
भाजपचा तळागाळात विस्तार: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून भाजप शहर- गावपातळीपर्यंत आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. नाशिक व जळगाव जिल्ह्यात विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
नेत्यांचे पक्षांतराचे सत्र: शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेसमधील अनेक माजी आमदार, नगरसेवक भाजप व शिंदे गटात सामील होत आहेत, ज्यामुळे विरोधक कमकुवत होत आहेत.
हिंदुत्वाचा राजकीय वापर: २०२७ च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने भाजप हिंदुत्ववादी प्रतिमा बळकट करत आहे. विकासकामांद्वारे शहरांवर राजकीय पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांद्वारे तळागाळापर्यंत पक्षविस्ताराची संधी आणि त्याद्वारे या संस्थांवर वर्चस्व स्थापण्यावर भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न दिसतो. त्याबरोबरच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामातून हिंदुत्ववादी ही प्रतिमा उजळून घेण्याचा प्रयत्न दिसतो. आगामी निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांची ताकद क्षीण करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटाच भाजपने लावला आहे. या पक्षप्रवेशांतून महापालिका निवडणुकीची चाहूल लागली आहे.
कोणत्याही स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीद्वारे गाव आणि शहर पातळीवर आपले एकहाती वर्चस्व सुस्थापित करायचेच या हेतूने भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. विशेषत: महापालिकांवर ताबा मिळवल्यास वेगाने नागरीकरणाने फुगलेल्या शहरांच्या अर्थकारणावर नियंत्रण येईलच, त्याशिवाय हुकमी मतपेढी निर्माण करून त्या माध्यमातून राज्यातील आणि पर्यायाने देशातील सत्तेची सूत्रे हातात ठेवता येतील, या दूरगामी विचाराने भाजप रणनीती आखत आहेत.
हेच सूत्र लक्षात घेऊन राज्यातील महायुतीतील घटक असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अत्यंत आक्रमक पद्धतीने आणि त्या खालोखाल दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रणनिती आखली आहे. नाशिक शहर व जिल्हा आणि जळगाव जिल्हा या दोन जिल्ह्यात हे चित्र सध्या प्रकर्षाने जाणवत आहे. भाजप आणि शिवसेनेने प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शरदचंद्र पवार या दोन पक्षांना प्रामुख्याने लक्ष्य केले आहे. या दोन्हीही पक्षातील पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेते आणि विशेषतः माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख किंवा
नाशिकमधून शिवसेनेतर्फे (उबाठा) सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पश्चिममधून तर नाशिक पूर्वमधून राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार) गणेश गिते आणि धुळ्यातून काँग्रेसतर्फे कुणाल पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. हे तिघेही आता भाजपवासीय झाले आहेत. पाटील माजी आमदार आहेत. तर बडगुजर यांचे सिडकोत वर्चस्व असून ते महापालिका कामगारांचे नेते आहेत; तर गिते स्थायी समितीचे सभापती होते. अर्थात, विधानसभेच्या निकालाने त्यांच्या मर्यादाही दाखवल्या आहेत.
तथापि, संख्यात्मकदृष्ट्या बळ वाढवतानाच विरोधकांना प्रभावहीन करणे, आव्हानात्मक ठरू शकणारे नेते गळाला लावून त्यांची ताकद कमी करणे ही रणनीती भाजप अवलंबत आहे. त्याच वाटेने शिवसेनाही चालली आहे. यातील कुणाल पाटील हे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र असून अनेकदा आमदार राहिले आहेत. त्यांच्या शिक्षण संस्था असून सहकारात काम आहे. त्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा सुरू आहे. त्यांना माजी आमदार द. वा. पाटील यांचे नातू राम भदाणे यांनी दारूण पराभूत केले आहे. बडगुजर यांच्यासह त्यांचा मुलगा दीपक यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यातून बाहेर कसे पडायचे? ही चिंता त्यांना सतावत आहे. काही दिवसांपूर्वीच त्य
भाजपवासीय झालेले नाशिक जिल्ह्यातील आणखी एक नेते म्हणजे डॉ. अपूर्व हिरे. राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे भाऊसाहेब हिरेंचे पणतू आणि माजी आरोग्य मंत्री पुष्पाताई हिरेंचे नातू, माजी मंत्री प्रशांत हिरेंचे पुत्र अशी त्यांची ओळख. अर्थात डॉ. अपूर्व आमदारही होते. पण वडिलांप्रमाणे त्यांना आणि त्यांचे बंधू अद्वय यांना राजकारणात सूर काही लावता आलेला नाही.
हिरे बंधूंमागे राजकीय पुण्याई आणि महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे शैक्षणिक जाळे आहे. आजच्या घडीला त्यांचे कट्टर विरोधक शिवसेनेतील हेवीवेट दादा भुसे शिक्षणमंत्री आहेत. अद्वय यांना पराभूत करून नुकतेच ते विधानसभेत गेले आहेत. अपूर्व हिरेंनी नुकताच शिवसेनेतून (उबाठा) भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशाच्या पूर्वसंध्येला व्यंकटेश बँकेच्या कारभार गैरप्रकार झाल्याचा आरोप केला गेला. साऱ्या हिरे कुटुंबालाच लक्ष्य केले गेले. त्याद्वारे त्यांची वाट रोखण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही ते भाजपवासीय झालेच.
या पक्षांतराच्या सुगीत सर्वाधिक पडझड होत आहे ठाकरेंच्या शिवसेनेची. सुधाकर बडगुजर आधीच पक्ष सोडून गेले, पाठोपाठ त्या पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे एकनाथ शिंदेंचा हात धरून शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर पक्षाची मदार मामा राजवाडे यांच्यावर सोपवली. त्यांच्यासह पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले सुनील बागूल हे देखील हातात कमळ घेऊ पाहात आहेत. तथापि, गुन्हेगारीचे आरोप झाल्याने त्यांचा भाजप प्रवेश रखडला आहे.
यापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला प्रशांत दिवे, सचिन मराठे, सीमा ताजणे, माजी मंत्री बबन घोलप भाजपवासीय झाले. तर माजी आमदार निर्मला गावीत यांच्यासह विलास शिंदे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, पल्लवी पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पसंती दिली आहे. जोडीला मनसेतून उषा शेळकेही गेल्या आहेत. पक्षांतराच्या या घाऊक सुगीने कार्यकर्त्यांची अवस्था मात्र जाऊ कोणाच्या पाठी अशी झाली आहे.
पक्षांतराची ही वावटळ शेजारील जळगाव जिल्ह्यातही धूळ उडवत आहे. त्याचे लोण तेथेही तितकेच प्रभावीपणे पसरत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह माजी मंत्री सतीश पाटील आणि चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे.
जळगाव जिल्ह्यातील आघाडीचे नेते राहिलेले ओंकारआप्पा वाघ यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी भाजपचा रस्ता धरला आहे. माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले आहे. मुक्ताईनगरचे बडे नेते एकनाथ खडसे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी मधूनअधून ते पूर्वाश्रमीच्या पक्षात, भाजपमध्ये जातील की काय, अशी आवई उठत आहे. जळगाव जिल्ह्यावर आजच्या घडीला भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेनादेखील पक्षविस्ताराची संधी सोडत नाहीत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. नाशिकमध्ये पाच जून रोजी झालेल्या विभागीय मेळाव्यात भाजपने नाशिक महापालिकेच्या १२१ पैकी १०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. ही घोषणा केली आणि भाजपमधील इनकमिंगची प्रक्रिया गतिमान झाली आहे. महापालिका स्थापनेनंतरच्या लोकप्रतिनिधी राजवटीच्या सुरुवातीची आठ-दहा वर्षे वगळता नाशिक महापालिकेच्या महापौरपदावर शिवसेना आणि भाजप किंवा त्यांच्या पाठबळावरील महापौर राहिला.
मधली पाच-सहा वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही गेली. आजच्या घडीला शहरात भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. तथापि, जिल्ह्यातील प्रत्येकी एक-एक खासदारकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार या पक्षाकडे आहे. शिवाय, धुळ्यात काँग्रेसचा खासदार आहे. या मतदारसंघातील निम्मा भाग नाशिक जिल्ह्यात येतो. पक्षांतराचा हा सगळा मामला नेत्यांच्या वर्चस्ववादाचा असला तरी जनतेला किती गृहीत धरणार हाही प्रश्नच आहे. नेत्यांच्या सातत्याने बदलल्या जाणाऱ्या निष्ठा, सत्तेच्या हव्यासापोटी आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ते घेत असलेल्या कोलांटउड्या जनताजनार्दनाला किती पचन
प्रयागराज येथील महाकुंभाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचा हिंदुत्ववादी ही चेहरा उठावदारपणे समोर आला. आता २०२७मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे. हजारो कोटी रुपयांची विकासकामे सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून होत आहेत. गिरीश महाजन यांच्याकडे कुंभमेळा मंत्रिपद दिलेले आहे. त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेवरील वर्चस्व मुंबई महापालिकेइतकेच महत्वाचे आहे. त्यामुळेच येथे रस्सीखेचही तितकीच तीव्र आहे.
भाजप स्थानिक निवडणुकांवर का लक्ष केंद्रीत करत आहे?
गाव व शहर पातळीवर राजकीय वर्चस्व आणि मतपेढी निर्माण करण्यासाठी.
सध्या कोणते जिल्हे पक्षांतरांमुळे चर्चेत आहेत?
नाशिक आणि जळगाव जिल्हे पक्षांतरांच्या घडामोडींचे केंद्र आहेत.
भाजपमध्ये कोणते प्रमुख नेते प्रवेश करत आहेत?
कुणाल पाटील, डॉ. अपूर्व हिरे यांच्यासारखे अनेक माजी आमदार व पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा भाजपसाठी का महत्त्वाचा आहे?
हिंदुत्ववाद बळकट करण्यासाठी आणि विकासकामांतून शहरी सत्ता मजबूत करण्यासाठी.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.