सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा कारखान्याच्या निमित्ताने जयंतरावांभोवती विरोधकांचे मोहळ उठविले. त्यानंतर जयंतरावांनी "माझा नाद करू नका' असे थेट आव्हान त्यांना उद्देशून दिले होते. यावर भाजपमधील एकाही नेत्याने त्यांना प्रत्युत्तर दिले नव्हते. मात्र नुकत्याच झालेल्या भाजपच्या मेळाव्यात किमान आमदार शिवाजीराव नाईक यांनी जयंतरावांचा अहंभाव मोडून इस्लामपुरात आम्ही ताकद दाखविली असल्याचा हल्लाबोल करत किमान प्रत्युत्तराचा प्रयत्न केला. पण चंद्रकांतदादा किंवा संजयकाका किंवा अन्य पदाधिकाऱ्यांनी हा विषय टाळलाच!
लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदेनंतर भाजपने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीमध्येही झेंडा फडकवला. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणात भाजपला पसंती दिल्याचे चित्र दिसले. जत नगरपालिकेतही भाजपने आपली सर्व फौज प्रचारात उतरवून मोठे आव्हान उभे केले आहे. त्याचबरोबर "मिशन महापालिका'साठी रणशिंग फुंकले आहे. अर्थात भाजपचा हा सोहळा होता तो गावगाड्यातही कमळ सर्वाधिक फुलले याचे यश साजरा करण्याचाच! पण भाजपमधील अन्य शिलेदारांचे यापूर्वीचे जयंतरावांशी असलेले संबंध पाहता त्यांनी जयंतरावांची टीकेकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले. अर्थात गेल्या काही दिवसांत जयंतरावांनी भाजपवर हल्ला करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. त्यामुळे या मेळाव्यात भाजपचे नेते आणि सरदार राष्ट्रवादीवर तुटून पडतील असे वाटले होते पण तसे काही चित्र दिसले नाही. चंद्रकांतदादांनी एकवेळ काम झाले नाही तरी चालेल पण भ्रष्टाचार करू नका असा संदेश आपल्या नव्या गावगाड्यातील कारभाऱ्यांना दिला. त्यामुळे भाजपला आता कोणत्याही भानगडींची डोकेदुखी नको असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात विविध ग्रामपंचातींत एलईडी घोटाळ्यांसह विविध योजनात घोटाळे बाहेर येत आहेत. तसेच चौदाव्या वित्त आयोगाद्वारे चारशे कोटी जिल्ह्याला मिळणार आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांनी व्यक्त केलेली काळजी गांभीर्याने घेण्यासारखीच आहे. अर्थात भाजप हा नेहमीच "पार्टी विथ डिफरन्स' म्हणून आपले वेगळेपण सांगत असल्याने एवढ्या प्रमाणात आता आपली सत्ता केंद्रे निर्माण झाल्याने भीती वाटते ती भ्रष्टाचाराचीच. कारण या सर्वाला कंटाळून जनतेने मोदी लाटेत भाजपच्या ओट्यात हे यश टाकले आहे, हे वास्तव आहे.
एक काळ जिल्ह्यात चार-पाच नगरसेवकांएवढेच बळ असलेला भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या बेसपर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे भाजपचा अत्मविश्वास वाढल्याचे या मेळाव्यातून स्पष्ट झाले. संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचा निर्धार करताना विरोधकांना आव्हानही मेळाव्यात दिले. मेळाव्यातून भाजपने महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुकले आहे. जिल्ह्यात एकवेळ अशी होती की भाजपला निवडणुकीसाठी उमेदवार मिळायचा नाही. उमेदवार मिळाला तर बूथवर काम करायला कार्यकर्ता मिळायचा नाही. परंतु आता चित्र बदललेले दिसत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला हादरा दिला. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा हादरा देऊन विरोधकांचे बुरूजच पाडले. भाजपने हे यश मिळवल्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत आपलाच विजय होणार अशा भ्रमात होते. भाजप फक्त शहरातील पक्ष आहे. ग्रामीण भागात अद्याप पाळेमुळे रुजली नसल्याचा दावा त्यांनी केला. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत 453 पैकी 186 थेट सरपंच भाजपचे निवडून आले. तर 1533 सदस्यांनाही मतदारांनी पसंती दिली. जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे बालेकिल्ले पाडून भाजपने तेथे स्वत:चा झेंडा रोवून गडकरी नेमल्याचे दिसून आले. अर्थात लोकांना पारदर्शी आणि विकास दाखविणारा कार्यक्रम करून दाखविणे भाजप नेत्यापुढे मोठे आव्हान आहे. तरच हा बेस पुढील काळात रुजणार आहे. अर्थात तरीदेखील विविध पातळींवर काम करण्यासाठी भाजपकडे अजूनही पहिल्या, दुसऱ्या फळीतील उत्साही कार्यकर्त्यांची वानवाच दिसते आहे. लोकसभा ते ग्रामपंचायत या दिल्ली ते गल्लीपर्यंतच्या राजकारणात भाजपने शिरकाव केल्यामुळे पक्षाकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. अर्थात नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी तसेच नवे खूश आणि जुने नाराज असे अनेक प्रश्न या पक्षाकडे आहे. लोक भाजपच्या ओट्यात मते टाकत आहेत पण अजूनही नेटवर्क आहे ते भाजपचे नसून नव्याने आयात झालेल्या नेत्यांच्याच हातात जागोजागीची सूत्रे आहेत.
मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या दौऱ्याने चैतन्य आले असले तरी अजूनही भाजप नेते आपापले राजकारण करण्यातच गुंतले असून या पक्षावर होणाऱ्या टीकेकडे नेते दुर्लक्ष करतात. अगदी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लाज वाटत नाही का एवढ्या खालच्या भाषेत टीका केली तरी एकाही भाजप नेत्याला याबाबत निषेध करावा असे वाटले नाही. जयंतरावांच्या टीकेलाही फक्त शिवाजीरावांनीच काय तेवढे उत्तर दोन आठवड्यांनंतर दिले. भाजप यश मिळवत असताना सोशल मीडियासह विविध पातळ्यावर देशभरात पक्षावर टीका होते आहे याबाबत प्रतिवाद करण्यात मात्र स्थानिक नेते फार उत्सुक नाहीतच याचेच आश्चर्य व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.