सोनिया गांधी आल्या आल्या मायावतींना भेटल्या; त्यांचा हात हातात घेतला! 

सोनिया गांधी आल्या आल्या मायावतींना भेटल्या; त्यांचा हात हातात घेतला! 

पुणे : कर्नाटकचे नवनियुक्‍त मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील भाजपविरोधक बेंगळुरुमध्ये एकत्रित आले होते. या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या युपीएच्या अध्यक्षा सानिया गांधी प्रथमत: बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना भेटल्या. त्यांच्या हात त्यांनी बराचवेळ हातात घेतला. 

विधानसौधासमोर झालेल्या शपथविधी सोहळ्याला देशभरातून नेतेमंडळी आली होती. मात्र मायावतींची उपस्थिती सर्वार्थाने लक्षवेधी ठरली. एकतर मायावती यांनी कर्नाटकात जेडीएसबरोबर निवडणूकपुर्व युती केली होती. प्रचारासाठी त्यांनी सभाही घेतल्या होत्या. त्यांच्या पक्षाचा एक आमदारही निवडून आला आहे. 

कर्नाटकचे निकाल जाहीर होत असताना त्रिशंकू परिस्थिती स्पष्ट दिसत होती. त्यावेळी भाजपला रोखण्यासाठी सोनिया गांधी व एचडी देवेगौडा यांच्यासमवेत मायावती फोनवरुन बोलल्या. त्यामुळे कॉंग्रेस-जेडीएस युतीचा निर्णय तातडीने झाला. त्यानंतर राज्यपालांनी येडीयुराप्पांना सरकार स्थापनेची संधी दिल्यानंतर मायावती यांनी भाजपवर टिकचे झोड उठवली होती. मायावती सातत्याने जेडीएसबरोबर राहिल्या. कुमारस्वामींचे मुख्यमंत्रीपद निश्‍चित झाल्यानंतर ते दिल्लीला गेले. तिथे सोनिया गांधी, राहूल गांधींना भेटले. त्यानंतर मायावतींची भेट घेवून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. कुमारस्वामींनी फक्‍त या तीन नेत्यांनाच भेटून निमंत्रण दिले होते, हे विशेष! 

शपथविधी सोहळ्यासाठी मायावती आज बेंगळूरमध्ये पोचल्या होत्या. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबरोबर त्या स्टेजवर आल्या. दोघे शेजारी शेजारी बसले. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा स्टेजवर आल्यानंतर त्यांनी मायावती, अखिलेश यादव व इतर नेत्यांचे स्वागत केले. त्यानंतर काही वेळात सोनिया गांधी व राहूल गांधींचे आगमन झाले. त्यांचे स्वागत देवेगौडांनी केले. त्यानंतर सोनिया गांधी, राहूल गांधी मायावतींजवळ आले. मायावतींनी हसतमुखाने त्यांचे स्वागत केले. सोनिया गांधींनी मायावतींचा हात हातात घेतला. बराचवेळ हात हातात ठेवून त्यांची चर्चा सुरु होती. तिथे अखिलेश यादवही होते. 

शपथविधी सोहळा झाल्यानंतर पुन्हा सर्व नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. नेत्यांनी अभिवादन केले. त्यावेळी सोनिया गांधी मायावतींना घेवून पुढे आल्या. मायावती, सोनिया गांधी, ममता बॅनजी यांनी उपस्थितांना अभिवादन केले. एकूणच शपथविधी कुमारस्वामींचा असलातरी चर्चा मायावतींची अधिक झाली. मायावतींचा बसप आणि कॉंग्रेस आगामी निवडणुकांत एकत्र येतील, असे संकेत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com