मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिनेसेनेच्या आश्वासन दिलेल्या 10 रूपयांत थाळीचा सुरूवात पालिका मुख्यालयात करण्यात आली.मात्र ही थाळी केवळ पालिकेतील कर्मचारी आणि आधिकाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली असून सर्वसामान्य जनतेला अजून वाट पाहावी लागणार आहे. पालिकेतील 10 रुपयात थाळी नव्याने सुरू झाली नसून या आधीपासून सुरू असल्याचे सांगत शिवसेना यासाठी करदात्यांच्या पैश्यांचा उधळपट्टी का करते असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली दहा रुपयात जेवणाची पहिली थाळी गुरुवारी महापालिका कॅन्टीनमध्ये सुरू करण्यात आली.त्यात दोन चपात्या, दोन भाज्या, डाळ, भात अस या थाळीचं स्वरूप आहे.महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत थाळीचा शुभारंभ करण्यात आला असून यापुढे या थाळीचं प्रदर्शन करण्यात येणार आहे.
सध्या ही थाळी केवळ पालिका कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आली असून सर्वसामान्यांना या थाळीचा आस्वाद घेता येणार नाही.यामुळे पालिकेत येणारे सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत. शिवसेनेच्या या 10 रुपयात थाळीची भाजपने खिल्ली उडवली आहे.शिवसेनेने सुरू केलेल्या या थाळीमध्ये नवीन काही नसून अशी थाळी चार वर्षांपासून पालिकेच्या कॅंटीनमध्ये मिळत असल्याचे सांगत ही दिशाहीन थाळी असल्याची टीका भाजपचे गटनेते खासदार मनोज कोटक यांनी केली आहे.
शिवसेनेने या थाळीचा भार करदात्यांवर न टाकता स्वखर्चाने करावा अशी चिमटा ही कोटक यांनी काढला.याबाबत महापौरांना विचारले असता ही थाळी आधी मिळत असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र आज पासून या थाळीचे प्रदर्शन केले जाईल असा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. दरम्यान पालिकेत या आधी पासूनच 10 रुपयात थाळी मिळत असल्याने शिवसेनेने या योजनेचं दुसऱ्यांदा उदघाटन केल्याचीच चर्चा पालिकेत रंगली आहे.
पालिकेत गेले चार वर्षांपासून 10 रुपयात जेवणाची थाळी मिळत असताना आज पुन्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 10 रुपयात जेवणाच्या थाळीचा शुभारंभ स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आदी नगरसेवक उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर अर्ध्या तासाने आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना आणून पुन्हा या थाळीचे उदघाटन केले. यामुळे पालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये थाळीच्या उदघाटनावर एकमत नसल्याची चर्चा पालिका मुख्यालयात आहे.
पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी 10 रुपयात जेवणाची थाळी सुरू केली. पालिकेच्या आहारगृहात यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौरांसह स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेत्या उपस्थित होत्या. मात्र पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.