नगर जिल्ह्याचे राजकीय मार्गदर्शक हरपले...

नगर जिल्ह्याचे राजकीय मार्गदर्शक हरपले...

जनता पक्षाचे कोपरगाव शहर, तालुकाध्यक्ष तसेच नगर जिल्हाध्यक्ष, कोपरगावचे साहित्य रसिक मंडळ, नेवासे येथील ज्ञानेश्‍वर देवस्थान मंदिर विकास समितीच्या माध्यमातून प्रा. ना. स. फरांदे अर्थात फरांदे सर कायमचेच नगरकरांचेच झाले होते. विधानसपरिषदेचे सभापती, तीन वेळा सदस्य झाल्यानंतर नगरला मिळालेले झुकते माप आणि विशेष म्हणजे सर्वच राजकीय मंडळींशी त्यांच्याशी असलेली जवळीक नगरकरांना अजूनही खुणावते आहे. त्यांच्या जाण्याने आज नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्र शोकाकूल झाले आहे. 

फरांदे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील ओझर्डे (ता. वाई) येथे झाला. प्राथमिक शिक्षणही ओझर्डे येथे, तर माध्यमिक शिक्षण कोपरगाव तालुक्‍यातील साखर शाळेत झाले. शाळेत नेहमी प्रथम क्रमांकावर असलेले फरांदे शिक्षकांचे आवडते विद्यार्थी होते. ते मॅट्रिक वाई येथून झाले. त्यांनी इंजिनीयर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती, मात्र फरांदे यांना भाषा विषय घेऊन पदवीधर व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी सोलापूरला राहून मराठी विषयात बी. ए. केले. त्यावेळी पुणे विद्यापीठात ते प्रथम आले होते. महाविद्यालयीन कालावधीत फरांदे यांच्यावर डॉ. दु. का. संत, डॉ. वि. म. कुलकर्णी आदींच्या विचाराचा प्रभाव पडला. 

दरम्यानच्या काळात त्यांनी धुळे येथे प्राध्यापकाची नोकरी स्विकारली. कोपरगावच्या विठ्ठल नंदराम बोरावके यांच्या कन्या मंगल यांच्याशी प्रा. फरांदे सात मार्च 1967 रोजी विवाहबद्ध झाले. त्यांनी बोरावके कुटुंबियांच्या आग्रहाखातर त्यांनी कोपरगावच्या सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी स्विकारली. जनता पक्षाचे काम करताना प्रारंभी कोपरगाव शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व नगर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. भारतीय जनता पक्षाचा जन्म झाल्यानंतर एका बैठकीत त्यांची थेट भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्या वेळी त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. 

संघटनकौशल्य, अभ्यासू भाषणशैली आदींच्या जोरावर त्यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीपर्यंत मजल मारली. विधानपरिषदेच्या नाशिक मतदारसंघाच्या 1986 च्या निवडणुकीत पक्षाने फरांदे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर 1992 मध्ये याच मतदारसंघातून ते पुन्हा निवडून आले. 1992 ते 98 या काळात ते विधानपरिषदेचे उपसभापती होते. 1998 ते 2004 या काळात त्यांनी विधानपरिषदेचे सभापतिपद भूषविले. 

कोपरगाव परिसरात पाणी वापर संस्था स्थापन करून त्या सक्षमपणे चालविण्याचे काम त्यांनी केले. नगर जिल्हा वगळून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापनेसाठीही फरांदे अग्रेसर होते. 1998 व 2004 मध्ये त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणून लढविली; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. विविध परिषदांच्या निमित्ताने फरांदे यांनी जगभरातील शंभरहून अधिक देशांना भेटी दिल्या होत्या. प्रा. फरांदे राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातूनही आदर मिळवण्यात यशस्वी ठरले होते. 
........................................................... 
प्रा. ना. स. फरांदे यांचा संक्षिप्त जीवनपट 
प्रा. नारायण सदाशिव फरांदे उर्फ प्रा. ना. स. फरांदे 
जन्म : 18 ऑक्‍टोबर 1939 गाव : ओझर्डे, ता. वाई, जि. सातारा शिक्षण : एम. ए. (मराठी) 
भूषविलेली पदे : तीनदा विधानपरिषदेचे सदस्य - विधानपरिषदेचे माजी सभापती 
- भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष - अध्यक्ष, कोपरगाव शहर जनता पक्ष - उपाध्यक्ष, नगर जिल्हा जनता पक्ष 
- प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष - कार्यकारी सदस्य, राहुरी कृषी विद्यापीठ 
- संस्थापक, पुक्‍टो संघटना, विश्‍वस्त, साईबाबा संस्थान, शिर्डी 
- सदस्य, राज्य रोजगार हमी योजना समिती 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com