Thalapathy Vijay politics: थलपती विजय यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भाजप सत्तेचे द्वार गाठणार?

Tamil Nadu assembly election Thalapathy Vijay politics:करूर दुर्घटनेनंतरही भाजपने विजय यांना लक्ष्य न करता द्रमुकच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली. तसेच विजय यांना आधार देण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसते.
Tamil Nadu assembly election Thalapathy Vijay politics:
Tamil Nadu assembly election Thalapathy Vijay politics:Sarkarnama
Published on
Updated on

प्रसाद इनामदार

दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य तमिळनाडूमध्ये कमळ फुलविण्यासाठी सातत्याने धडपडत असलेला भारतीय जनता पक्ष, सत्तेची ऊब असलेला मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा द्रमुक, भाजपची साथ घेऊन पुन्हा एकदा सत्तेचा सोपान गाठण्याच्या प्रयत्नात असलेला अण्णा द्रमुक आणि तमिळनाडूच्या अवकाशात स्वतंत्रपणे स्वतःला आजमावून तमीळ जनतेचा नवा मसिहा बनण्याच्या प्रयत्नात असलेला अभिनेता थलपती विजय. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तिरंगी लढतीचा पट सध्या मांडला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वच जण आपल्या चाली भक्कम कशा होतील यासाठी प्रयत्नशील आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेता अन् तमिळनाडूच्या राजकारणात नव्याने उतरलेल्या टीव्हीके (तामिळगा वेट्ट्री कळघम) पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या अभिनेते थलपती विजय यांच्या करूर येथील रॅलीवेळी चेंगराचेंगरी होऊन ४० जण मृत्युमुखी पडले अन् त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्याचवेळी तमिळनाडूच्या राजकारणाचा तिसरा कोनही वेगाने आकार घेत असल्याचे ठळकपणे दिसले.

दीड वर्षांपूर्वी पक्ष स्थापनेपासून त्याच्या सुरू असलेल्या धडपडीचे दृश्य रूप गर्दीच्या रुपाने त्या दिवशी प्रकटले अन् नको ती दुर्घटना घडली. तरी विजयच्या एकूण वाढत्या ताकदीची सर्वांनाच दखल त्यानिमित्ताने घ्यावी लागली अन् त्यानं सत्ताधारी द्रमुक आणि प्रमुख विरोधी अण्णा द्रमुक यांच्याविरोधात ठोकलेल्या शड्डूचा आवाज नक्कीच घुमला. या दुर्घटनेनंतर विजयने तेथे न थांबता पलायन केल्याचा आरोप झाला. त्याचा फायदा विरोधकांनी उठविण्याचा प्रयत्न करत त्याच्या एकखांबी तंबू असलेल्या पक्षाच्या एकूण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

प्रादेशिक पक्षांचा करिष्मा वाढला

तमिळनाडूत १९६७ मध्ये काँग्रेसचे मिंजुर भक्तवत्सलम सत्तेमधून पायउतार झाले आणि प्रथमच प्रादेशिक पक्ष असलेला द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष सत्तेवर आला आणि पक्षाचे सर्वेसर्वा अण्णादुराई मुख्यमंत्री झाले. त्यांनी दहा वर्षे राज्यशकट हाकले. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी द्रमुकला शह देऊन अण्णा द्रमुक पक्षाने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या आणि एम.जी. रामचंद्रन मुख्यमंत्री झाले.

तमिळनाडूतील दुसरा बलशाली प्रादेशिक पक्ष सत्तेचा मानकरी ठरला. त्यानंतर गेली जवळ जवळ साठ दशके तमिळनाडूची सत्ता कधी द्रमुक तर कधी अण्णा द्रमुक यांच्याकडे राहिले. कॉंग्रेसला स्वबळावर पुन्हा काही सत्ता गाठता आली नाही, एवढी प्रादेशिक अस्मिता टोकाची बनली. एम. जी. रामचंद्रन (एमजीआर), के. करुणानिधी, जे. जयललिता या नावांनी तमिळनाडूचा इतिहास नव्याने लिहिला. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्याभोवतीच सत्तेची खुर्ची फिरत राहिली. विशेषतः के. करुणानिधी आणि जे. जयललिता यांच्या हाती तमिळ जनतेने आलटून-पालटून सत्ता दिली. त्यातून तेथील राजकारण अधिकच टोकदार होत गेले.

आधी जयललिता (२०१६) आणि त्यानंतर के. करुणानिधी (२०१८) यांचे निधन झाले आणि राज्यात करिष्मा असलेल्या नेत्यांची पोकळी निर्माण झाली. विशेषतः जयललितानंतर अण्णा द्रमुकचे सुकाणू हाती ठेवण्यासाठी पलानी स्वामी, पन्नीर सेल्वम आणि शशिकला यांनी केलेले प्रयत्न फारसे फलदायी झाल्याचे दिसून येत नाही. उलट पक्षात मतभेदच दिसत आहेत. दुसरीकडे द्रमुकचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर के. करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन यांनी पक्षावर पकड जरी मिळविली असली तरी वडिलांइतकी लोकप्रियता त्यांच्या वाट्याला आल्याचे दिसत नाही. मात्र, मुख्यमंत्रिपद निभावताना केंद्रासोबत दोन हात करण्य़ाचे धोरण ठेवून प्रादेशिक अस्मितेवर सातत्याने फुंकर घालण्याचे काम मात्र ते सातत्याने करत आले आहेत.

वडिलांच्या मृत्यूनंतर पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्टॅलिन यांनी पक्षावरील पकड मजबूत करताना समविचारी पक्षांनाही सोबतीला घेतले आणि जेथे जेथे शक्य आहे, तेथे तेथे अण्णा द्रमुकचे पंख कापण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच केंद्रातील सत्ताधारी भाजप हा हिंदी लादण्यासाठी राज्याच्या राजकारणात आला असल्याचे सांगत भाजपविरोधात मतनिर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. केंद्राच्या हिंदीविरोधी धोरणाची धार ते दिवसेंदिवस अधिकच वाढवत असल्याचे दिसते. कोणत्याही परिस्थितीत भाजपला शरण जायचे नाही हेच त्यांचे धोरण दिसते. त्यातूनच स्वतंत्र ‘नीट’ परीक्षा, तिहेरी भाषा धोरणाला कडाडून विरोध ते करत आहेत. त्यातून ते येत्या निवडणुकीसाठी मशागतच करत आहेत.

भाजपची मोर्चेबांधणी

तमिळनाडूसारख्या महत्त्वाच्या राज्यात सत्तेसाठी काही वर्षांपासून भाजपकडून अगदी नेटाने प्रयत्न सुरू आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर दहा टक्क्यांवर मते मिळवली. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी गेले काही वर्षे त्यासाठी मोठ्या खस्ता खाल्ल्या. काही महिन्यांपूर्वी मित्रपक्ष अण्णा द्रमुकसोबत वाद झाल्याने त्यांच्या नेतृत्वाच्या मागणीवरून भाजपने अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करून मित्राला खूश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचबरोबर भविष्यात अण्णा द्रमुकसोबत राजकारण करायचे की नाही याबाबत भाजप नेतृत्व सातत्याने विचार करत आहे आणि राज्याच्या राजकारणात नव्या भिडूच्या शोधात आहे.

त्यासाठी त्यांची नजर ‘टीव्हीके’चे सर्वेसर्वा विजय यांच्यावर आहे. त्यामुळेच एकीकडे पंतप्रधान मोदींनी तमिळनाडू दौरे वाढविले असून सातत्याने विविध योजना जाहीर करून जनतेला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. फुटीचे ग्रहण लागलेल्या अण्णा द्रमुकच्या उपयोगीतेकडे लक्ष ठेवून विजय यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा आपल्याला काही उपयोग करून घेता येईल का यासाठीही चाचपणी सुरू आहे. म्हणूनच सातत्याने विरोधात भूमिका घेणाऱ्या विजय यांच्याबाबत पक्षाने नरमाईचा सूर ठेवला आहे.

त्यामुळेच करूर दुर्घटनेनंतरही भाजपने विजय यांना लक्ष्य न करता द्रमुकच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली. तसेच विजय यांना आधार देण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसते. यातील उद्देश सरळसरळ स्पष्ट आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत दोहोंतील संबंध सुरळीत झाले तर विजय यांच्यासोबत तमिळनाडूच्या राजकीय रणांगणात तिसरी शक्ती म्हणून उतरायचे आणि विजय यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून सत्तेचे द्वार गाठावयाचे. त्यासाठी मग अण्णा द्रमुकला सोडावे लागले तरी त्यांची तयारी आहे. नाहीतरी युती करून सत्तेत आलो तर ते अण्णा द्रमुकचे सरकार असेल अशी दर्पोक्ती त्यांच्या नेतृत्वाकडून करण्यात आली आहेच आणि भाजप हे नक्कीच विसरलेला नाही.

विजय यांचा धडाका

जोसेफ विजय चंद्रशेखर ऊर्फ विजय यांनी अभिनेता म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे आणि या लोकप्रियतेच्या जोरावरच ते तमिळनाडूचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पाहत आहेत. आगामी ‘थलपती ६९’ हा आपल्या कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यानंतर पूर्णवेळ राजकारण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ‘तामिळगा वेट्ट्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाच्या माध्यमातून तमिळ जनतेची सेवा करण्याचा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न ते करणार आहेत.

वडील ख्रिस्ती अन् आई हिंदू असल्यामुळे विरोधकांना त्यांच्यावर धार्मिक राजकारणाचा ठपका ठेवताना विचार करावा लागणार आहे. विजय यांनी राजकारणात उतरताना द्रविडी संस्कृतीची भाषा सातत्याने ठेवली आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामस्वामी नायकार यांच्या विचारधारेचा सातत्याने पुरस्कार केला आहे. आपल्या भूमिकेला तमीळ जनता नक्की पाठींबा देईल असा विश्वास त्यांना वाटतो.

तमिळनाडूत विविध युती होऊन त्यात विजय महत्त्वाच्या स्थानी असतील, हे नक्की. सगळेच स्वतंत्रपणे लढल्यास मात्र द्रमुक व ‘टीव्हीके’ यांच्यातील मतविभागणीचा फायदा अण्णा द्रमुक व भाजप यांना उठविता येईल का हाच कळीचा मुद्दा आहे. २०१६ मध्ये विजय यांच्याशी संबंधित ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे घातले होते, त्यामुळे विजय यांच्या मनात भाजपविषयी राग आहे. त्यामुळेच ते सातत्याने भाजपविरोधी भूमिका घेत असतात. मात्र, करूर दुर्घटनेनंतर दोन्ही बाजूंनी चर्चेची दारे उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे. विजय यांनी दहा वर्षांपासून आपल्या ‘फॅन क्लब’च्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी काम करण्यास सुरुवात करून स्वतःसाठी राजकीय पायाभरणी केली आहे.

कलाकार आणि राजकीय वाटचाल

तमिळनाडूच्या राजकारणाचे अवकाश गेल्या ५० वर्षांत अनेक कलाकारांनी व्यापल्याचे दिसते. त्यातील काहींना मोठे यश मिळाले तर काहींना मात्र अस्तित्वासाठी झगडावे लागल्याचे दिसते. अलीकडे त्यात भरच पडताना दिसते. रजनीकांत व कमल हसन हे प्रचंड लोकप्रियता लाभलेले कलाकार. त्यांनी पाच-सात वर्षांपूर्वी राजकीय पक्ष स्थापन करून राजकारणात प्रवेश केला. पण रजनीकांत यांनी प्रतिमेला धक्का लागतो असे लक्षात येताच राजकीय आखाड्यातून माघार घेतली तर कमल हासन यांना फारसे यश मिळाले नाही.

कमल हासन सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमच्या मदतीमुळे राज्यसभेवर गेले आहेत. ते नेहमीच द्रमुक आणि काँग्रेस यांच्या पाठीशी आणि भाजपच्या विरोधात राहिले आहेत. त्याआधी २००५ मध्ये अभिनेते विजयकांत याने ‘डीएमडीके’ पक्षाची स्थापना केली. जयललिता यांच्याशी समझोता केला व २९ आमदारांचे नेते झाले. मात्र, हे यश त्यांना टिकविता आले नाही. विजराज अल्गरस्वामी ऊर्फ विजयकांत यांनीही देसिया मोरपोक्कू द्रविड कळघम (डीएमडीके) हा पक्ष स्थापन करून राज्यात पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला मात्र, तोदेखील अयशस्वी ठरला. विजय यांच्या राजकारणाला तमिळ जनता कशी स्वीकारते हे येणारा काळच ठरवेल.

हे मुद्दे कळीचे ठरण्याची शक्यता

  • प्रशासनातील गैरव्यवहार आणि पारदर्शी शासन

  • सत्ताधाऱ्यांच्या पाच वर्षांच्या कारभाराबाबत काही बाबतीत नाराजी

  • विविध योजनांच्या अंमलबजावणीला होत असलेला विलंब, निधी वाटपात पक्षपात

  • दारू विक्री संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप

  • शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय अन् सार्वजनिक कामांत वाढलेला दलालांचा वावर

  • विजय यांच्या प्रवेशामुळे झालेली राजकीय घुसळण

  • तरुण मतदार आणि प्रथमच मतदान करणारे मतदार

  • सत्ताधाऱ्यांविरोधात तयार होत असलेले वातावरण

  • हिंदीविरोध आणि भाषिक अस्मिता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com