PCMC Election 2025: प्रभागरचनेत बदल नाही; पण, वाढलेला मतदार कोणाला साथ देणार?
Summary
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी निवडणूक होणार आहे; २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग कायम ठेवले आहेत.
२०१७ मध्ये भाजपने ७७ जागा जिंकून सत्ता मिळवली होती; आता महायुती (भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना-आरपीआय) मजबूत असली तरी बंडखोरीची शक्यता आहे.
प्रशासकांच्या कार्यकाळात मोठे विकास प्रकल्प मार्गी लागले असून, त्यांचे श्रेय निवडणूक प्रचारात उमेदवार घेण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना नकाशांसह जाहीर झाली आहे. त्यानुसार ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच असून सर्व प्रभाग चार सदस्यांचे आहेत. कोणत्याही प्रभागात बदल केलेला नाही. मात्र, शहराची लोकसंख्या वाढल्याने २०१७ च्या तुलनेत प्रत्येक प्रभागांतील लोकसंख्या वाढली आहे.
त्यामुळे ‘जुन्या प्रभागात केवळ लोकसंख्या वाढीचा भार’ अशी स्थिती आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची पंधरा वर्षांची सत्ता जाऊन भारतीय जनता पक्षाने एकतर्फी विजय मिळवला होता. आता त्यांच्यासोबत राष्ट्रवादीसह शिवसेनाही आहे. शिवाय शहरातील चार आमदार भाजपचे, एक राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे बळ आणखी वाढले आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी अशी पाच गावे एकत्र येऊन १९७० मध्ये पिंपरी-चिंचवड नगरपालिका अस्तित्वात आली होती. त्यात लगतची गावे समाविष्ट करून १९८२ मध्ये महापालिका झाली. या महापालिकेवर पहिली चार वर्षे प्रशासकराज होते. महापालिकेची पहिली निवडणूक १९८६ मध्ये झाली. तेव्हापासून २००२ पर्यंत कॉँग्रेसची सत्ता होती.
१९९८-९९ मध्ये कॉँग्रेसमध्ये फूट पडल्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरातही उमटले होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना झाली. २००२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता महापालिकेत होती. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. १९८६ पासून २०१२ च्या निवडणुकीपर्यंत बोटावर मोजण्याइतके संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत १२८ पैकी ७७ जागा जिंकून महापालिका ताब्यात घेतली.
पंधरा वर्षे सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला केवळ ३६ जागांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेनेला अवघ्या नऊ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक जागा मिळाली होती. कॉँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. पाच ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली होती.त्यांनी भाजपला साथ दिली होती. या पदाधिकाऱ्यांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. त्यापूर्वी म्हणजे मार्च २०२२ पूर्वी महापालिका निवडणूक अपेक्षित होती. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम, राज्यातील बदलत्या घडामोडी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाचे न्यायप्रविष्ट प्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. परिणामी, १४ मार्च २०२२ पासून सरकारने आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. तेव्हापासून आयुक्तच महापालिकेचा कारभार पाहत आहेत.
प्रभाग रचना प्रतीक्षा संपली
सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश एप्रिलमध्ये दिला होता. त्यानंतर चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रभाग रचना तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूक विभागाला दिला होता. त्याप्रमाणे प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून राज्य नगरविकास विभागाला सादर केला होता. नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी तो शुक्रवारी (२२ ऑगस्ट) जाहीर केला आहे. त्यामुळे प्रभाग रचना नक्की कशी असेल? याची प्रतीक्षा संपली आहे. मात्र, त्यावर हरकती व सूचना चार सप्टेंबरपर्यंत मागवल्या आहेत. त्यावर सुनावणी होऊन नियोजित वेळापत्रकानुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे २०२१ मध्ये अपेक्षित असलेली जनगणना झालेली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी २०११ ची पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे.
नवीन समीकरणांचा परिणाम
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर नवीन समीकरणे निर्माण झाली आहेत. त्याचा परिणाम शहरावरही झाला आहे. राज्य व केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेचे लोकप्रतिनिधी शहरात आहेत. त्यात विशेषतः तीन विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणारे तीनही आमदार, विधान परिषदेचे दोन सदस्य, दोनपैकी एक खासदार यांचा यात समावेश आहे. त्यामुळे सरकारसह लोकप्रतिनिधींचा प्रभाव प्रभाग रचनेवर पडेल. त्यांचा हस्तक्षेप प्रभाग रचनेवर होईल, आपल्या सोईनुसार प्रभाग रचना करण्यास प्रशासनावर दबाव येईल, अशी चर्चा शहराच्या राजकीय गोटात होती. मात्र, या सर्व शक्यता व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
प्रभागरचनेत बदल नाही
कोरोना प्रतिबंधक कारणांमुळे २०२१ मध्ये जनगणना झालेली नाही. त्यामुळे शहराची लोकसंख्या नक्की किती? हे नेमकेपणाने सांगता येणे अवघड आहे. मात्र, अंदाजे ३० लाखांवर लोकसंख्या गेली आहे. या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या निश्चित केली आहे. प्रत्येक प्रभागात किमान ४९ हजार तर किमान ५९ हजार लोकसंख्या आहे. मात्र, २०११ च्या लोकसंख्येनुसार ब्लॉक करून प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे. ती २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच आहे. त्यात काहीही बदल केलेला नाही. मात्र, प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या मात्र वाढलेली आहे.
महायुतीला फायदा, पण...
चार सदस्यीय प्रभाग रचना २०१७ मध्ये भाजपला लाभदायक ठरली होती. आताही त्याच पद्धतीने प्रभाग रचना केलेली आहे. त्यांच्या सीमांमध्येही काहीही बदल नाहीत. त्यामुळे या प्रभाग रचनेचा भाजपला फायदा होणार, हे निश्चित आहे. मात्र, आता त्यांच्या समवेत अर्थातच महायुतीतील राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षही (आठवले गट) आहे. यात भाजपनंतर राष्ट्रवादीचे पारडे जड आहे.
शिवसेना व आरपीआयला काही जागा सोडाव्या लागतील. एकंदरीत महायुतीने एकत्र निवडणूक लढल्यास इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे बंडखोरी होऊ शकते. त्यामुळे सावध पावित्रा घेत पक्षनेतृत्वाला निर्णय घ्यावे लागणार आहेत. किंवा स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन मैत्रीपूर्ण लढती त्यांना कराव्या लागतील. किंवा थेट एकमेकाच्या विरोधात लढून निकालानंतर ‘आपण सर्व एकच’ म्हणून सत्ता स्थापनेसाठी एकत्र येण्याचे नियोजन ते करू शकतील. मात्र, प्रत्येक प्रभागात वाढलेली लोकसंख्या पर्यायाने वाढलेला मतदार कोणाला साथ देतो? त्यावरही आगामी निकाल अवलंबून असेल.
महाविकास आघाडीचा कस
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉँग्रेस यांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढल्यास अधिक प्रभाव पडू शकतो. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दोन वर्षांपूर्वी फूट पडली तेव्हा प्रमुख पदाधिकारी अगोदर अजित पवार यांच्या समवेत गेले. काही दिवसांनी शरद पवार यांच्या पक्षात आले. आता दोन महिन्यांपूर्वी पुन्हा हे पदाधिकारी अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत. २०१७ मध्ये भाजपसोडून राष्ट्रवादीत आलेले काही पदाधिकारी आता दोन्ही राष्ट्रवादीमध्ये विभागले गेले आहेत.
मात्र, त्यांची संख्या बोटावर बोजण्याइतकी आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले तर काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच काम करण्याची तयारी दर्शवली. सामान्य कार्यकर्त्यांमधील बहुतांश शिवसेना कार्यकर्ते ठाकरे यांच्या समवेतच आहेत. शिवाय, राज्य पातळीवर ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भेटले होते. त्यांची भूमिका पिंपरी-चिंचवडबाबत काय असेल, यावर पुढील गणित अवलंबून असेल. मात्र, त्यांचे प्राबल्य विशिष्ट भागापुरतेच मर्यादित आहे.
प्रशासकीय कामे तरीही श्रेय...
महापालिका आयुक्त १४ मार्च २०२२ पासून प्रशासक म्हणून कारभार पहात आहेत. प्रशासकीय कार्यकालात मार्च ते सप्टेंबर २०२२ पर्यंत राजेश पाटील आणि सप्टेंबर २०२२ पासून आजपर्यंत शेखरसिंह काम पहात आहेत. या साडेतीन वर्षात दोघांनीही ठोस निर्णय घेऊन लोकप्रतिनिधी काळात वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले मोठे प्रकल्प मार्गी लावून आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
यामध्ये १८ मीटर पेक्षा अधिक रुंदीची रस्ते यंत्राद्वारे सफाई; पर्यावरणपूरक महापालिका प्रशासकीय इमारत; ७५० खाटांचे मोशीतील मल्टिस्पेशालिटी रुग्णालय; चिंचवड स्टेशन येथील सीटी सेंटर; निगडी ते दापोडी जलवाहिनी; विकास आराखड्यातील (डीपी) ३५ रस्त्यांची निर्मिती; काही रस्त्यांचे रुंदीकरण; मोशी-निगडी स्पाइन रस्ता, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता चिखली, निगडी भक्तीशक्ती ते किवळे मुकाई चौक अशा रस्त्यांचे मिसिंग लिंक; सांगवी-रावेत बीआरटी मार्गावरील रक्षक सोसायटी चौकातील भुयारी मार्ग; देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील किवळे ते वाकड दोन्ही बाजूच्या प्रत्येकी १२ मीटर रुंद सेवा रस्त्यांसाठी भूसंपादन; पुणे-नाशिक महामार्गाच्या नाशिक फाटा ते मोशी दरम्यान रुंदीकरणासाठी भूसंवादन अशा विविध प्रकल्पांना प्रशासकांनी मान्यता देऊन वर्षानुवर्ष रखडलेली कामे मार्गी लावली आहेत. मात्र, या कामांचे श्रेयही काही माजी नगरसेवक व विद्यमान लोकप्रतिनिधी घेत असून तशा स्वरुपाची जाहिरातबाजी करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीतही या कामांचा वापर प्रचारासाठी होणार हे निश्चित...!
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार)
एकूण ः १७,२७,६९२
अनुसूचित जाती ः २,७३,८१०
अनुसूचित जमाती ः ३६,५३५
FAQ
प्र.१: पिंपरी-चिंचवड महापालिकेत किती जागांसाठी निवडणूक होणार आहे?
उ. १२८ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
प्र.२: प्रारूप प्रभाग रचनेत काय बदल झाले आहेत?
उ. २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग कायम ठेवले असून, सीमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
प्र.३: २०१७ च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने सत्ता मिळवली होती?
उ. भाजपने १२८ पैकी ७७ जागा जिंकून महापालिकेवर ताबा मिळवला होता.
प्र.४: या निवडणुकीत महायुतीसमोर कोणते आव्हान आहे?
उ. जागावाटपामुळे बंडखोरी होण्याची शक्यता हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे.
(Edited by: Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.