. (Maharashtra) युवक काँग्रेसचे काम सोडल्यानंतर जरांगे यांनी शिवबा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक विषयांना हात घालण्याचे काम सुरू केले होते. मराठा आरक्षणाचा विषयदेखील तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात घोळत होता. आतापर्यंत आंदोलनांची तिशी पार केलेल्या जरांगे यांना या वेडानेच अंबड तालुक्यात स्थायिक व्हायला भाग पाडले. आधी अंकुशनगर आणि आता अंतरवाली सराटीतून ते आरक्षणाचा विषय हाताळत आहेत.
जमीन विकली, पण आरक्षणासाठी लढा सुरूच ठेवला
समाजकारण म्हणजे `घरच्या भाकरी खाऊन लष्कराच्या पोळ्या भाजण्या'सारखेच. पण जरांगे यांनी याकडे कधी लक्ष दिले नाही, समाजाचा विषय आला की काहीही करण्याची त्यांची तयारी असते. यातूनच मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी त्यांनी चार एकर शेतीपैकी दोन एकर विकून टाकली. दोन वर्षांपूर्वी साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी उभारलेले आंदोलन तब्बल तीन महिने चालले होते. यातदेखील जरांगे यांचाच पुढाकार होता. तेव्हाही त्यांनी मंत्रालयातील मंत्र्यांना साष्टी पिंपळगावात यायला भाग पाडले होते.
आता अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाने सत्ताधारी, विरोधक, मंत्री, खासदार, आमदार, नेते अशा सगळ्यांनाच इथे यायला भाग पाडलं. अंतरवाली सराटीच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधी नव्हे ते एवढे नेते, सत्तेतील मंत्री, आमदार, खासदार जरांगे आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांना भेटायला येत आहेत. राज्याच्या नकाशात भिंगाने शोधूनही सापडणार नाही, अशा अंतरवाली सराटीचे नाव आता देशभरात चर्चिले जात आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.