अजित पवारांच्या उपस्थितीत संदीप क्षीरसागर यांचा  जयदत्त अण्णांवर हल्लाबोल  !

संदीप क्षीरसागर यांची तोफ धडाडत असताना अजित पवार मात्र गालातल्या गालात हसत होते .
Kshirsagars_in_beed
Kshirsagars_in_beed

बीड :  राष्टवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात बीड जिल्ह्यात आज भाजपऐवेजी पक्षांतर्गतच हल्लाबोल झाला .  माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्याविरुद्ध त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांच्या उपस्थितीत उघडपणे बंडाचे निशाण फडकावले .  संदीप क्षीरसागर यांची तोफ धडाडत असताना अजित पवार मात्र गालातल्या गालात हसत होते . 

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृतवाखाली जयदत्त क्षीरसागरांविरुद्ध मोहीम सुरु असल्याचे आजच्या सभेतील भाषणातून स्पष्ट झाले .

जयदत्त अण्णांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या घरी आमंत्रित करून त्यांचा केलेला पाहुणचार पक्षात चर्चेचा विषय बनला होता . त्याचे प्रत्त्युत्तर संदीप क्षीरसागर यांच्यामार्फत दिले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे . 


बीड शहरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेची सूत्रे  संदीप क्षीरसागर यांच्याकडेच सोपविण्यात आलेली होती .राष्ट्रवादीचे विधीमंडळातील नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, आमदार अमरसिंह पंडित, विद्या चव्हाण, सतीश चव्हाण, विक्रम काळे आदी नेत्यांच्या उपस्थितीत ही सभा झाली . 

अजित पवारांच्या उपस्थितीत संदीप क्षीरसागर यांचा  जयदत्त अण्णांवर हल्लाबोल केला . सभेची सुरुवातच त्यांनी   काका आमदार जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर नाव न घेता तडाखेबाज  टीका केली . 

विजेचे भारनियमन आणि शेतकऱयांच्या अडचणींचा उल्लेख करून संदीप काही नेते उर्जामंत्रयांची भेट घेतल्याचे फोटो माध्यमांना पाठवून  शेकडो रोहित्र उपलब्ध झाल्याचे सांगतात. मग, रोहित्र कुठे आहेत ?असा सवाल केला. मधल्या काळात जयदत्त क्षीरसागर यांनी उर्जामंत्रयांची भेट घेतल्याचे पत्रक काढले होते.  त्यामुळे सभेत हा संदर्भ घेत श्रोत्यांमध्ये हास्याची लाट उसळली . 

काही दिवसांपूर्वी  वीज मिटर तोडणी - जोडणीवरुन काका - पुतण्याध्ये उडालेल्या विषयालाही छेडले. दहा वर्षांपासून नियमित बील भरत असतानाही आपली वीज जोडणी तोडण्यासाठी उर्जा मंत्रयांपासून ते महावितरणच्या मुख्य अभियंत्यांपर्यंत अनेकांनी कशी धडपड केली याचा उल्लेख देखील त्यांनी केला .  
बीड नगर पालिकेच्या विषयावरुन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनाही संदीप यांनी थेट नाव न घेता खडे बोल सुनावले . 

यावेळी त्यांनी आपल्या फटकेबाजीचे गुपित उघड केले. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपली  तरुण नेत्यांची  लगान टिम आहे असे सांगून संदीप यांनी   धनंजय मुंडेंनी आपल्याला  बॅट, प्रकाश सोळंकेंनी पॅड आणि अमरसिंह पंडित यांनी हॅंडग्लोव्ह्ज  दिल्याचे सांगीतले.   त्यावरून काकांविरुद्ध पुतण्याच्या बंडाला रसद कोण पुरवतय हे स्पष्ट झाले . 

  आतापर्यंत विविध  निवडणुकांत  तुमच्या आशिर्वादानेच  जिंकल्या  यापुढेही आशिर्वाद द्या अशी  अजित पवारांना  विनंती करीत संदीप यांनी  विधानसभा निवडणुकीसाठी  आपली तयारी असल्याचे सूचित केले .  संदीप यांना  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व राजेंद्र जगताप यांनी आपल्या भाषणातून भक्कम  बळ दिले.

  धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागरांचा जिवलग सहकारी असा उल्लेख केला. त्यानंतर हल्लाबोल सर्वसामान्यांसाठी असून कोणा एकाचा नाही असे ठणकावले . आष्टीचे  सुरेश धस ज़िल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप प्रवेशाची वाट पाहत आहेत . तो संदर्भ घेत काही नेते कन्फ्यूज असून आपलेही आष्टीसारखे होते की  काय  ? या चिंतेत  असल्याचा टोला ,मुंडेंनी  नाव न घेता जयदत्त क्षीरसागर यांना लगावला. 

 राजेंद्र जगताप यांनी आष्टीत बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे आणि महेबुब शेख व बीडमध्ये संदीप क्षीरसागर असे अजित पवारांनी दोन महत्वाचे बदल केल्याचे नमूद करुन संदीप यांचा गौरव केला . तसेच, संदीप क्षीरसागरांना विधानसभेला उमेदवारी देण्याची  थेट मागणी करून जगतापांनी जयदत्त अण्णांना बाजूला करण्याच्या हालचालींची दिशा स्पष्ट केली . 

संदीप क्षीरसागर भाषणाला उभे राहताच त्यांच्या  समर्थकांनी घोषणाबाजी सुरु केली. वारंवार होत असलेली घोषणाबाजी थांबविण्यासाठी संदीप क्षीरसागर आवाहन करत होते. यावेळी खाली बसून कागदावर टिपण काढत असलेले अजित पवार स्मित हास्य करत होते. बीडमध्ये भाषणातून कुठलेही राजकीय संकेत न देणाऱ्या अजित  पवारांनी गेवराईच्या सभेत मात्र जेष्ठांचा अनुभव आणि नव्यांना पुढे करायचे असे सूचक विधान केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com