पुणे : प्रदेश युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी नगर जिल्ह्यातील सत्यजित तांबे यांची निवड झाल्यानंतर काही योगायोग पुढे आले आहेत. याच नगर जिल्ह्यातील संग्राम कोते पाटील हे राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे दोघेही मावसभाऊ आहेत. दोघांच्याही आई या एकमेकांच्या मावसबहीणी आहेत.
राजकीय नेत्यांची परस्परांतील नातीगोती आणि नेत्यांची मोठी परंपरा या जिल्ह्याला आहे. एकमेकांचे नातेवाईक असलेले नेते विविध पक्षांत एकाच वेळी कार्यरत असणे हे या जिल्ह्यात विशेष नाही. नगर जिल्ह्यातून गाविंदराव अदिक हे कॉंग्रेसचे तर बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादीचे एकाच वेळी प्रदेशाध्यक्ष होते. सत्यजीत व संग्राम यांच्या निमित्ताने हा योगायोग पुन्हा आला आहे. फरक इतकाच की हे दोघे पक्षाच्या युवक शाखेचे अध्यक्ष आहेत.
सत्यजित व संग्राम या दोघांचे पक्ष वेगळे असले तरी हे दोघे मावसभाऊ आहेत हे आणखी एक विशेष. सत्यजित यांनी राज्यशास्त्रात एम.ए., एम. फिल, एमबीए केले आहे. हार्वडी विद्यापीठातून त्यांनी कोर्स पूर्ण केला आहे. संग्राम यांनी बी. काॅम पूर्ण करत गर्व्हनन्स विषयात अभ्यास केला आहे.
सत्यजित यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते आहेत. गेल्या सहा निवडणुकांत त्यांनी संगमनेर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. सत्यजीत यांच्या आई संगमनेरच्या नगराध्यक्षा आहेत तर वडील डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून सलगपणे निवडून येत आहेत. सत्यजीत यांनी "एनएसयूआय' या कॉंग्रेसच्या विद्यार्थी आघाडीपासून राजकीय कामास सुरवात केली. नगर जिल्हा परिषदेत दोन वेळा सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर शहर मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे.
एखाद्या पक्षाच्या युवक शाखेसाठी सुवर्णकाळ कोणता तर, तो पक्ष सत्तेबाहरे विरोधात असेल तेव्हा. आता दोन्ही काॅग्रेस सत्तेत नसल्याने या दोन्ही युवा प्रदेशाध्यक्षांसाठी काम दाखविण्याची सुवर्णसंधी असणार आहे. निवडणुका तोंडावर आहेत. पक्ष संघटना तितकीशी मजबूत नाही. त्यामुळेच काही करून दाखविण्याची संधी आहे. राष्ट्रवादीच्या युवक शाखेचे अध्यक्ष असलेले त्यांचे मावसभाऊ संग्राम यांनी गेल्या तीन वर्षात मोठे काम उभे केले आहे. त्यामुळे सत्यजीत यांना अधिक गतीने व जोमाने काम करावे लागणार आहे.
संग्राम यांचे वडील ऍड. शिवाजीराव कोते तसेच चुलते यांनी जिल्हा परिषद व गणेश सहकारी साखर कारखान्यांवर प्रतिनिधीत्व केले आहे. राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आघाडीचे शिर्डी शहर अध्यक्ष, मग राहता तालुका, नगर जिल्हा अशा चढत्या क्रमाने काम करीत महाराष्ट्राचे उपाध्यक्षपद मिळविले. त्यानंतर मात्र त्यांच्याकडे विद्यार्थी आघाडीची राज्याची जबाबदारी देण्यात आली.
या काळात दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफी, स्कॉलारशिप, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विषय तसेच वसतिगृहांच्या विषयावर राज्यभरात 53 मोर्चे काढले. नऊशे महाविद्यालयात विद्यार्थी आघाडीच्या शाखा उघडल्या. त्यांनी केलेल्या कामाची दखल ज्येष्ठ नेते स्वत: शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाच्या युवक शाखेचे अध्यक्षपद देण्यात आले. सध्या संग्राम हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यातील ताईत मानले जातात. विद्यार्थी व युवक अध्यक्षपदाच्या गेल्या तीन वर्षांच्या काळात संग्राम यांनी राज्यात तीन लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. 150 विधानसभा मतदारसंघ समोर ठेऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघाशी थेट संवाद ठेवला आहे. या दीडशे मतदारसंघात "वन बूथ फिफ्टीन यूथ' ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
या दोन युवा नेत्यांसाठी आगामी विधानसभा निवडणूक महत्त्वाची असणार आहे. सत्यजित यांनी गेली विधानसभा निवडणूक नगर शहरातून लढविली होती. आगामी काळात पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे सांगत विधानसभा निवडणूक लढविण्याचे पत्ते खुले ठेवले आहेत. दुसरीकडे संग्राम यांनी सध्या राज्य पातळीवर पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.