चंद्रकांतदादा, सुधीरदादा एक गोष्ट पाच वर्षे आपल्या मोबाईल स्क्रिनवर सेट करा !

सांगली डॉट कॉम
चंद्रकांतदादा, सुधीरदादा एक गोष्ट पाच वर्षे आपल्या मोबाईल स्क्रिनवर सेट करा !

प्रति,  सन्मानीय चंद्रकांतदादा,  सुधीरदादा, संजयकाका,  सुरेशभाऊ आणि उर्वरित भाजप नेते   सांगलीकरांचा आपल्याला नमस्कार!   

सांगलीच्या उभ्या राजकीय इतिहासात आम्ही तिन्ही शहरांतील नागरिकांनी विश्‍वस्त म्हणून महापालिकेची सत्ता आपल्या हाती दिली, ती पारदर्शक कारभाराच्या अपेक्षेने! आपल्या कामाची सुरवात आता होते आहे. येत्या सोमवारी या नव्या सभागृहाची पहिली महासभा असेल. त्यासाठी शुभेच्छा. मात्र त्याआधीच स्वीकृत सदस्य निवडीरून भाजपमधील वादाची चर्चा सुरू झाली आहे. ज्यांना आम्ही जनतने नाकारले आहे अशांचा किंवा ज्यांना उमेदवारीच नाकारली अशांचा मागील दाराने प्रवेश करण्याचा हट्ट आपल्या पक्षात विकोपाला गेला आहे.

भाजपचे दादा म्हणवून घेणारेही नेतेही अशा हट्टापुढे हतबल झाले असल्याच्या चर्चा कानोकानी पसरताहेत. पण भाजपवाल्यांनी एक गोष्ट पाच वर्षे आपल्या मोबाईलवर स्क्रिनवर सेट करावी. ती म्हणजे सांगलीत लोकांनी सत्ता परिवर्तन का केले? लोकांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळून भाजपकडे महापालिका दिली आहे. त्यामुळे आता किमान स्वीकृतबाबत तरी दोन्ही कॉंग्रेसने ज्या चुका केल्या त्या भाजपने करू नयेत. स्वीकृत सदस्य निवडीचा हेतू महापालिका कायद्यात स्पष्टपणे नमूद आहे.

समाजातील विविध क्षेत्रातील जाणकारांच्या अनुभव माहितीचा सभागृहाला फायदा व्हावा या हेतूने ही सदस्य निवड असावी असे कायदा सांगतो. पारदर्शक कारभारावर सतत बोलले जाते तर इथेही ती पारदर्शकता दाखवली जावी. सांगलीकरांच्यावतीने हे आवाहन. सत्तेची मजा करू नका, आणि राजकारणाचा अड्डाही बनवू नका. कारण शहर खूप मागे पडलेय. निवडणुकीत हे मुद्दे नव्हते. मात्र जनतेने बदलाच्या अपेक्षेने तुमच्या पारड्यात वजन टाकले. निवडणूक मुद्द्यावर आणली. याचा विसर नको.

दोन्ही कॉंग्रेस एक होऊनसुद्धा जनता जर तुमच्या हाती सत्ता देत असेल तर यामागचा जनमाणस ओळखा...आणि तरीदेखील हा माझा, हा त्याचा, हा निरोप वरून आलाय, असे म्हणत कोणाचीही खोगीरभरती महापालिकेत करू नका. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी स्वीकृत म्हणून ज्यांना पाठवले त्यांनी नेमके महापालिकेत काय दिवे लावले? (यापैकी साही सन्मानीय अपवादही आहेत) हे नागरिकांना ज्ञात आहे. त्यामुळे अनेक वर्षे महापालिकेत तळ ठोकून बसलेल्या अनेक पदधिकाऱ्यांना यावेळी जनतेने आता आपण निवृत्त व्हा, असा सल्ला मतपेटीतून दिला आहे. त्यामुळे आता वर्षानुर्षे तळ ठोकलेले कोणीच नकोत. जनता दोन्ही कॉंग्रेसला हे सांगून दमली. मात्र ते पुन्हा पुन्हा त्याच चुका करत गेले. आता पराभवानंतर त्यांनी आत्मपरीक्षण केले का हेही त्यांच्या स्वीकृत निवडीतून दिसेल. त्यांचीही दोन चांगली माणसे सभागृहात येतील अशी आशा बाळगुया. तशी त्यांना सुबुद्धी होवो.

सत्तेच्या मिळालेल्या या संधीतून शहरे पुढे नेण्यासाठी जाणीवपूर्वक काही तज्ज्ञ लोकांना महापालिकेत स्वीकृत म्हणून पाठवा. ही माणसे भूखंड लाटण्यासाठी, टक्‍केवारीवर ताव मारण्यासाठी किंवा यापूर्वी जशा काही बाहेरच्या एजन्सीज आणून लोकांनी पालिकेची लूट केली अशातील नसावीत. हा एकच निकष लावावा. भाजपमध्ये जनतेतून निवडून न येणारे व नि:स्वार्थीपणे काम करणारे अनेक आहेत. त्यांनाही संधी द्या. कोऱ्या पाटीवरच काही लिहिले जाऊ शकते. ही मंडळी काही चांगले मांडतील. नियोजन करतील. अशांना संधी द्या.  महाआघाडीचा प्रयोग विविध नेत्यांनी एकत्र येवून केला. पण त्यावेळी देखील स्वीकृत नगरसेवकांची निवड करताना पुन्हा जनतेने नाकारलेले पडेल किंवा नातेवाईकांची भरती केली गेली. मागील कॉंग्रेसच्या सत्तेतही स्वीकृत वरून खूप राडा झाला. पण नेत्यांनी त्याच पडेलांना आणि धनवंतांना स्वीकृत केले. यात अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची जोरदार चर्चा त्यावेळी झाली होती. या विरोधात मदनभाऊ युवा मंचसह कॉंग्रेसमधील अनेकांनी या निवडीच्या निषेधात आपले राजीनामे दिले. यातून भाजप योग्य बोध घ्यावा.

आता केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता आणि जिल्ह्यातील सर्व महत्त्वाची सत्ता केंद्रे भाजपच्या ताब्यात आली आहेत. असेच पूर्वी कॉंग्रेसचेही असायचे. आता कॉंग्रेस इथे का हरली याचे आत्मपरीक्षण न करता नेते पराभवासाठी ईव्हीएम किंवा बंडखोरांना दुषणे देत बसले आहेत. आपल्या नगरसेवकांनी काय प्रतीचा कारभार केला, याबाबत ते ब्रही काढताना दिसत नाहीत.

आता ते आत्मपरीक्षण करोत वा ना करोत मात्र भाजप नेत्यांना ही कारणे माहीत ज्ञात आहेत. म्हणून स्वीकृतमधून अराजकीय विविध क्षेत्रातील लोकांना पाठवण्याची नवी सुरवात भाजपने करून दिली तर एक चांगली प्रथा पडेल.  सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, क्रीडापटू, वकील, अभियंते अशांच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्यांना कधी तरी आपल्या शहराचे विश्‍वस्त म्हणून आपण स्वीकारणार आहात की नाही? याचे उत्तर या निवडीतून सांगलीकरांना मिळो. या निवडी तुमच्या कारभाराची दिशा ठरवणाऱ्या असतील. पुढच्या तीन-चार महिन्यांत कारभारात काही बदल दिसावा. लोक तेवढा संयम पाळतील. अन्यथा..! तूर्त इतकेच.  

आपली  मोठ्या अपेक्षा लावून बसलेली;  सांगली, मिरज, कुपवाडकर जनता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com