Mns News : देशाची दिशा ठरवणाऱ्या लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाग न घेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. या त्यांच्या भूमिकेने मनसैनिक द्विधा अवस्थेत असून लोकसभा निवडणूक लढणार नाही तर विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले असल्याने कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. हे संभ्रमाचे कोडे कार्यकर्त्यांना सुटता-सुटत नाही.
विशेषतः येत्या काळात मनसे (MNS) लोकसभेनंतर कुठली निवडणूक लढवणार की नाही ?, निवडणूक रिंगणात उतरला तर उमेदवार उभे करणार की नाही ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक आता कोणता झेंडा हाती घेणार? पक्षाचा की महायुतीचा? प्रत्यक्ष प्रचारात सहभागी व्हायचे की नाही? राज ठाकरे सभा घेणार की नाही? अशा मोठ्या निवडणुकीत पक्षातील नेतेमंडळींची भूमिका काय असणार? अशा असंख्य प्रश्नाचे मोहोळ कार्यकर्त्याच्या मनात घोंघावत आहे. त्यामुळे हा कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा कार्यकर्त्याना संबोधित करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी केलेली घोषणेने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे पाहावयास मिळते. (Raj Thackeray News)
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १५ दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्ली दरबारी भेट घेतल्यानंतर विविध चर्चाना उधाण आले होते. ते लोकसभा निवडणुकीत महायुतीत सहभागी होऊन निवडणूक लढवतील असे अनेकांना वाटत होते. मात्र, राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्याच्या निमिताने पक्षाची भूमिका जाहीर करताना 2024 मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. या त्यांच्या भूमिकेने मनसैनिक द्विधा अवस्थेत असून लोकसभा निवडणूक लढणार नाही तर विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले असल्याने त्यांची भूमिका अजूनही तळ्यात-मळ्यातच दिसत आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका पक्षनिर्मितीपासूनच तळ्यात-मळ्यात अशीच राहिली आहे. त्यामुळे त्यांना पक्ष निर्माण करून १८ वर्षे झाली असली तरी त्यांनी कोणासोबत जायचे आहे ? हे ठोस ठरवले नसल्याने अडचणी येत आहेत.
2009, 2014 व 2019 मध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने त्यांच्या भूमिकेविषयी नेहमीच संभ्रम पाहण्यास मिळतो. त्यातूनच आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी ही घोषणा केल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे पाहावयास मिळते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2006 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नवख्या मनसेने पहिल्याच फटक्यात २७ नगरसेवक निवडून आणले. नाशिक व पुणे महापालिकेत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले होते, तर 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. राज ठाकरे यांच्या या नेत्रदीपक यशामुळे शिवसेनेसमोर खऱ्या अर्थाने आव्हान निर्माण झाले होते. मात्र, यशाची ही घोडदौड राज ठाकरेंना पुढे कायम ठेवता आली नाही.
त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने भूमिका बदलत गेल्याने त्यांच्या पक्षाच्या यशाचा आलेख खालावत गेला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी इतर पक्षाला पोषक भूमिका घेतली तर विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक साधून शिवसेनेशी युती करण्याची बोलणी केली. मात्र, ती बोलणी फिस्कटली. त्यामुळे पुन्हा स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले. त्यावेळी मनसेला विधानसभेच्या एक जागेवर समाधान मानावे लागले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेतली, तर विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. त्यामुळे केवळ एकच आमदार निवडून आला.
आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र ऐनवेळी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. या सर्व त्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहण्यास मिळतो.