फलटण : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष वेधून घेतलेल्या फलटण कोरेगाव मतदार संघातील निवडणूक सुरवातीच्या काळात अटीतटीची वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिपक चव्हाण यांनी रामबाणातून वेध घेत विरेाधी पक्षाचे उमेदवार दिगंबर आगवणे यांना चारीमुंड्या चित करुन फलटण राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला असल्याचा शिक्का उठवत आमदार दिपक चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक केली.
राज्याची विधानसभा निवडणूक जाहिर झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व भाजपचे उमेदवार यांच्यातच लढत होणार हे स्पष्ट झाले होते. त्यातच विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शहरात कार्यकर्त्यांचे चार मेळावे घेत मतदारांचा अंदाज जोखला. त्यातच आजची तरुणाई राजकारणाकडे कोणत्या भावनेने पहाता याचा मेळाव्यातून अंदाज घेतला. दरम्यान शरद पवार यांच्याशी सतत चर्चा करुन निवडणूकीची निती आखली व अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी एक दिवस दिपक चव्हाण यांची उमेदवारी राष्ट्रवादीने जाहिर करीत मतदारांना बोलत केले.
दरम्यान फलटण कोरेगाव विधान सभा मतदार संघ शिवसेनेकडे असताना विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य पातळीवर प्रयत्न करुन सदरचा मतदारसंघ भाजपकडे आणण्याचा प्रयत्न केला. त्याला यश येत भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती सेनेची उमेदवारी आगवणे यांना मिळवून दिली. तोपर्यंत रयत क्रांती सेनेचा व आगवणे यांचा राजकीय संबंध केवळ सदाभाऊ खोत यांच्यापुरताच मर्यादित होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तालुक्यातील भाजपचे मूळचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असल्याचे कोठेही दिसले नाही.
निवडणूक दरम्यान प्रचाराचे घमासान सुरु झाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिपक चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा रामराजे, संजीवराजे व रघुनाथराजे यांच्या खांद्यावर होती तर आगवणे याच्या प्रचाराची जबाबदारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फलटण शहरात जंगी सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर गावोगावी सभा पदयात्रा करीत आपण केलेल्या व न केलेल्या कामाची जंत्री मतदारांपुढे मांडत प्रचाराचा धडाका सुरू केला. प्रचारकाळात बारामतीकडे गेलेले निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी अडवून तालुक्यातील शेतीला अधिक पाणी, फलटणला सुरु केलेली लोणंद ते फलटण रेल्वे, नाईकबोमवाडी येथे नव्याने होणार्या औद्योगिक वसाहतीत युवकांच्या हाताला काम, साखरवाडी येथील फलटण शुगर वर्क्स वाताहात असे प्रचारातील प्रमुख मुद्दे आगवणे यांना निवडणूकीत यश मिळवुन देऊ शकले नाहीत.
मात्र गेल्या २५ वर्षात विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यात केलेल्या विकासकामात धोम बलकवडी प्रकल्पाचे दुष्काळी भागाला मिळालेले पाणी, कमिन्स उद्योगात युवकांना रोजगार, शहरातील बंदीस्त गटार योजना, फलटण शुगर वर्क्सचा प्रश्न सोडवून कारखाना येत्या हंगामात सुरु, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत बिले मिळणार, श्रीराम कारखान्याने पुर्णपणे दिलेली एफआरपी रक्कम या बाबी ठळकपणे मतदारांसमोर मांडत असतानाच तालुका दहशत व गुंडगिरीतून मुक्त करण्याचा दिलेला शब्द मतदारांनी भावला परिणामी दिपक चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक केली असेच मानावे लागेल.
एकूणच फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहेच पण त्याच बरोबर मतदार विकासकामांना प्राधान्य देणारा असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. मुळात जोडीला दिपक चव्हाण हे सालस व सुक्षिक्षित व्यक्तिमत्व असून त्याच्याकडून तालुक्याच्या राजकारणात वावगेपणा कधीही दिसला नाही, हे मतदार ओळखुन आहेत म्हणूनच त्यांना विजयाची हॅटट्रिक साधता आली.
------------
उमेदवार आणि मते
दीपक चव्हाण : 117617
दिगंबर आगावणे : 86636
मताधिक्य 30981
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.