'कर्नाटक'मुळे पालघर, भंडारा-गोंदियामध्ये भाजप 'डेंजर झोन'मध्ये!

'कर्नाटक'मुळे पालघर, भंडारा-गोंदियामध्ये भाजप 'डेंजर झोन'मध्ये!

पुणे: बहुमत नसतानाही कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाला अंगलट आला. संख्याबळ जमवू न शकल्याने मुख्यमंत्री येडीयुराप्पांना राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागला. नरेंद्र मोदी- अमित शाह यांनी शक्‍य तेवढा जोर लावूनही भाजपवर तोंडावर आपटण्याची वेळ आली. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पालघर, भंडारा-गोंदिया या लोकसभेच्या पोटनिवडणुकांवर होणार आहे. 

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक सुरु आहे. भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपच्या धोरणावर नाराज होवून राजीनामा दिल्याने तिथेही निवडणूक होत आहे. 

पालघरमध्ये शिवसेनेने भाजपला खिंडीत गाठले आहे. तिथे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने कॉंग्रेसच्या राजेंद्र गावीत यांना आयात करुन उमेदवार बनवले आहेत. शिवसेना व भाजपमध्ये इथे लढत आहे. भंडारा-गोंदियात भाजपच्या हेमंतकुमार पटलेंविरोधात राष्ट्रवादीचे मधुकरराव कुकडे, अशी लढत आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले यांनी ताकद लावली आहे. 

या दोन्ही निवडणुका जिंकण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी स्वत: लक्ष घातले असून ते पक्षप्रवेश घडवून आणत आहेत. पालघरमध्ये श्रीनिवास वनगांना निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भंडारा- गोंदियात प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेंच्या प्रतिष्ठेचा कस आहे. 

गेली चार वर्षे भाजपने नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणुका लढवल्या आहेत. "मोदी लाट' हेच त्यांचे बलस्थान राहिले आहे. गेल्या सात आठ महिन्यांत उत्तर भारतात झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या, मात्र बहुमत मिळाले नाही. त्यामुळे मोदींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. 

या निकालानंतर भाजपने विशेषत: राज्यपाल वजूभाई वाला यांच्या माध्यमातून सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले, त्याचिरोधात नकारात्मक प्रतिक्रिया उमटली. भाजपकडून होत असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा विरोध देशभरातील पक्षांनी केला. सर्वोच्च न्यायालयानेही फटकारे लगावले. प्रत्यक्षात भाजपला विश्‍वासदर्शक ठरावही मांडता आला नाही. सरकार पडले. तोंडावर आपटल्यासारखी भाजपची परिस्थिती झाल्याने पालघर, भंडारा गोंदियामध्ये त्यांचे मनोधैर्य खचणार आहे. या वातावरणाचा परिपुर्ण फायदा उठवण्याचा प्रयत्न शिवसेना व राष्ट्रवादी करणार आहे. परिणामी भाजपचे उमेदवार डेंजर झोनमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com