मुंबई : ईशान्य मुंबई अर्थात मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ हा जसा उच्चभ्रू व्यापाऱ्यांचा रहिवास असलेला मतदारसंघ असला, तरी येथे अत्यंत गरिबी असलेल्या सामान्यांची लोकसंख्याही अधिक आहे. खासदार किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना असा सरळ संघर्ष येथे शिगेला पोहचलेला असल्याने 'मराठी विरुद्ध अमराठी'चे ग्रहण या मतदारसंघाला लागले आहे. भाजपचे किरीट सोमय्या येथे खासदार आहेत; मात्र आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. शिवसेना-भाजप युतीच्या वादात या वेळी राष्ट्रवादी आघाडीच्या 'घड्याळा'ला टिकटिक होण्याचे संकेत आहेत.
खासदार सोमय्या यांनी मुलुंड पूर्वेला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय, मतदारसंघात 12 नवे पेट्रोल पंप त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाले. सर्व रेल्वेस्थानकांवर सरकते जीने बसवून त्यांनी प्रवाशांना दिलासा दिला आहे; मात्र युती झाली तरी सोमय्या यांच्यासाठी काम करणार नाही, असा निर्धारच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सोमय्या यांना उमेदवारी द्यावी की नाही, असा पेच भाजपच्या नेतृत्वासमोर आहे. मतदारसंघातील घाटकोपर, मुलुंड, भांडूप (प.) या परिसरात श्रीमंत व्यापाऱ्यांचा रहिवास आहे, तर विक्रोळी, घाटकोपर (प.) हा चाकरमानी कामगारबहुल मतदार आहे. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मुस्लिम आणि दलितांची संख्या अधिक आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दलित-मुस्लिमांची साथ राहील, असे मानले जाते. मराठी मतदार शिवसेनेसोबत असले, तरी संजय दिना पाटील यांचा स्थानिक संपर्क दांडगा आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी सोमय्या यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये 'मोदी लाट' आणि
'युती'मुळे सोमय्यांनी बाजी मारली; मात्र त्यानंतर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची दोन लाख तेहेतीस हजार मते कमी झाली होती. मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचाच बोलबाला दिसत असला, तरी लोकसभा निवडणुकीत मात्र सतत वेगळे चित्र या मतदारसंघात दिसते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मतदार मागील विधानसभेत 'किंगमेकर' ठरला होता. मराठी मतांची विभागणी भाजपच्याच पथ्यावर पडली होती. या वेळी मनसेचे नेते शिशिर शिंदे शिवसेनेत परतल्याने शिवसेनेला आणखी बळ मिळाले आहे. शिवसेना स्वतंत्र लढल्यास सोमय्यांना या वेळी ईशान्य मुंबईचा गड राखणे कठीण होईल, असेच चित्र सध्यातरी दिसते.
पक्षनिहाय इच्छुक उमेदवार
भाजप : किरीट सोमय्या, प्रकाश महेता
राष्ट्रवादी : संजय दिना पाटील
शिवसेना : शिशिर शिंदे
2014 चे मतविभाजन
- किरीट सोमय्या (भाजप) : 5,24,895
- संजय पाटील (राष्ट्रवादी) : 2,08,001
मतदारांमधील नाराजीची कारणे
- मिठागरांच्या जागांचा विकास रखडला
- नाहूर ते मुलुंड अंतर्गत रस्त्यांबाबत दुर्लक्ष
- रमाबाई आंबेडकरनगर आणि मानखुर्द शिवाजीनगर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास
- मानखुर्दमधील मुस्लिम कब्रस्तानचा प्रलंबित प्रश्न
- मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा अभाव
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.