NCP Crisis News : राजकीय पक्षांच्या निवडणूका घेणाऱ्या निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रात ‘पाॅलिटिकल बाॅम्ब’ टाकला. त्याचे पडसाद राज्यसभेबरोबर लोकसभेत देशात उमटल्याशिवाय राहणार नाही. ‘पाॅलिटिकल बाॅम्ब’ महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण ढवळून काढेल इतका ‘पावर फुल’ आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला निवडणूक चिन्हं आणि पक्षाचे नाव बहाल केले. त्यांच्या या निर्णयाने आता तर थेट निवडणूक आयोगच राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहे का? असा सवाल सर्वसामान्य मतदारांच्या मनात उपस्थित होत आहे.
‘निर्णय योग्य की अयोग्य’ हा अभ्यासाचा आणि विश्लेषणाचा वेगळा मुद्दा असू शकतो. पण, राज्यसभा निवडणूका तोंडावर असताना, विधानसभा अध्यक्ष 15 फेब्रुवारी रोजी निकाल देणार असताना असे अचूक टायमिंग निवडणूक आयोगाला कसे जमले ?, यातच अदृश्य शक्तींचा हात आहे की, निवडणूक आयोगाला आता निवडणूक घेता घेता राजकीय डावपेच टाकण्यात तरबेज झाले काय ?, अशी शंका मतदारांच्या मनात निश्चित उपस्थित करते. निवडणूक आयोगाने निःपक्ष आहेत हे सिध्द करण्याची गरज नाही. पण, त्यांचे निर्णय घेण्याचे ‘टायमिंग’ हे मात्र बरेच काही सांगून जाते. त्यातच गूढ अर्थ लपला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले आहेत. निवडणूक आयोगाने आज (मंगळवारी) हा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. इतक्यावरच हे प्रकरण थांबणार नाही. तर गटनेता, व्हीप हे मुद्दे 15 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष निश्चित करणार असून त्यामुळे केवळ अजित पवार यांच्याकडे चिन्हं आणि नावच नाही तर व्हिप काढण्याचे अधिकार आजच्या निवडणूक आयोगाच्या निकालावरून जातील. हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिष्याची गरज भासणार नाही.
त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा व्हीप नाकारणे हे कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या आमदाराला महागात पडूच शकते. त्याचबरोबर त्यांची आमदारकी देखील जाऊ शकते. या निकालाने राज्यसभेत एक खासदार अजित पवार गटाला अधिक पाठवता येण्याची शक्यता वाढली आहे. हेच या निकालाचे अचूक राजकीय टायमिंग आहे. त्याचा फटका हा निश्चित शरद पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) तूर्तास राज्यसभा निवडणूकीत बसेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणूकीत निवडणूक आयोग (Election Commission), विधानसभा अध्यक्ष यांच्या निकालाचा कुठलाही मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना बसणार नाही. पण, इंडिया आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेत्यांना त्यांचा पक्ष देखील सांभाळता आला नाही, ही सल निर्माण करणारा हा निर्णय नक्की आहे. विदेशी मुद्यांवर काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्यापासून फारकत घेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
ती महाराष्ट्रात, देशात वाढवली. पण, निवडणुकीच्या वर्षात अदृश्य शक्तींच्या हातचलाखीने निवडणूक आयोगाच्या बाहुल्यांनी महाराष्ट्रात ‘पाॅलिटिकल बाॅम्ब’ फोडून राज्यातील राजकारणात तरंग निश्चित निर्माण केले आहे. राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत निवडणूक आयोगाने आज निकाल दिला असला तरी सर्वोच्च निकाल हा मतदारांच्या हातात असतो. ‘कोणाची वेळ आली’ आणि ‘कोणावर वेळ आणली’ याचा निर्णय मतदार निश्चित घेतील. कारण, घड्याळापेक्षा वेळेलाच किंमत अधिक असते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.