Maratha Reservation Special : लढा मराठा समाजाचा @जालना : जरांगेंची प्रकृती खालावली, पोलिसांनी शक्ती वापरली अन् घात झाला... भाग-३

Jalna Protest : आंदोलक आणि पोलिस कर्मचारी दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले, कुणाची डोकी फुटली तर कुणाची हाडं मोडली.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेले उपोषण चौथ्या दिवशी वेगळ्या वळणावर पोहोचले. मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला संपूर्ण मराठवाड्यातून पाठिंबा मिळू लागला. (Jalna Protest News) पण पोटात अन्न नसल्याने जरांगे यांची प्रकृती बिघडू लागली. या आंदोलनस्थळी प्रशासनाच्या वतीने तैनात डॉक्टरांच्या टीमकडून तसा अहवाल प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आला होता. जरांगे यांना रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले.

Maratha Reservation News
Maratha Reservation Special: लढा मराठा समाजाचा @जालना : 'राहयलो तर तुहा, नाही त समाजाचा'; जरांगेंची साद भिडली काळजाला... भाग - 2

जालन्याचे पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी मनोज जरांगे यांना उपोषणस्थळातून रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. (Marathwada) आंदोलनस्थळी असणारी गर्दी, संतप्त वातावरण पाहता काहीतरी घडेल याचा अंदाज असल्यानेच पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त सोबत घेतला. जरांगे यांच्यासोबत अपर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांनी चर्चा केला. (Maratha Reservation) मात्र, ज्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते, त्याबद्दल सरकार काहीच बोलायला तयार नसल्याने जरांगे यांनी रुग्णालयात उपचारांसाठी जाण्यास स्पष्ट नकार दिला.

जरांगे यांची मनधरणी सुरू असताना उपोषणस्थळी ३०० ते ३५० लोक उपस्थितीत होते. जरांगे यांना बळजबरीने पोलिस घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील, याचा अंदाज आल्यामुळे गर्दीतील काही तरुण पोलिसांना मागे रेटण्याचा प्रयत्न करू लागले. (Maharashtra) यातून बाचाबाची सुरू झाली, गर्दीतून पोलिसांवर दगड भिरकावला गेला आणि त्यानंतर जे घडले त्याचे चटके अख्ख्या महाराष्ट्राला अजूनही बसत आहेत.

एकीकडे लाठीमार, दुसरीकडून दगडफेक

दगडफेक सुरू झाल्यानंतर शेकडोच्या संख्येने असलेल्या पोलिसांच्या लाठ्या मग अशा काही बरसल्या की त्यातून महिला, मुली, तरुण, वृद्ध कुणीच सुटले नाही. पोलिसांकडून लाठीमार आणि आंदोलकांकडून दगडफेक असे रणकंदण सुरू झाले. जमाव अधिक आक्रमक झाल्याचे पाहून मग पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या, प्लास्टिकच्या बुलेट, छऱ्याच्या गोळ्या चालवत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. आंदोलक आणि पोलिस कर्मचारी दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले, कुणाची डोकी फुटली तर कुणाची हाडं मोडली. शांततेत सुरू असलेल्या उपोषणाच्या आंदोलनाला चौथ्या दिवशी गालबोट लागले.

बळाचा वापर करण्याचे आदेश कुणी दिले ? आंदोलकांच्या दगडफेकीमुळे पोलिसांनी टोकाचे पाऊल उचलले का? अशा चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप, राजकारण त्यातून पुढे सुरू झाले. आंदोलकांवर लाठीहल्ला, गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शुक्रवारी रात्रीच त्याचे हिंसक पडसाद कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरात उमटले. या दोन्ही ठिकाणी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. आता यात नेमकं चुकलं कोण? पोलिसांनी युक्तीपेक्षा शक्तीचा वापर केल्याने प्रकरण चिघळले ? की मग आंदोलकांच्या दगडाने पोलिसांना संधी दिली? यावर खल सुरू आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com