दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास अखेर संपला आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी या हक्काच्या मतदारसंघात चुलत भावाकडून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता.
या पराभवानंतर उद्विग्न झालेल्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी आपल्या पराभवाला भाजपच्या राज्यातील नेत्यांनीच हातभार लावल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याकडे त्यांचा रोख होता. पण, पराभवाचे खापर नेत्यांवर फोडणे पंकजा मुंडे यांना चांगलेच महागात पडले. संघर्ष कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसनासाठी खरच संघर्ष करावा लागला. परळी विधानसभेतील पराभवानंतर विधान परिषद, राज्यसभा अशा अनेक संधी असताना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पकंजा मुंडे यांना डावलले. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्या पंकजा मुंडे भाजप नेत्यांच्या मनातून मात्र त्यांच्या विधानांमुळे उतरत गेल्या.
पक्षाने पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला पर्याय शोधायला सुरूवात केली आणि त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची वाट अधिकच बिकट होत गेली. वंजारी, ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी काय राहावा, पण त्याच नेतृत्व पंकजा मुंडे यांच्या हाती राहू नये, अशी रणनीती भाजपमधील 'चाणक्यां'नी आखली. भागवत कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक. पण, आधी विधान परिषदेवर आणि नंतर महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त झालेल्या जागेवर भागवत कराड यांना संधी देत पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न केले.
यातून पंकजा समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. यातून पंकजा मुंडे यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी थेटपणे भाजपच्या राज्यातील नेत्यांवर टीका करायला सुरूवात केली. सत्तेत किंवा राज्याच्या राजकारणापासून पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच दिल्लीतील नेत्यांनी त्यांना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देत पक्ष संघटनेच्या कामाला जुंपले.
संघटनेतील हे मोठे पद असले तरी ते पंकजा मुंडे यांचे राज्यातील राजकारण संपवण्यासाठी देण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये झाली होती. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी राज्यातील नेत्यांचे नेतृत्व झुगारत मी राष्ट्रीय पातळीवर काम करते, त्यामुळे माझे नेते अमित शाह, नरेंद्र मोदी असल्याचे सांगत राज्यातील नेत्यांवर असलेला राग वेळोवेळी व्यक्त केला. पण, यामुळे पंकजा मुंडे यांचे अधिक नुकसान झालं. त्यांनी स्वतः अनेक भाषणांमधून याबद्दल बोलूनही दाखवले होते.
लोकसभा निवडणुकीत अदलाबदल धूर्त खेळीतून...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याची तीव्र भावना ओबीसी आणि मराठवाडा, बीड जिल्ह्यात असलेल्या बहुसंख्य वंजारी समाजात असल्याचे केंद्रातील भाजप नेत्यांनी हेरले होते. अशावेळी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची धूर्त खेळी खेळण्यात आली. बीडच्या विद्यमान खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या सख्या बहीण प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापत पंकजा यांना लोकसभेची उमदेवारी जाहीर झाली.
कुटुंबातील एकाच व्यक्तीला उमेदवारी किंवा पद हा निकष यामागे होता, असे बोलले गेले. पण, लोकसभेला पराभव झाला तर पंकजा मुंडे यांचे राजकारण संपेल, अशी यामागची खेळी होती, असा आरोपही त्यांच्या समर्थकांकडून केला गेला. दुर्दैवाने लोकसभेच्या बीड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा साडेसहा हजार मतांनी पराभव केला. या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे राजकारण जवळपास संपुष्टात आले होते.
परंतु, मराठवाड्यासह महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीतील भाजपला असा काही फटका बसला की त्यांचे राज्यातील 'मिशन 45' थेट '17 वर' येऊन फेल झाले. आरक्षणाच्या मुद्यावरून असलेला रोष मराठा समाजाने 'ईव्हीएम'च्या माध्यमातून असा काही व्यक्त केला की मराठवाड्यात भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही. महाविकास आघाडी आठ पैकी सात जागा जिंकत महायुतीला झटका दिला. या दारूण पराभवाने भाजपचे नेते अचानक ताळावर आले.
पंकजा मुंडे यांचा पराभव तो ही मराठा आरक्षण्याच्या मुद्यावरून झाल्यामुळे ओबीसी आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील वंजारी समाजामध्ये सरकार, भाजपच्या नेत्याबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली. विधानभेच्या निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या असताना आणि राज्यात आधीच मराठा समाज विरोधात गेलेला असताना ओबीसींनी दुखावणारे भाजपसाठी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे ठरणार होते. विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवत अखेर राज्यातील ज्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचे काम केले, त्यांनीच दिल्ली दरबारी पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची विनंती केली.
यातून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. भाजपने पंकजा मुंडे या कुठल्याही परिस्थितीत निवडून आल्या पाहिजे, याची विशेष काळजी घेतली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी विशेष लक्ष दिले. आधीच पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण केल्याचा आरोप सातत्याने त्यांच्यावर झाला. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याबाबतीत कुठलीही जोखीम फडणवीसांनी घेतली नाही. पंकजा मुंडे यांना निवडून आणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर होत असलेले आरोप काही प्रमाणात पुसण्याचा प्रयत्न केला आहे. पंकजा मुंडे यांच्या विजयाने मराठवाड्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच भाजपला फायदा होणार आहे.
विधानसभेतील पराभव ते परिषदेत विजय..,
2012 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा च्या प्रदेशाध्यक्षा म्हणून पंकजा मुंडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. गोपीनाथ मुंडे यांची छाप त्यांच्या भाषणातून वागण्यातून दिसत असल्याने राजकारणात लोकांनी त्यांना स्वीकारले. 2009 मध्ये परळी मतदारसंघातून पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर पंकजा मुंडे निवडून आल्या. 2014 मध्ये दुसऱ्यांदा त्यांनी परळीतून विजय मिळवला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
ग्रामीण विकास, महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या मंत्री म्हणून त्यांनी त्याकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. 1995 शिवसेना-भाजपची सत्ता येण्याआधी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. युतीच्या सत्तेत या यात्रेचा मोठा वाटा होता. त्याच धर्तीवर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 2014 पुर्वी संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर आले होते. 27 ऑगस्ट 2014 रोजी या 14 दिवसांच्या संघर्ष यात्रेत तेव्हा केंद्रातील अमित शाह, स्मृती इराणी, राजीव प्रताप रुडी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. पंकजा मुंडे यांनी 600 रॅली आणि 3500 किमीचा रस्ता प्रवास करून 79 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले होते.
राजकीय आरोपांनी पाठ सोडली नाही..
जून 2015 मध्ये, विरोधी पक्ष काँग्रेसने मंत्री असलेल्या मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. निविदा न काढता चिक्की खरेदीला मंजूरी देऊन नियमांचे उल्लंघन करत भ्रष्टाचाराचे आरोप पंकजा यांच्यावर झाले. पण, त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावले. चिक्की खरेदी सुरू केली तेव्हा ऑनलाइन निविदा प्रणालीचे धोरण अस्तित्वात नव्हते, असे म्हणत पंकजा यांनी हे आरोप फेटाळले होते. 206 कोटींच्या चिक्की घोटाळ्याच्या संदर्भात नंतर पंकजा मुंडे यांना क्लीन चीट मिळाली होती.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.