Dhule constituency 2024: भुसेंची राजकीय प्रतिष्ठा पणाला; भामरेंना किती लीड देणार?

Dada Bhuse news:मालेगाव बाह्य हा भुसे यांचे होमग्राउंड आहे. येथून यंदा ते भाजपला किमान गेल्या निवडणुकी एवढा लीड देतील का? तसे झाल्यास भुसे यांची राजकीय प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
Dhule constituency 2024
Dhule constituency 2024Sarkarnama

Dhule News, 22 May: धुळे लोकसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या नेत्या, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्यात सरळ सामना आहे. यामध्ये मालेगाव बाह्य मतदारसंघातून भाजपला आपली आघाडी टिकवण्याचे आव्हान आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भामरे हे ९४ हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. मात्र धुळे बाह्य मतदारसंघात देखील त्यांनी काँग्रेसला तेवढ्याच मतांनी मागे टाकले होते. यंदाच्या निवडणुकीत नाशिकच्या डॉ. शोभा बच्छाव उमेदवार आहेत. त्यामुळे यांना ती आघाडी कमी करणे जमेल की नाही? हा उत्सुकतेचा विषय आहे.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री दादा भुसे या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यंदा त्यांना भाजपकडून मोठी साधनसामुग्री उपलब्ध करण्यात आली होती. सत्ताधारी असल्याने व्यवस्थेचा पुरेपूर लाभ त्यांना उपलब्ध होता. मुख्य म्हणजे काँग्रेसचे तुषार शेवाळे ऐन निवडणुकीत भाजपवासी झाले.

भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे सध्या कारागृहात आहेत. त्यामुळे भुसे यांच्यासाठी विरोधक नसल्याने निवडणुकीचे मैदान मोकळे होते. अशा स्थितीत भाजपसाठी ते किती मताधिक्य मिळवून देतात याची उत्सुकता आहे. या मताधिक्यामुळे भाजपच्या डॉ. भामरे यांना निवडणूक जिंकण्यास मदत होऊ शकते.

Dhule constituency 2024
Pune Porsche Accident: अजय भोसले वाचले, पण मित्राच्या छातीत गोळी शिरली! तेव्हा नेमकं काय घडलं?

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे डॉ. भामरे यांना एक लाख ३२ हजार ४२२ मते मिळाली होती. काँग्रेसचे कुणाल पाटील यांना ३८ हजार २७५ मध्ये होती. भाजपला जवळपास ९४ हजार मतांची आघाडी होती. ही आघाडी टिकविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा होती. त्यांनी आपली सगळी यंत्रणा कामाला लावली होती. अशा स्थितीत मतदार संघातील चित्र भाजपला कितपत अनुकूल होते, हे झालेल्या मतदानातूनच दिसून येईल.

डॉ. भामरे तिसऱ्यांदा मतदारांचा कौल घेत आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीला यंदा मोठा विरोध होता. येथून नऊ जण इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्याने यातील किती जण मनापासून भामरे यांच्या प्रचारात सक्रिय झाले असतील, हे सांगता येत नाही. अँटी इन्कमबन्सी आणि कमी झालेला संपर्क हा देखील भाजपच्या विरोधात जाणारा मुद्दा होता. निवडणूक प्रचारातून काँग्रेसने तो पद्धतशीरपणे मतदारांवर बिंबवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या डॉ. बच्छाव या नाशिकच्या उमेदवार आहेत. त्यामुळे मालेगाव बाह्य मतदार संघाच्या मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो. या संदर्भात काँग्रेसने चांगली यंत्रणा उभी केली होती. काँग्रेस उमेदवारासाठी येथे कोणत्याही स्टार प्रचारकाची सभा झाली नाही. मात्र खुद्द पालकमंत्री दादा भुसे येथून भाजपसाठी किल्ला लढवत होते. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेने प्रचाराची सांगता झाली.

योगी आदित्यनाथ यांचा भर हिंदू आणि मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर होता. त्यामुळे योगी यांच्या सभेचा अनुकूल परिणाम शक्य होता. तेवढाच नकारात्मक परिणामही झाल्याचे बोलले जाते. अशा स्थितीत योगी आदित्यनाथ भामरे यांना किती लाभदायक ठरणार याची चर्चा आहे.मुख्य म्हणजे मालेगाव बाह्य हा पालकमंत्री भुसे यांचे होमग्राउंड आहे. येथून यंदा ते भाजपला किमान गेल्या निवडणुकी एवढा लीड देतील का? तसे झाल्यास भुसे यांची राजकीय प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com