अमित शाहंचा 'कर्नाटक बीजेपी'वर भरोसा नाय कां? 

कर्नाटक भाजप स्वबळावर जिंकेल असा आत्मविश्‍वास स्वत: पक्षाध्यक्षांनाच दिसत नाही. त्यामुळेच त्यांनी कर्नाटकचा उल्लेख केल्याचे दिसत नाही. अमित शाहंनी पश्‍चिम बंगाल, ओडिसाचा उल्लेख केला, मात्र महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकवर बोलणे टाळले, यातच सर्व काही आले!
अमित शाहंचा 'कर्नाटक बीजेपी'वर भरोसा नाय कां? 

पुणे: मुंबई बीकेसीमध्ये झालेल्या महामेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपचा सुवर्णकाळ आणण्यासाठी 2019 ला मोदी सरकार पुन्हा निवडून आणण्याचे आवाहन केले. त्याबरोबरच पश्‍चिम बंगाल, ओडिसामधील सत्ता मिळविण्याचा आशावाद व्यक्‍त केला. मात्र सद्या निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या आणि 2019 साठी देशाचा मूड ठरविण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कर्नाटक निवडणुकीविषयी त्यांनी चकार शब्द काढला नाही. 

ज्या मुंबईत भाजपची स्थापना झाली, त्याच ठिकाणी आज भाजपचा स्थापना दिवस लाखो कार्यकर्त्यांच्या साक्षीने झाला. 2019 च्या पार्श्‍वभूमीवर मोदीविरोधी आघाडीची तयारी सुरु असताना आणि उत्तरप्रदेशतील महत्त्वाच्या दोन पोटनिवडणुकांतून भाजपचा पराभव शक्‍य असल्याचा संदेश देशभर गेला असताना हा मेळावा झाला. अमित शाह यांनी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारचे गुणगाण गात असताना हा भाजपचा सुवर्णकाळ नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

भाजपचा सुवर्णकाळ आणण्यासाठी 2019 ला पुन्हा मोदी सरकार आले पाहिजे, तसेच पश्‍चिम बंगाल, ओडिसामध्ये भाजपची सत्ता आली पाहिजे, असा आशावाद व्यक्‍त केला. त्याबरोबरच महाराष्ट्रातही पुन्हा भाजपची सत्ता आली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. मात्र यात कुठेही त्यांनी कर्नाटकचा उल्लेख केला नाही. 

मोदी-शाह जोडगोळीने 2014 पासून भाजपला "न भूतो न भविष्यती' असे यश मिळवून दिले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांना निष्प्रभ करणारे नेतेही टिकून आहेत. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचा विजय झाला. गोव्यासारख्या अन्य राज्यात कॉंग्रेसने भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्या.

राजकीय डावपेचांनी भाजपने गोव्यासह अन्य राज्यात कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले असलेतरी राजकीय वातावरण एकतर्फी भाजपच्या बाजूने नाही, हा संदेश गेला आहे. मोदी-शाहंच्या गुजरातमध्ये जावून कॉंग्रेसने त्यांना घाम फोडला. भाजपचे आमदार मोठ्या संख्येने कमी झाले आणि कॉंग्रेसचे वाढले. राजस्थान, मध्य प्रदेशातील लोकसभेच्या पोटनिवडणुकांत कॉंग्रेसने भाजपला पराभूत केले.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला आहे. यापार्श्‍वभूमीवर कर्नाटकची निवडणूक होत आहे. 15 मे रोजी कर्नाटकचे निकाल लागणार आहे. सत्ताधारी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये थेट सामना आहे. या निवडणुकीत कोण जिंकेल, त्यावर देशाच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. कॉंग्रेसने सत्ता राखली तर मोदींच्या अडचणी वाढणार आहे, भाजप जिंकला तर त्याचा फायदा राजस्थान, मध्य प्रदेशात मिळू शकतो. 2019 ची निवडणूक सोपी जावू शकतो. 

मोदी-शाह यांनी महाराष्ट्र, हरियाणा, छत्तीसगड, आसाम, उत्तरप्रदेश, आसाम आदी प्रमुख राज्यांत संत्तातर घडवून भाजपची सत्ता आणून दाखवली आहे. आता तेच आव्हान कर्नाटकात आहे. मात्र कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरम्मय्या हे कॉंग्रेसचे सक्षम नेतृत्व असल्याने भाजपला लढाई सोपी नाही. सत्ता घेण्याचा चंग मोदी-शाह यांनी बांधला असलातरी अनेक आघाड्यावर भाजप पिछाडीवर आहे.

लिंगायत धर्म मान्यतेच्या मुद्दावर सिद्धरमय्या यांनी भाजपला कोंडीत पकडले आहे. अमित शाह यांच्याकडून अनावधाने, चुकीच्या भाषांतरकारामुळे पक्षाला डॅमेज करणारी वक्‍तव्ये झाली आहेत. अमित शाह सातत्याने सिद्धरमय्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मात्र अमित शाह यांनी एकदा येडेयुरप्पा सरकार हे भ्रष्टाचारी असल्याचा उल्लेख केला. शाह यांच्या भाषांतरकाराचे काम करत असलेल्या खासदाराने "मोदी देशाला उद्धवस्त करतील', अशी वाक्‍ये उच्चारली. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात भाजप बॅकफुटवर गेला आहे.

यासंदर्भाने कर्नाटक भाजप स्वबळावर जिंकेल असा आत्मविश्‍वास स्वत: पक्षाध्यक्षांनाच दिसत नाही. त्यामुळेच त्यांनी कर्नाटकचा उल्लेख केल्याचे दिसत नाही. अमित शाहंनी पश्‍चिम बंगाल, ओडिसाचा उल्लेख केला, मात्र महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकवर बोलणे टाळले, यातच सर्व काही आले! 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com