मोठी बातमी : राज्यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार...पण हे 12 निकष वाचा

राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळं सरकारनं आता शाळा सुरू करण्याबाबतही पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.
School of 8th to 12th class will reopen in Maharashtra
School of 8th to 12th class will reopen in Maharashtra

मुंबई  : कोरोना संकटामुळे (Covid-19) मागील वर्षभरापासून शाळेचे तोंडही न पाहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आशादायक बातमी आहे. राज्य सरकारने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड मुक्त ग्रामपंचायती किंवा स्थानिक स्वराज संस्थांना शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण त्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (School of 8th to 12th class will reopen in Maharashtra)

मागील वर्षी मार्च महिन्यात राज्यात 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॅाकडाऊन जाहीर केला अन् शाळा-महाविद्यालयांना कुलूप लागलं. वर्षभरानंतरही शाळा सुरू झाल्या नाहीत. पण राज्यातील कोरोनाची स्थिती काहीप्रमाणात सुधारताना दिसत आहे. राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळं सरकारनं आता शाळा सुरू करण्याबाबतही पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. 

त्यानुसार पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे. सध्या 10 वर्षापक्षा कमी वयोगटाच्या मुलांना कोविड संसर्ग होण्याची सर्वात कमी शक्यता आहे. तसेच 18 वयापर्यंतच्या मुलांना सध्यातरी संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शारिरीक, मानसिक दुष्परिणाम होत आहे, शिवाय शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळे नियमितपणे शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आलं आहे. 

शाळा सुरू करण्यासाठी खालील अटी व निकष असतील...
1. ग्रामीण भागात कोविड-मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील शाळेतील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू कऱण्यासाठी पालकांशी चर्चा करून ठराव करावा.
2. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्पाने शाळेत बोलवण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी/सकाळी-दुपारी, ठराविक विषयांसाठी प्राधान्य.
3. एका बाकावर एकच विद्यार्थी
4. दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर
5. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी
6. सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर
7. कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे
8. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी. किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
9. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा करणे
10. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करावी
11. शाळेत कार्यक्रम आयोजनावर कडक निर्बंध असतील
12. पालकांनी लक्षणे असलेल्या मुलांना शालेत पाठवू नये, कुटूंबातील व्यक्तींनी योग्य दक्षता घ्यावी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com